एका महिलेच्या आत्मदहनाचा व्हिडिओ सध्या शेयर होत आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची अलीकडील घटना असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


“लखनौ विधानसभे समोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न… भाजपा कार्यालय” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल व्हिडिओच्या की फ्रेम्स काढून गुगल लेन्सद्वारे शोधल्यावर आम्हाला १४ ऑक्टोबर २०२० रोजी अमर उजालाने प्रकाशित केलेले वृत्त मिळाले. वृत्तात घटनेची सविस्तर माहिती दिली गेली आहे. ३५ वर्षीय अंजली तिवारी उर्फ आयेशा (व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी) हिने आत्मदहनाचे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती दिली गेली आहे.

वृत्तानुसार, १३ ऑक्टोबर २०२० रोजी घरगुती हिंसाचाराची तक्रार केल्यानंतर अंजली उर्फ आयेशा जीचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला, तिने लखनौमधील विधानसभेसमोर स्वतःला पेटवून घेतले.
“या महिलेने सांगितले की, तिच्या पहिल्या पतीशी असलेले संबंध संपल्यानंतर तिने तिचे नाव आणि धर्म बदलला आणि आसिफ रझा नावाच्या तरुणासोबत वेगळ्या घरात राहत होती. जेव्हा आसिफ सौदी अरेबियाला गेला तेव्हा ती त्याच्या घरी राहण्यासाठी गेली, परंतु त्याच्या कुटुंबाने तिला घरी घेण्यास नकार दिला. महिलेने पोलिसांकडे तक्रार केली पण तिला कोणतीही मदत मिळाली नाही. ती मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी लखनौला आली. पण तिला यश आले नाही. त्यानंतर, मंगळवारी तिने स्वतःला पेटवून घेतले,” असे वृत्तात म्हटले आहे.
यासंदर्भात व्हायरल व्हिडिओत दिसणारी समान किफ्रेम वापरून १३ ऑक्टोबर २०२० रोजी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेले वृत्तही आम्हाला मिळाले.

“मंगळवारी हजरतगंज येथील विधानसभा मार्गावरील भाजप मुख्यालयाच्या गेट क्रमांक २ जवळ एका ३५ वर्षीय महिलेने रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. एका सतर्क कॉन्स्टेबलने तिला पकडले आणि वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गंभीर भाजली असून सध्या तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.” असा समान मजकूर आम्हाला वाचायला मिळाली.
आणखी तपास करताना लखनौ पोलिसांनी आपल्या अधिकृत X हॅण्डलवरून यासंदर्भात ३ एप्रिल २०२५ रोजी ट्विट करीत सध्या होत असलेल्या दाव्याचे खंडन केले असल्याचे आम्हाला आढळले. “वरील व्हिडिओ २०२० सालचा आहे, ज्यामध्ये हजरतगंज पोलिस स्टेशनने वेळेवर कारवाई केली आहे. कृपया व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने पसरवून अफवा पसरवू नका, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.” असे ट्विट मध्ये लिहिण्यात आले आहे.

Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात महिलेने आत्मदहन केल्याचा व्हिडिओ २०२० मध्ये लखनौमध्ये घडलेल्या एका घटनेचा असून सध्याचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेत सदर महिलेचा मृत्यू झाला होता.
Our Sources
News published by Amar Ujala on October 14, 2020
News published by Times of India on October 13, 2020
Tweet made by Lucknow Police on April 3, 2025