Thursday, October 6, 2022
Thursday, October 6, 2022

घरMarathiविधानसभा निवडणुकीतही फेक न्यूजचा धुमाकूळ

विधानसभा निवडणुकीतही फेक न्यूजचा धुमाकूळ

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. प्रचार काळात महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी मतदारांवर आपली छाप पाडण्यासाठी आपल्या क्षमतांचा पूरेपूर वापर करत पारंपरिक व हायटेक प्रचार मोठ्या केला. युवा आणि नवमतदारांची वाढलेली संख्या पाहता यावेळीही सर्वच पक्षांनी फेसबुक, व्हाट्सऑप, ट्विटर आणि अन्य सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मचा वापरही मोठ्या प्रमाणात केला.
 
देशात 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे एक वेगळा इतिहास घडला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाचे बहुमताचे सरकार स्थापन झाले. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयात पारंपारिक प्रचाराशिवाय सोशल मिडियात केलेल्या प्रचाराचा देखील मोठा वाटा होता. एक वेळ सोशल मिडियाच्या प्रचारात नरेंद्र मोदींचा एकाधिकार होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या निवणडणुकीनंतर कांग्रेससह देशभरातील अन्य प्रादेशिक पक्षांनीही सोशल मिडियाचे महत्व ओऴखले. एव्हाना जिओच्या रुपाने इंटरनेट क्रांती झाल्याने गावोगावी 4 जी सेवा पोहचली आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या वाढली. मात्र याच काळात सोशल मिडियात फेक न्यूजचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. 
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही सोशल मिडियात ब-याच प्रमाणात फेक न्यूज, पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्याचा मतदारांवर किंवा पक्षांच्या प्रचारावर किती प्रमाणात परिणाम झाला हे सांगणे कठिण आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत फेक न्यूजचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले. या निवडणुकीतही काही फेक न्यूज परसल्या होत्या ज्यामुळे फारच गोंधळ उडाला होता अशाच फेक न्यूजची प्रातिनिधिक उदाहरणे आपण पाहणार आहोत. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा राज्यातील कित्येक गावांत, शहरांत नेण्यात आली.अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये ही यात्रा पोहचल्यानतंर समाजप्रधोबधनकार किर्तनकार ह. भ. प. निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी भाजपाच्या मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत हजेरी लावली. त्यावेळी सोशल मिडियात इंदोरीकर महाराजांनी भाजपात प्रवेश केल्याचे व काॅंग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची अफवा पसरली.  यावर महाराजांना आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे व कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचे धोरण असल्याचे जाहीर करावे लागले. राजकारणात प्रवेशाबद्दल पसरलेल्या अफवेविषयी मीडिया आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांवरदेखील महाराजांनी आपल्या किर्तनादरम्यान टीका केली. 
 
 
निवडणूकीच्या दरम्यान हायकोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली होती. दरम्यान आरक्षण रद्द झाल्याने सत्ताधारी भाजपा-शिवसेनेचे सरकार कसे नाकर्ते आहे त्यांनी मराठा आरक्षणाबाबत कोर्टात मराठ्यांची सक्षमपणे  बाजू मांडली नाही हेच या पोस्टमधून सांगण्यात येत होते. मात्र मराठा आरक्षणाचे विशेष तज्ज्ञ आणि हायकोर्टाचे वकिल ऑड. अभिजित पाटील तसेच आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही पोस्ट खोटी असल्याचे सांगितले व सरकारने चांगल्या पद्धतीने मराठा आरक्षणावर काम केल्याचे व सरकारचे निर्णय समाजाच्या फायद्याचे असल्याचे सांगितले होते. ही पोस्ट निवडणुकीदरम्यान राजकीय हेतुने परसवण्यात आली असण्याची शक्यता वाटत होती. 
 
 
याशिवाय पक्षांच्या निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांच्या सभा आणि रॅलींच्या खोट्या पोस्ट देखील सोशल मिडियात ब-याच प्रमाणात आढळून आल्या. उदा- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साता-यातील सभेविषयी सोशल मिडिया करण्यात आलेला भ्रामक दावा. साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अवघ्या पाच महिन्यांत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची निवडणूक घेण्यात आली. उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी साता-यात सभा देखील घेतली.  मात्र सहा महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या कोलकातामधील सभेचा व्हिडिओ साता-यातील सभेचा म्हणून सोशल मिडियात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसत होते मात्र सोशल मिडियातील काही जागृत युजर्सनी हा प्रकार उघड केला. 
 
 
याशिवाय वृत्तवाहिन्यांचे लोगो वापरून भ्रामक ग्राफिक्स तयार करूनदेखील फेक न्यूज परसवण्यात आल्या. प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या नावाने ब-याच प्रमाणात खोट्या पोस्ट पसरवण्यात आल्याने वाहिनीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. एबीपी माझ्याच्या लोगोचा वापर करुन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाबद्दल खोटा सर्व्हे व्हायरल करण्यात आला. असाच प्रकार सातारा, कोल्हापूर आणि बीड मध्ये करण्यात आल्याचे उघड झाले. खोट्या ग्राफिक्स द्वारे वाहिन्यांच्या नावाने ओपिनियन आणि एक्झिट पोलही व्हायरल करण्यात आले.
 
 
याशिवाय स्थानिक पातळीवर व्हाट्सअप आणि फेसबुक वर देखील भ्रामक दावे व्हायरल होत होते. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना यावर स्पष्टिकरण द्यावे लागले. कारण त्यांच्याबद्दल सोशल मिडियात ब-याच अफवा परसल्या होत्या.
 
मतदानादिवशीही ईव्हीएमच्या बाबतीत काही फेक न्यूज सोशल मिडियात व्हायरल झाल्या. दुर्गापूर मतदारसंघात खाजगी वाहनातून ईव्हीएममधीन पळवून नेत असल्याची अफवा सोशल मडियात परसवण्यात आली. लोकांनी ईव्हीएम नेत असलेले खाजगी वाहन अडवले थोड्याच वेळात पोलिसही तिथे पोहचले. वाहनातील व्यक्ती या आयोगाशी संबंधित आहेत शिवाय ईव्हीएम पळवून नेले जात नसल्याची माहिती पोलिसांनी दिल्याने अनर्थ टळला.
 
 
या दुर्गापूर ईव्हीएम प्रकरणावर चंद्रपूरच्या जिल्ह्याधिका-यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.
 
 
यावरुन लक्षात येते की या निवडणूकीत सोशल मिडियात व्हायरल झालेल्या फेक न्यूजमुळे राजकीय पक्ष किंवा मतदार यांच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होते हे आपण काही फेक न्यूजच्या उदारणातून जाणून घेतले. फेक न्यूजबद्दल जागरुकतेसाठी प्रत्येक व्यक्तीने सोशल मिडिया साक्षर असणे गरजेचे आहे.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular