Saturday, December 21, 2024
Saturday, December 21, 2024

HomeFact CheckFact Check: योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तामिळनाडू येथील तरुण आकाशात उडतो? व्हायरल...

Fact Check: योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तामिळनाडू येथील तरुण आकाशात उडतो? व्हायरल दावा खोटा असल्याचे उघड

Claim
योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तामिळनाडू येथील तरुण आकाशात उडतो.

Fact
त्या तरुणाच्या आकाशात उडण्यामागे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची करामत आहे, योगविद्येची नाही.

योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तामिळनाडू येथील तरुण आकाशात उडतो, असा दावा एक व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या युवकाने योगविद्या आणि साधनेच्या जोरावर हे शक्य करून दाखविले आहे. वैज्ञानिक आणि शास्रज्ञ देखील यामुळे हैराण झाले आहेत. पवनपुत्र हनुमान आणि रामचरित मानस ला काल्पनिक म्हणणाऱ्यांना हे खुले आव्हान आहे. असे दावे मागील वर्षभरापासून जोरदारपणे केले जात आहेत. ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

Fact Check: योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तामिळनाडू येथील तरुण आकाशात उडतो? व्हायरल दावा खोटा असल्याचे उघड
Courtesy: Facebook/ Uday Kumar Singh

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तो आकाशात उडतो? व्हायरल दावे अर्धसत्य असल्याचे उघड
Screengrab of Whatsapp tipline

या दाव्याची मूळ कॅप्शन “यह लड़का तमिलनाडु का रहने वाला है, इसने योग विद्या के बल पर आसमान में उड़कर दिखाया। यह देखकर वैज्ञानिक भी हैरान हैं। श्रीरामचरित मानस और पवनपुत्र श्री हनुमान जी को काल्पनिक बताने वालों के लिये खुली चुनौती !!” अशी हिंदी आहे. मराठी सोशल मीडिया युजर्स हीच कॅप्शन आणि सदर व्हिडीओ रिट्विट, शेयर आणि फॉरवर्ड करीत आहेत. असे आम्हाला पाहायला मिळाले.

Fact check/ Verification

योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तामिळनाडू येथील तरुण आकाशात उडतो, हा दावा खरा आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही किवर्ड सर्च च्या माध्यमातून शोधून पाहिले. आम्हाला असाच दावा करणाऱ्या हजारो पोस्ट पाहायला मिळाल्या. याचवेळी शोध घेत असताना आम्हाला Vignesh prabhu या युट्युब चॅनेलवर व्हायरल व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

चार वर्षांपूर्वी ८ ऑगस्ट २०१८ रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओची कॅप्शन “FLYING MAN OF INDIA at 160 FEET | Magician Vignesh prabhu | Exclusive flying magic | Jai hind” अशी दिसली. या चॅनेल च्या शोधातून आम्हाला विघ्नेश प्रभू हा तरुण एक जादूगार असल्याचे, तो स्वतः या व्हिडिओमध्ये असल्याचे आणि त्याने स्वतः आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करून १६० फूट उंच उडू शकणार फ्लाईंग मॅन असे संबोधल्याचे आमच्या लक्षात आले. व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण ३६० डिग्री चा शूट उपलब्ध केला असून इतर जादूगारांप्रमाणे क्रेन सारख्या गोष्टींचा उपयोग केलेला नाही. असे स्वतः विघ्नेश प्रभू या जादूगार तरुणाने सांगितले आहे.

आम्ही जादूगार विघ्नेश प्रभू याची अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला magicvignesh.com वर त्याची संपूर्ण माहिती मिळाली.

Fact Check: योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तो आकाशात उडतो? व्हायरल दावे अर्धसत्य असल्याचे उघड
Courtesy: magicvignesh.com

विघ्नेश हा तामिळनाडूचा रहिवासी असून तो आंतरराष्ट्रीय जादूगार, मेंटॅलिस्ट आणि इल्युजनिस्ट असल्याची माहिती आम्हाला मिळाली. मायाजाल रत्न हा पुरस्कार मिळालेला तो भारतातील एकमेव असल्याचेही आम्हाला वाचायला मिळाले. विघ्नेश ने फेसबुकवर याचे प्रमोशनल पोस्टर शेयर केले आहे. तसेच आपल्या वेबसाईटवर ‘द इल्युजन शो’ या शीर्षकाखाली आपल्या इव्हेंटची माहिती दिली आहे.

