AI/Deepfake
चंद्रपूरच्या वन विभागाच्या अतिथीगृहावर वाघाचा हल्ला? व्हायरल व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट
Claim
महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील वन विभागाच्या अतिथीगृहावर वाघाने हल्ला केला.
Fact
हा दावा खोटा आहे. संबंधित व्हिडिओ AI जनरेटेड (कृत्रिमरीत्या तयार केलेला) आहे आणि महाराष्ट्र सरकार तसेच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने या दाव्याचे स्पष्ट खंडन केले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. दावा करण्यात येत आहे की महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील वन विभागाच्या अतिथीगृहावर वाघाने हल्ला केला.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“भयावह घटना महाराष्ट्र से! महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के वन अतिथि गृह में दिल दहला देने वाली घटना सामने आई है। सीसीटीवी फुटेज में साफ दिख रहा है कि एक शेर अचानक वहाँ पहुँचता है और वहाँ तैनात चौकीदार पर हमला कर उसे उठा ले जाता है, वन विभाग की टीम मौके पर पहुंचकर जांच में जुटी है। इलाके में दहशत का माहौल है।” अशा कॅप्शनखाली हा दावा मोठ्याप्रमाणात शेयर केला जात आहे.
Fact Check/Verification
अधिकृत संस्थांचे खंडन
फॅक्ट चेक दरम्यान आम्ही यासंदर्भातील कीवर्ड्स सर्च करून पाहिले, आमच्या लक्षात आले की, या घटनेबाबत कोणत्याही अधिकृत वृत्तसंस्थेने किंवा माध्यमाने बातमी प्रकाशित केलेली नाही. जर अशी घटना खरंच घडली असती तर त्याची मोठी बातमी झाली असती.
आणखी शोधताना आम्हाला PIB महाराष्ट्र (केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची अधिकृत संस्था) यांनी 7 नोव्हेंबर 2025 रोजी केलेले ट्विट आढळले. यामध्ये “चंद्रपूर वन विभागाच्या अतिथीगृहावर वाघाने हल्ला केल्याचा व्हिडिओ खोटा आहे. कोणतीही अशी घटना घडलेली नाही. शिवाय संबंधित व्हिडीओ AI तंत्राचा वापर करून बनविण्यात आला आहे.” अशी माहिती मिळाली.
याच दाव्याचे चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाने (DIO Chandrapur) देखील खंडन केले आहे.
7 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी X वर लिहिले आहे की, “वाघाच्या हल्ल्याचा दाखवला जाणारा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. विभागाच्या कोणत्याही अतिथीगृहावर अशा प्रकारची घटना घडलेली नाही.”

चंद्रपूर वनविभागानेही 7 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या ब्लॉगवर सविस्तर स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, “वाघाच्या हल्ल्याचा दाखवला जाणारा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. विभागाच्या कोणत्याही अतिथीगृहावर अशा प्रकारची घटना घडलेली नाही.”

AI डिटेक्शन टूल्सचा निष्कर्ष
यानंतर हा व्हिडिओ Hive Moderation आणि Sight Engine या AI डिटेक्शन साधनांच्या मदतीने तपासण्यात आला.
Hive Moderation ने हा व्हिडिओ 88.1% AI-जनरेटेड असल्याचे संकेत दिले.

Sight Engine ने दृश्यांमधील प्रकाश, सावली आणि वस्तूंची हालचाल नैसर्गिक न वाटल्याने तो कृत्रिमरित्या तयार केलेला (AI Generated) असल्याचा निष्कर्ष दिला.

Conclusion
आमच्या पडताळणीतून स्पष्ट होते की, चंद्रपूरच्या वन विभागाच्या अतिथीगृहावर वाघाने हल्ला केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. अधिकृत शासकीय संस्था, जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने या दाव्याचे खंडन केले आहे. संबंधित व्हिडिओ AI जनरेटेड असून तो कोणत्याही वास्तविक घटनेचा नाही.
Our Sources
X post shared by PIB Maharashtra on November 7, 2025
X post shared by DIO Chandrapur on November 7, 2025
Clarification issued by Forest Department, Chandrapur, on November 7, 2025
Hive Moderation
Sight Engine