Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
महाराष्ट्रात १ जूनपासून मिळणार तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत.
हा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा संदर्भ बदलून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात १ जूनपासून मिळणार तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत मिळणार आहे, असा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक, युट्युब आणि X च्या माध्यमातून हा दावा केला जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या व्हॉट्सअप टिपलाइनवर (+91-9999499044) आम्हाला अनेक दावे मिळाले, ज्यात युजर्सनी आम्हाला तथ्य तपासण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून हा दावा केला जात आहे.
सर्वप्रथम आम्ही व्हायरल दाव्यातील व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. व्हायरल दाव्यामध्ये एक व्हिडीओ असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना दिसतात. ते म्हणतात की, “संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत, या सगळ्यांना त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण तीनशे युनिटपर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची त्यांना एक पैसे विजेचं बिल भरावं लागणार नाही. अशा प्रकारची योजना आता आपण या महाराष्ट्रामध्ये राबवतो आहोत.” दरम्यान त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सोलारच्या अंतर्गत आणून ही योजना राबविली जाणार आहे असे सांगितल्याचे आणि यासाठी कोणतीही तारीख जाहीर केलेली नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.
व्हिडिओच्या पुढील भागात मात्र एक अँकर बोलताना ऐकू येतो. त्यात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा घेण्यासाठी हा अभूतपूर्व निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
यावरून संशय आल्याने आम्ही व्हायरल व्हिडिओतील प्रमुख किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असणारी किफ्रेम आणि त्यानंतर ग्राफिक्स आणि व्हॉइसओव्हर च्या माध्यमातून केलेल्या व्हिडिओची किफ्रेम आम्ही स्वतंत्रपणे तपासली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या किफ्रेमवरील रिव्हर्स इमेज सर्च केली असता आम्हाला, १३ एप्रिल २०२५ रोजी लोकशाही चॅनेलने Live प्रक्षेपित केलेला चॅनेलच्या युट्युब खात्यावरील व्हिडीओ पाहायला मिळाला. या व्हिडिओत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यात भाषण करीत असताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोशाखात पाहायला मिळतात. दरम्यान हा व्हिडीओ बारकाईने पाहिला असता आम्हाला व्हायरल व्हिडिओत त्यांचे हे भाषण क्लिप करून वापरण्यात आले असल्याचे दिसून आले.
भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्याच्या विकासासंदर्भात बोलताना ऐकू येतात. यानंतर विकासासाठी आलेल्या गुंतवणुकीसंदर्भात बोलतात. निरी मिर्जापूर या गावाने केलेल्या प्रयत्नातून सौर ऊर्जा ग्राम ही ओळख मिळविली आहे यासंदर्भात बोलत असताना या गावाला लागणारी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे. त्यांना विजेचं एक पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही. असे ते सांगतात.
यानंतर ५ मिनिटे २७ सेकंदांवर बोलताना “मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली, त्या प्रधानमंत्री मुफ्त बिजली घर योजनेअंतर्गत या गावातल्या लोकांना आता पूर्णपणे मोफत वीज मिळणार आहे. आपण असा प्रयत्न करतो आहोत की येत्याकाळामध्ये आपण योजना आणतो आहोत ज्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत यासगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्यघर मोफत बिजली योजना आहे, त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण तीनशे युनिटपर्यंत वीज वापरतात त्यांना सोलारच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची की त्यांना एक पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही, अशा प्रकारची योजना आता आपण या महाराष्ट्रामध्ये राबवतो आहोत.”
यातून मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील “यासगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्यघर मोफत बिजली योजना आहे, त्या योजनेला…” हा भागही गाळून संदर्भ बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
व्हायरल व्हिडिओतील दुसऱ्या किफ्रेमचे रिव्हर्स इमेज सर्च केले असता संबंधित व्हिडीओ @SpardhaParikshaAcademy या युट्युब चॅनेलने “खुशखबर! 1 जून 2025 पासून वीज ग्राहकांना 300 युनिट पर्यंत वीज बिल येणार नाही | लाईट बिल 0 रुपये येणार” या शीर्षकाखाली २९ मे २०२५ रोजी अपलोड केला असल्याचे निदर्शनास आले. त्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
दरम्यान या व्हिडिओच्या माध्यमातून युट्युब, फेसबुक आणि X वर दिशाभूल सुरु असल्याचे आमच्या लक्षात आले.
यासंदर्भात अधिक तपास करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ जून २०२५ रोजी आपल्या युट्युब चॅनेलवर घातलेला “No Electricity Bill up to 300 Units|300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे वीज बिल शून्यावर आणणार” या शीर्षकाखाली असलेला व्हिडीओ सापडला.
महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन ८ जून २०२५ रोजी पुणे येथे झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व शासकीय कार्यालयांचे १००% सौरऊर्जेकरण करण्याचा आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्धार जाहीर केला.
त्यांनी महाराष्ट्राच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील नेतृत्वाची आणि रशियासोबत थोरियम आधारित मॉड्युलर रिऍक्टर्स प्रकल्पाच्या सहकार्याची माहिती देत २०३० पर्यंत ६०% वीज अपारंपरिक स्रोतांतून मिळवण्याचे लक्ष्य स्पष्ट केले. दरम्यान त्यांनी सौर ऊर्जेच्या जोरावर गावांना स्वावलंबी बनवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आखले असल्याचे व वीज बिल माफी १ जूनपासून लागू करण्याचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे लक्षात येते. संबंधित व्हिडीओ खाली पाहता येईल.
यासंदर्भात आम्ही महावितरणच्या विभागीय पीआरओंशीही संपर्क साधला असता आम्हाला अशाप्रकारची कोणतीही वीजमाफी जाहीर करण्यात आलेली नसून हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले.
अशाप्रकारे आमच्या तपासात महाराष्ट्रात १ जूनपासून मिळणार तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Video published by Lokshahi on April 13, 2025
Video pubished by Spardha Pariksha Academy on May 29, 2025
Video published by Devendra Fadanvis on June 8, 2025
Conversation with PRO, Mahavitran
Runjay Kumar
June 2, 2025
Prasad S Prabhu
May 21, 2025
Prasad S Prabhu
April 29, 2025