Authors
Claim
पुण्यातील यशोदा इस्पितळात रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा करणारे विनामूल्य औषध मिळते.
Fact
हा दावा पूर्णपणे खोटा आहे असे संबंधित इस्पितळाने कळविले आहे. येथे रक्ताच्या कर्करोगावर उपचार होतात मात्र पूर्णपणे बरा होणारे विनामूल्य औषध हा प्रकार चुकीचा समज पसरवून दिशाभूल करणारा आहे.
पुणे येथील यशोधा हेमाटोलॉजि कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये रक्ताच्या कर्करोगावर प्रभावी औषध मिळाले आहे. हे औषध हा कर्करोग पूर्णपणे बरा करते आणि औषध पूर्णपणे विनामूल्य आहे. असा संदेश सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
“खूप खूप तातडीचा आणि महत्वाची बातमी. पुण्यामध्ये उपलब्ध कृपया हा संदेश वाचल्यानंतर इतरांना पाठवा. मी सुद्धा तेच केले आहे. *माझ्या प्रिय मित्रांनो रक्ताच्या कर्करोग वर औषध सापडले आहे. पुन्हा एकदा विनंती हा संदेश इतरांना पाठविल्या शिवाय पुसून टाकू नका. मला जास्तीत जास्त शक्य होईल तेवढ्याना मी पाठवीत आहे. कोट्यवधी भारतीयांना तो पोहचू द्या. ,IMITINEF MERCILET हे औषध आहे जे रक्ताचा कर्करोग बरा करते. ते औषध पुणे येथील यशोधा हेमाटोलॉजि कैंसर इन्स्टिट्यूट पुणे येथे विना मूल्य उपलब्ध आहे. जागृती निर्माण करा याचा कुणालातरी उपयोग होऊ शकतो. : 020-24484214 09590908080 109545027772 X 4 पत्ता-यशोदा हेमाटोलॉजि क्लिनिक 109 मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स हिराबाग चौक टिळक रोड पुणे 411002.” असे हा मेसेज सांगतो.
आमच्या व्हाट्सअप टिपलाइनवर (9999499044) समान दावा उपलब्ध झाला असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल मेसेजमध्ये रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरे करणारे विनामूल्य औषध असा उल्लेख असल्याने गुगलवर किवर्ड सर्च च्या माध्यमातून यासंदर्भात काही माहिती मिळते का? याचा शोध घेतला. आम्हाला गुगलवर तसे काहीच सापडले नाही. पुण्यातील हॉस्पिटलचे नाव देऊन दावा करण्यात आलेला असताना आम्हाला रक्ताच्या कर्करोगावरील औषध आणि त्यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध झाली नाही.
व्हायरल मेसेजमध्ये 020-24484214, 09590908080, 109545027772 संपर्कासाठी हे क्रमांक देण्यात आले आहेत. आम्ही त्या सर्व क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्व क्रमांक अस्तित्वात नसल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही ट्रू कॉलर वर हे क्रमांक शोधले असता, योग्य माहिती मिळू शकली नाही.
यासाठी आम्ही गुगलवर “यशोधा हेमाटोलॉजि कैंसर इन्स्टिट्यूट पुणे” चा नंबर शोधला. आणि थेट कॉन्टॅक्ट करून व्हायरल मेसेज संदर्भात विचारले असता, आम्हाला इस्पितळाचे समन्वयक समीर निकम यांनी यासंदर्भात माहिती दिली. “यशोदा हेमॅटोलॉजि कँसर इन्स्टिटयूट अस्तित्वात आहे. व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आलेला पत्ताही बरोबर आहे. मात्र रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा करणारे विनामूल्य औषध इथे मिळते हा संदेश खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. इस्पितळात कर्करोगावर निदान आणि उपचार होतो. मात्र कोणतेही औषध कर्करोग पूर्णपणे बरा करते असा दावा कोणालाही करता येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने हा संदेश तयार करून इस्पितळाचे क्रमांक त्यामध्ये घातले. यामुळे वारंवार त्यावर मोफत उपचारासाठी फोन येऊ लागले, यामुळे आम्ही ते फोन क्रमांक बंद केले आहेत. येथे मोफत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे कोणीही या मेसेजवर विश्वास ठेऊ नये.” असे आवाहन त्यांनी केले आहे. “इस्पितळासंदर्भात कोणीही गैरसमज करून घेऊ नयेत. योग्य माहिती आणि झालेली दिशाभूल दूर करून घेण्यासाठी रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक 9146189681 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.” अशी माहिती त्यांनी दिली.
व्हायरल मेसेजमध्ये “IMITINEF MERCILET” हे औषध आहे जे रक्ताचा कर्करोग बरा करते.” असा उल्लेख आम्हाला आढळला. यासंदर्भात आम्ही समन्वयक समीर निकम यांच्याशी संपर्क साधला असता, “हा समजही चुकीचा असून असे कोणतेही औषध कर्करोग पूर्णपणे बरा करण्याचा दावा करू शकत नाही.” अशी माहिती त्यांनी दिली.
आम्ही या नावाने गुगलवर शोध घेतला असता, avensonline वर प्रकाशित एका शोधनिबंधात या औषधांसंदर्भात पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
हे औषध ‘क्रोनिक मेलॉइड ल्युकेमिया’ नावाच्या कर्करोगावर उपचारासाठी वापरले जाते. हा रक्ताच्या कर्करोगाचाच एक प्रकार आहे. हे औषध संपूर्ण भारतात मिळते. ठराविक ठिकाणीच आणि विनामूल्य मिळते हा दावा खोटा आहे. दरम्यान इंटरनेटवर उपलब्ध खोटा संदेश व्हायरल करू नये. असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात पुण्याच्या यशोदा इस्पितळात रक्ताच्या कर्करोगावर विनामूल्य आणि पूर्ण बरे करणारे औषध मिळते, असे सांगत व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले आहे.
Result: False
Our Sources
Google Search
Conversation with Samir Nikam, Co-ordinator, Yashodha Hematology Cancer Institute, Pune
Article published by avensonline.org
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in