विघ्नेश प्रभू याने स्वतःच हा व्हिडीओ अपलोड आणि प्रमोट केला असल्याचे आणि आपण उडू शकतो असा दावा केला असल्याचे आम्हाला पाहायला मिळाल्यानंतर आम्ही यासंदर्भात आणखी शोध घेतला. आम्हाला Magic Secrets Revealed या युट्युब चॅनेलवर २७ डिसेंबर २०१९ रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ पाहायला मिळाला. क्रेन सारख्या तंत्राचा तसेच एडिटिंग सॉफ्टवेयर चा वापर करून जादूगार कसे आपण हवेत उडू शकतो याचा आभास निर्माण करतात याची माहिती आम्हाला पाहायला मिळाली.

याचबरोबरीने याच व्हिडिओचा वापर करून विघ्नेश प्रभू याचा दावा खोडून काढणारा आणखी एक व्हिडीओ आम्हाला तामिळनाडू येथील VALKAIPADAM या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळाला.

यासंदर्भात जाणून घेण्यासाठी न्यूजचेकर ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्याशी संपर्क साधला. ” हा टू मिनिट्स टू फेम चा प्रकार आहे. सोशल मीडियाच्या विस्ताराचा वापर करून केला गेलेला प्रोपोगंडा आहे. कोणतीही जादू सादर करण्याची एक पद्धत असते. जादू सादर करण्यासाठी काही साधने लागतात. पूर्वी ही साधने तयार करणारे कारागीर कमी होते. आज त्यांची संख्या वाढली आहे. त्यांचा वापर आणि तंत्रज्ञानाचा प्रयोग करून हे असे प्रकार केले जातात. त्याला योगसाधना सारखं नाव दिलं की मीडियाचं लक्ष सहज जातं. ख्रिस एंजेल नावाचा अमेरिकन जादूगार स्ट्रीट मॅजिक च्या नावाखाली दहा वर्षांपूर्वी पासून असे प्रकार करतो. ट्रिक लोकांच्या लक्षात येऊ नये याची काळजी म्हणून कमी गर्दीत त्याचे शो होतात. विघ्नेश प्रभू ने ही हा प्रयोग व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलाय. प्रत्यक्षात गर्दीसमोर असा प्रयोग त्याने केलेला नाही. लक्षात घ्या, योगसाधना ने असं जर उडता आलं असतं तर बस, विमान सारखी प्रवासाची साधने लागलीच नसती. असे प्रकार अल्पशिक्षित समाजात अंधश्रद्धा निर्माण करतात. जादू ही शास्त्रावर आधारित आहे, आणि विघ्नेश ने जे काही केले आहे ते जादू नसून एक कॅमेरा ट्रिक आहे.” असे त्यांनी सांगितले.

योग साधना करून आकाशात कोणत्याही आधाराशिवाय उडता येते का? अशी कोणती विशिष्ट योगासने आहेत का? यासंदर्भात आम्ही शोध घेतला. मात्र आम्हाला तशी कोणतीही माहिती मिळाली नाही.

अंगाला विशिष्ट पद्धतीने दोर बांधून क्रेन च्या साहाय्याने उडतानाचा व्हिडीओ विघ्नेश प्रभू या जादूगाराने स्वतः बनविला असल्याचे आमच्या तपासात पाहायला मिळाले. दरम्यान या व्हिडिओत आकाशात कोणत्याही मदतीशिवाय उडण्याचा बहाणा करण्यात आला असून ते सत्य दाखविण्यासाठी काही नियोजनबद्ध हालचाली करण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ जाणीवपूर्वक आणि मनोरंजनासाठी बनविण्यात आला असून यामध्ये प्रेक्षकांनी केलेले हावभाव सुद्धा ठरवून केलेले आहेत.

Conclusion

योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तामिळनाडू येथील तरुण आकाशात उडतो, हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. विघ्नेश प्रभू हा तरुण जादूगार आहे. त्याने असे असंख्य प्रयोग केले आहेत. या तरुणाच्या आकाशात उडण्यामागे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची करामत आहे. योगविद्येची कोणतीही करामत असल्याचे आम्हाला पाहायला मिळालेले नाही.

Result: False

Our Sources

Video uploaded by Vignesh Prabhu Youtube channel on August 8, 2018

Video uploaded by Magic Secrets Revealed Youtube channel on December 27, 2019

Video uploaded by VALKAIPADAM Youtube channel on August 19, 2018

Conversation with famous magician Jitendra Raghuvir


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular