Saturday, April 26, 2025
मराठी

Fact Check

फॅक्ट चेक: महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला? येथे जाणून घ्या सत्य

Written By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Nov 7, 2024
banner_image

Claim
महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला.
Fact
हा दावा खोटा आहे. मुख्य व्हिडिओतील काही भाग गाळून संदर्भ बदलत हा दावा करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावरील युद्ध जोरात सुरु आहे. नेते आणि समर्थक प्रत्यक्ष टीका टिप्पणी बरोबरच समाज माध्यमांवर आपल्या पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत.

निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात बुधवारी दाखल झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही लक्ष करण्यात आले. महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

आम्हाला हा दावा सर्वप्रथम X वर आढळला.

फेसबुकवरही हा दावा अनेक युजर्सनी केला आहे.

राहुल गांधींवर गंभीर आरोप करणारा हा दावा आम्हाला इंस्टाग्रामवरही आढळला.

अशा पोस्टचे संग्रहण येथे, येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येईल.

महाविकास आघाडीने काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष शरद पवार या सर्व घटक पक्षांची संयुक्त महाराष्ट्र स्वाभिमान सभा बुधवार दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईच्या बीकेसी येथे घेतली. त्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असल्याचे दावा करणाऱ्या युजर्सचे म्हणणे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षाच्या प्रमुख नेत्याने या दैवताचा अपमान करण्याचा दावा निवडणुकीवर परिणाम घडवू शकतो. दरम्यान दावा करताना निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसला जागा दाखवून द्या असेही आवाहन करण्यात येत असल्याचे दिसून आले. यामुळे न्यूजचेकरने या दाव्याचा तपास करण्याचा निर्णय घेतला.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्यात काँग्रेस नेते यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात काही माहिती मिळते का? हे पाहण्यासाठी आम्ही सर्वप्रथम संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून Google वर शोध घेतला. मुंबईत झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेसंदर्भातील असंख्य बातम्या आम्हाला वाचायला आणि पाहायला मिळाल्या. मात्र राहुल गांधी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असे वृत्त आढळले नाही. इतकी मोठी घटना घडली असती तर नक्कीच अनेक माध्यमांनी त्यासंदर्भात बातम्या केल्या असत्या, मात्र तसे आढळले नाही.

फॅक्ट चेक: महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला? येथे जाणून घ्या सत्य
Google Search

पुढील तपासात आम्ही दाव्यासोबत व्हायरल होत असलेला व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे दोन नेते व्यासपीठावरील गर्दीत उभे असलेले पाहायला मिळतात. त्यांच्यासमोर खासदार वर्षा गायकवाड उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. इतक्यात एक व्यक्ती वर्षा गायकवाड यांच्याकडे एक मूर्ती आणून देते. ती मूर्ती त्यांनी हाती घेताच राहुल गांधी आपल्या हातातील एक मूर्ती आणि खांद्यावरील शाल मागे देण्यासाठी वळतात. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हातात वर्षा गायकवाड आपल्या हातातली मूर्ती देतात. असे आम्हाला पाहायला मिळाले. यावेळी राहुल गांधी फिरून मागे देत असलेली मूर्ती बाबासाहेब आंबेडकर यांची होती तर मल्लिकार्जुन खर्गे यांना वर्षा गायकवाड यांनी दिलेली मूर्ती छत्रपती शिवरायांची होती, असा अंदाज आम्ही लावू शकलो. दरम्यान व्हायरल दाव्यातील व्हिडीओ केवळ १८ ते ३२ सेकंदांचा असल्याचे आणि काही दाव्यात “मुंबई काँग्रेसतर्फे जननायक राहुल गांधी यांचा बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती देऊन सत्कार” झाल्याचे आमच्या निदर्शनास आले.

आम्ही मुंबईत झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेसंदर्भातील दीर्घ व्हिडीओ पाहण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाने आपल्या Indian National Congress या युट्युब चॅनेलवर संबंधित कार्यक्रमाचे Live प्रक्षेपण बुधवार दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी केले असल्याचे निदर्शनास आले.

या Live मध्ये आम्हाला दीर्घ व्हिडीओ पाहता आला. सुरुवातीला राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आगमन झाल्याचे यामध्ये पाहता येते. यानंतर १ मिनिटे ३८ सेकंदांवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या स्वागतपर भाषणाची सुरुवात होते. ८ मिनिटे १० सेकंदांपर्यंत त्यांचे भाषण चालते. यानंतर स्वागत केलेल्या वर्षा गायकवाड यांना सत्कार करण्याची विनंती करण्यात येते. ९ मिनिटे १२ सेकंदांवर त्या सत्कार करण्यास सुरुवात करतात. सर्वप्रथम त्या मल्लिकार्जुन खर्गे यांना शाल घालतात त्यानंतर त्यांना राहुल गांधी यांचे स्वागत करण्याची विनंती केली जाते. यावेळी माईकवरील सूचनेनुसार राहुल गांधी यांचा शाल आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती देऊन सत्कार केला जातो. त्यानंतर ९ मिनिटे २४ सेकंदांवर मल्लिकार्जुन खर्गे यांचा शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार केला जातो. यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे कार्यक्रमाची सूत्रे दिली जातात. असे आम्हाला पाहायला मिळाले.

काँग्रेसच्या @INCIndia या X खात्यावर तसेच Indian National Congress या फेसबुक पेजवरही आम्हाला समान व्हिडीओ आणि Live प्रक्षेपणाचे फुटेज पाहायला मिळाले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीसुद्धा संबंधित कार्यक्रमाचे प्रक्षेपण आपल्या X खात्यावरून केले असून त्यामध्येही व्हिडिओमधील वस्तुस्थिती पाहता येईल.

फॅक्ट चेक: महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला? येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: X@kharge

अशाप्रकारे मूळ व्हिडिओतील संदर्भ बदलून राहुल गांधी यांनी शिवरायांचा अपमान केला असल्याचा दावा केला जात असल्याचे दिसुन आले.

अधिक खात्रीसाठी आम्ही थेट ज्यांनी हे सत्कार केले त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी आम्ही दूरध्वनीवरून चर्चा केली. नेमकं काय घडलं असं विचारलं असता, “जे काही घडलं ते व्हिडिओच्या माध्यमातून स्वच्छ आणि सरळ आहे. राहुल गांधी यांचा सत्कार बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती देऊन केला. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांना शिवाजी महाराजांची मूर्ती दिली. दरम्यान विरोधकांनी अकारण खोटे दावे पसरविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतरही आपण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सत्कार करून मूर्ती दिल्या आहेत. राहुल गांधी यांना तर बाबासाहेबांची मूर्ती द्यावी असे माइकवरून सांगण्यात आले होते. असे असताना बदनामीसाठी चुकीचे समज पसरविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.” असे त्या म्हणाल्या. खर्गे यांना शिवाजी महाराजांची मूर्ती देत असताना आपण राहुल गांधी यांना पुढे बोलावले किंवा त्यांच्याकडे पाहून खूण केली का? असे विचारल्यावर त्यांनी “तसे काहीच घडले नाही.” असे सांगितले.

या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या पत्रकारांचा आम्ही शोध घेतला. दरम्यान आम्हाला मुक्त पत्रकार जितेंद्र पाटील या कार्यक्रमाला गेले असल्याची माहिती मिळाली. आम्ही त्यांना कार्यक्रमात राहुल गांधी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला का? असा प्रश्न विचारला. त्यांनी सत्कारावेळी तरी असे काहीही घडले नाही. शिवाय यासंदर्भात व्हायरल होत असलेले दावे खोटे असल्याचे सांगितले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला हा दावा खोटा असल्याचे आणि संदर्भ बदलून करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Our Sources
Google Search
Self Analysis of Viral Video
Live Streaming by Indian National Congress on November 6, 2024
Live streaming by Mallikarjun Kharge on November 6, 2024
Conversation with Varsha Gayakwad, MP And President Mumbai Congress Committee
Conversation with Mr. Jitendra Patil, Journalist.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,944

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.