Authors
Claim
उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींचे पाय धुवावे असे नाना पटोले म्हणाले.
Fact
हा दावा खोटा आहे. महाराष्ट्र काँग्रेसने हा दावा फेटाळून लावला आहे शिवाय सायबर क्राईम विभागाकडे खोटे वृत्त देणाऱ्या वेबसाईटवर तक्रार केली असून या तक्रारीवरून संबंधित वेबसाईट बंद करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींचे पाय धुवावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“उध्दव ठाकरेंनी राहूल गांधी यांचे पाय धुवावे !! -नाना पटोले. उध्दव ठाकरेंना पटोलेचा मोलाचा सल्ला. गांधी घराण्याने केलेल्या उपकाराची जाण ठेवत उध्दवने राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांचे पाय धुवावेत.शेणक्यांनो काय करणार आता…” अशा कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे. दावा शेयर करण्यासाठी एका न्यूज वेबसाईटच्या स्क्रीनशॉटचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे छायाचित्र वापरण्यात आले असून त्यामध्ये नाना पटोले यांनी “उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसच्या पाठींब्याने वाचला असून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांचे पाय धुवावेत….” असा मजकूर आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आदींची भेट घेतली, या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्या नावे हा दावा व्हायरल केला जात आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्याच्या तपासणीसाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल दाव्यातील बातमीचा स्क्रिनशॉट बारकाईने पाहिला. त्यावर ठळक बातम्या या सदरात ८ ऑगस्ट रोजी ही बातमी ‘परभणी प्रतिनिधी’ या डेटलाइनखाली प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे आमच्या पाहणीत आले. ‘Team MH’ असे लिहिलेले दिसते. मात्र यासंदर्भातील लिंक किंवा वेबसाईटचे संपूर्ण नाव आम्हाला मिळाले नाही. या बातमीचा मूळ स्रोत शोधण्यासाठी त्यावर आम्ही Google वर रिव्हर्स इमेज सर्च केला. मात्र अधिकृत स्रोत मिळाला नाही. मात्र संबंधित स्क्रिनशॉट वापरून करण्यात आलेल्या विविध पोस्ट आम्हाला दिसल्या.
आम्ही पुढील तपासात “उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे पाय धुवावेत: नाना पटोले” या किवर्डसच्या माध्यमातून याबद्दल कोठे बातमी प्रसिद्ध झाली आहे का? हे शोधले. मात्र कोणत्याही अधिकृत माध्यमाने यासंदर्भात बातमी दिल्याचे आमच्या पाहणीत आले नाही. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल याच आघाडीतील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे विधान केले असते तर त्याची मोठी बातमी झाली असती. मात्र तसे आढळले नाही.
नाना पटोले यांनी यासंदर्भात कोठे विधान केले आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही त्यांचे फेसबुक पेज आणि X अकाउंट तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे फेसबुक पेज आणि X अकाउंट धुंडाळले. मात्र आम्हाला नाना पटोले यांनी असे विधान केल्याचे आढळले नाही.
नाना पटोले यांच्या नावे व्हायरल होत असलेले विधान कुठेच अधिकृतरीत्या न सापडल्याने आम्ही महाराष्ट्र काँग्रेसचे माध्यम आणि जनसंपर्क प्रमुख श्रीनिवास भिक्कड यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी हा प्रकार पूर्णपणे खोटा असल्याची माहिती दिली. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे विधान केलेलंच नाही. मात्र अकारण दिशाभूल करण्यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आला आहे. “काँग्रेस नेत्यांची बदनामी करण्यासाठी खोट्या वेबसाईटच्या माध्यमातून असे प्रकार अनेकदा झाले आहेत. यामुळे आम्ही हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. संबंधित खोटे वृत्त प्रसारित करणाऱ्या वेबसाइटबरोबरच ते सोशल मीडियावर पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. काँग्रेस पार्टीतर्फे विधी मानवाधिकार आरटीआय विभागाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष एडव्होकेट रवी प्रकाश जाधव, मुकेश गुप्ता, राज पाठक, राहुल सोनकांबळे आणि इतर कार्यकर्त्यांनी डीसीपी झोन वन डॉ. प्रवीण मुंडे यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. मुख्यत्वे करून या गुन्ह्यामध्ये संजय निरुपम, सुनयना होले, महाराष्ट्र लाईव्ह नावाच्या वेबसाईटचे चालक आणि इतर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि त्याचबरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्याकरिता कायदेशीर तक्रार दाखल केली. दरम्यान सायबर पोलिसांनी https://maharashtralive.in/?p=88 ही वेबसाईट बंद करण्याची कारवाई केली आहे.” असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात दाखल करण्यात आलेली तक्रार आणि इतर कागदपत्रे त्यांनी न्यूजचेकरला उपलब्ध केली असून ती खाली पाहता येतील.
संबंधित तक्रार आणि कारवाई संदर्भातील माहितीची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला असता आम्हाला याबाबत पुष्टी मिळाली. आम्ही संबंधित वेबसाईट बंद करण्यात आली आहे का याचीही खातरजमा करून घेतली असून सदर वेबसाईट बंद असल्याचेच दिसून आले आहे.
आम्ही एकंदर प्रकाराबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माहिती आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनीही “नाना पटोले यांच्या नावे पसरविले जात असलेले विधान हा शुद्ध खोटारडेपणा आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुसंवाद आहे. मात्र अकारण दिशाभूल करण्याचे घातक प्रकार सुरु आहेत.” असे सांगितले.
यावरून व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात, उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींचे पाय धुवावे असे नाना पटोले म्हणाले असे सांगणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने हा दावा फेटाळून लावला आहे शिवाय सायबर क्राईम विभागाकडे खोटे वृत्त देणाऱ्या वेबसाईटवर तक्रार केली असून या तक्रारीवरून संबंधित वेबसाईट बंद करण्यात आली आहे.
Result: False
Our Sources
Google Search
Social media accounts of Maharashtra Congress
Social media accounts of Maharashtra Congress President Nana Patole
Conversation with Shrinivas Bhikkad, PRO, Maharashtra Congress
Conversation with Harshal Pradhan, PRO, Shivsena UBT
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा