एमआरएफ टायर उत्पादन कंपनीच्या गोवा येथील प्लांटसाठी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आयोजित नोकर भरती प्रक्रिया अचानक रद्द झाली. सुरुवातीला जाहीर झालेली ही प्रक्रिया अचानक रद्द झाल्याने यावर चर्चा सुरु आहे. यासंदर्भात आम्हाला जे समजले ते या आर्टिकलमध्ये वाचता येईल.
कधी होणार होती भरती?
उपलब्ध माहितीनुसार ही भरती प्रक्रिया २५० जागांसाठी होणार होती. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी या प्रक्रियेचे आयोजन कुडाळ येथील नाथ पै शिक्षण संस्थेत करण्यात आले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष धीरज परब या प्रक्रियेचे आयोजक असल्याची माहिती आम्हाला उपलब्ध बातम्यांमध्ये मिळाली. अशा बातम्या येथे, येथे आणि येथे पाहता येतील.



त्या पोस्टमुळे आले गंडांतर
कुडाळ येथे भरती प्रक्रिया या बातम्या खोट्या असून प्रत्यक्षात ही प्रक्रिया १२ सप्टेंबर रोजीच होणार असली तरी ती कुडाळ येथे नव्हे तर फार्मागुडी, गोवा येथील आयटीआयमध्ये होणार आहे. अशा पोस्ट प्रसारित झाल्या. अशा पोस्ट येथे आणि येथे पाहता येतील.


“एमआरएफ लिमिटेडने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रातील कुडाळ येथे एमआरएफ गोवासाठी भरती मोहिमेबद्दल व्हायरल झालेली बातमी खोटी आहे.” असे पोस्टमध्ये लिहिण्यात आल्याने कुडाळ येथे होत असलेल्या भरती प्रक्रियेवर गंडांतर आले. शिवाय कुडाळ येथे एमआरएफ कंपनीच्या नावावर भरती प्रक्रिया आयोजित केलेल्या आयोजकांच्या विश्वासार्हतेचा प्रश्नही गंभीर बनला.
आयोजकांचे म्हणणे काय?
महाराष्ट्रातील कुडाळ येथे एमआरएफ गोवासाठी भरती मोहिमेबद्दल व्हायरल झालेली बातमी खोटी आहे असे सांगितल्यात आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम ही भरती प्रक्रिया ज्या कुडाळ येथील नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आली होती त्या शिक्षण संस्थेशी संपर्क साधला. आम्ही संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्याशी बोललो. त्यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच परिसरातील बेरोजगार युवकांना एका चांगल्या कंपनीत रोजगार मिळणार आहेत यासाठी आम्ही भरती प्रक्रियेसाठी आमच्या शिक्षण संस्थेचे सभागृह उपलब्ध करून दिले आहे. आयोजक धीरज परब यांनी एमआरएफ कंपनीसाठी हे आयोजन केले होते. दरम्यान कंपनीने नकार दिला असल्यास आपण आयोजकांशी संपर्क साधावा.” अशी माहिती दिली.
यानंतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आणि भरती प्रक्रियेचे आयोजक धीरज परब यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “गोव्यातून एमआरएफ कंपनीला दुसऱ्या राज्यातील भरती करण्यास विरोध झाल्याने कंपनीने हा पवित्र घेतला आहे. मात्र यामुळे आमची अवस्था बिकट झाली आहे. एमआरएफ च्या वतीने संबंधित भरती प्रक्रियेचे आयोजन करणाऱ्या लॉगस्कीम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विनंती केल्यावरून आणि आवश्यक ईमेलद्वारे खातरजमा झाल्यानंतरच मी आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. आता एमआरएफ जर येथील भरती प्रक्रियेला खोटे ठरवीत असेल तर आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.” असे सांगून संबंधित ईमेलचे स्क्रीनशॉट्स आम्हाला उपलब्ध करून दिले.

दरम्यान आम्ही धीरज परब यांनी सांगितलेल्या लॉगस्कीम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी ज्यांचा क्रमांक भरती प्रक्रियेसाठी जाहीर केलेल्या माहिती पत्रकातही होता त्या संदीप चौगुले यांना संपर्क साधला. त्यांनी “एमआरएफ च्या या भूमिकेमुळे आम्ही सर्वजण आणि विशेषतः आयोजनात प्रमुख सहकार्य करणारे धीरज परब अडचणीत आले आहेत.” असे सांगितले. “लॉगस्कीम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपण एमआरएफ तसेच इतर अनेक कंपन्यांसाठी भरती प्रक्रियेत एक दुवा म्हणून काम करतो. आम्ही संपूर्ण भारतात एमआरएफ साठी यापूर्वीही भरती प्रक्रिया राबवलेल्या आहेत. यावेळीही आमच्या कंपनीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनच ही प्रक्रिया घेत होतो. या प्रक्रियेला उमेदवार निवडीसाठी एमआरएफ चे एच आर प्रतिनिधीही येणार होते. स्थानिक पातळीवर सहकार्यासाठी आम्ही आयोजक म्हणून काम करण्याची विनंती जिल्हा मनसेला केली होती, त्यानुसार त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.” अशी माहिती दिली.
दरम्यान “गोव्यातून विरोध झाल्याने कंपनीने आपला पवित्र बदलला असून आम्हाला तोंडघशी पाडले आहे.” असेही लॉगस्कीम सोल्युशन्सचे संदीप चौगुले म्हणाले.
गोव्यातून असा झाला विरोध
कुडाळ येथील एमआरएफच्या भरती प्रक्रियेला गोव्यातून विरोध झाला असा उल्लेख आल्याने आम्ही यासंदर्भात शोध घेतला.
आम्हाला कोकण साद ने ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी सापडली. यामध्ये सिंधुदुर्गमधील एमआरएफ टायर्सच्या नोकर भरतीवरून गोव्यात राजकीय वादंग निर्माण झाल्याचे लिहिलेले आढळले.

goemkarponn.com या वेबसाईटने ११ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या बातमीनुसार “फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एमआरएफ टायर्सच्या भरती मोहिमेबद्दल भाजप सरकारचा निषेध केला आहे आणि त्याला “गोव्यातील तरुणांचा उघड विश्वासघात” म्हटले आहे.” अशी माहिती मिळाली.
आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एमआरएफच्या या भरती प्रक्रियेवरून गोवा सरकारला घेरल्याचे आणि विरोध केल्याचे आम्हाला त्यांच्या फेसबुक पोस्टमधून पाहायला मिळाले.

गोव्यातील स्थानिक युवकांना रोजगार देण्याऐवजी एमआरएफ कंपनीने महाराष्ट्रातून उमेदवार भरती प्रक्रिया सुरु केल्याच्या प्रकाराचा विरोध करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रभू यांनी थेट एमआरएफ गोव्याचे ऑपेरेशन आणि विक्री हेड सुजित नायर यांची भेट घेऊन त्यांनी अशी भरती गोव्याबाहेर घेतली जाणार नसून स्थानिकांना प्राधान्य मिळेल अशी ग्वाही मिळाल्याचे आपल्या ११ सप्टेंबर २०२५ रोजीच्या फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केले.

एमआरएफचे मौन
कुडाळ येथे होत असलेल्या भरती प्रक्रियेला गोव्यातून विरोध झाल्याने गंडांतर आले का? यासंदर्भात माध्यमात किंवा एमआरएफ कडून कुठेही अधिकृत स्वरूपात स्पष्टीकरण मिळाले नाही.
यासाठी आम्ही एमआरएफ कंपनीने असा पवित्र किंवा निर्णय का घेतला? किंवा ही प्रक्रिया त्यांची नव्हतीच का? हे जाणून घेण्यासाठी एमआरएफ गोवाचे ऑपेरेशन आणि विक्री हेड सुजित नायर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी कुडाळ येथे आमची भरती होणार नाही हे माध्यमांद्वारे स्पष्ट केलेले असून विषय संवेदनशील असल्याने अधिक काहीही बोलले जाणार नाही. अशी माहिती मिळाली.
मात्र यामुळे कुडाळ येथील भरती प्रक्रिया एमआरएफ ने आधी नियोजित केली होती का? हा प्रश्न अनुत्तरित राहिला असून एमआरएफने मौन बाळगले आहे. उत्तर आल्यावर हा लेख अपडेट केला जाईल.
Our Sources
Report published by Sanwad Media on September 9, 2025
Report published by Apla Sindhudurg on September 9, 2025
Report published by Kokanai on September September 10, 2025
X post shared by In Goa on September 11, 2025
Instagram post shared by The Goan Online on September 11, 2025
Facebook post shared by Vijay Sirdesai on September 11, 2025
Facebook post shared by Milind Prabhu on September 11, 2025
Telephonic conversation with Nath Pai Shikshan Sanstha
Telephonic conversation with MNS Dist President and Organisor Dheeraj Parab
Telephonic conversation with Represantitive of Logskim Solutions Sameer Chougule
Telephonic conversation with Sujith Nair, Head Manufacturing Operations, MRF, Goa