Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूट करण्याच्या उद्देशाने खिळे टाकण्यात आले.
हा दावा दिशाभूल करणारा आहे. महामार्गावर खिळे नव्हे तर तडे बुजवण्यासाठी नोजल्स लावण्यात आले होते.
समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूट करण्याच्या उद्देशाने खिळे टाकण्यात आले, असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे.


“समृद्धी महामार्गावर कशाप्रकारे प्रवाशांची लूट करण्याच्या उद्देशाने लोकं खिळे टाकतात व काय काय उद्योग करतात बघा, निषेध असं करणाऱ्या लोकांचा, निषेध चोरांचा….” अशा कॅप्शनखाली हा दावा व्हायरल झाला आहे.
न्यूजचेकरच्या तपासात हा प्रकार चोरट्यांनी खिळे टाकून लुटीचा नव्हे तर राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गावरील तडे निवारण्यासाठी घातलेल्या अल्युमिनिमन नोजलचा असल्याचे दिसून आले आहे.
एकंदर प्रकाराच्या चौकशीसाठी आम्ही कीवर्ड सर्च केला असता आम्हाला आढळले की समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर जवळ रस्त्यावर खिळे सदृश्य वस्तू पडल्याने अनेक वाहने पंक्चर झाल्याचे प्रकार घडले मात्र हा प्रकार खिळे टाकण्याचा नव्हता तर राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गावरील तडे निवारण्यासाठी घातलेल्या अल्युमिनिमन नोजल घातल्या होत्या. यासंदर्भात लोकमतने १० सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकमतने आपल्या बातमीत राज्य रस्ते विकास महामंडळाने याबद्दल स्पष्टीकरण दिले असल्याचे म्हटल्याने आम्ही ते स्पष्टीकरण शोधले.
आम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या माहिती विभागाने आपल्या फेसबुक पेजवरून १० सप्टेंबर २०२५ रोजी सदर स्पष्टीकरण प्रसिद्ध केले असल्याची माहिती मिळाली.

“हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील (साखळी क्र. ४४८+६४०) ठिकाणी सुमारे १५ मीटर लांबीच्या भागात सूक्ष्म तडे (Minor Cracks) पडले होते. या तड्यांवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्ती दरम्यान ‘अॅल्युमिनियम’चे नोझल्स वापरले गेले होते.” अशी माहिती आम्हाला वाचायला मिळाली.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक रुपाली गरवारे यांनी या भागाची पाहणी करून हा प्रकार लोकांना लुटण्यासाठी झालेला नसून ही प्रक्रिया महामार्ग विभागाने केलेली होती हे स्पष्ट केल्याचे आम्हाला दिसून आले.

यासंदर्भात आम्ही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात PRO विभागाशी संपर्क साधला असता, व्हायरल दावा चुकीचा आहे. हे अल्युमिनिमन नोजल असून खिळे नाहीत. शिवाय महामार्गावरील इपॉक्सी ग्राऊटींगसाठी घालण्यात आले होते. अशी माहिती देण्यात आली आहे.
एकंदर घटनेत चोरट्यांनी खिळे टाकल्याचा निर्माण झालेला संशय किंवा रस्ते महामंडळानेच नोजल बसविलेले असतानाही महामार्ग सुरु राहून वाहनांचे झालेले नुकसान हा गोंधळ का झाला? याची माहिती शोधण्यासाठी आम्ही स्थानिक पत्रकार विश्वास कदम यांच्याशी संपर्क साधला असता, एकंदर कारभार रस्ते विकास महामंडळाच्या गलथान कारभारामुळे झाला आहे. महामार्गावर नोजल बसविणार असतांना स्थानिक पोलिसांना याची कल्पना देऊन वाहतूक रोखण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्याने हा गोंधळ झाला आहे. अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली.
अशाप्रकारे आमच्या तपासात समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूट करण्याच्या उद्देशाने खिळे टाकण्यात आले हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Report published by Lokmat on September 10, 2025
Facebook post shared by DIO Chatrapati Sambhajinagar on September 10, 2025
Telephonic conversation with PRO MSRDC
Telephonic conversation with journalist Vishwas Kadam