Authors
Claim
बिर्यानीत नपुसकत्वाचे औषध मिसळून जिहाद करणाऱ्यांना कोईमतूर पोलिसांनी पकडले असून बिर्यानी खाताना सावध राहा.
Fact
हा अकारण अफवा पसरविण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले असून असे करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे.
“बिर्यानी खाताय….तर सावधान! असे सांगणारा एक मेसेज सध्या सर्वत्र मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. कोईमतूर पोलिसांनी एक रॅकेट उघड केले आहे. बिर्यानीमध्ये नपुसकत्वाचे रासायनिक औषध घालून विकणाऱ्यांना अटक झाली आहे. कृपया काळजी घ्या,” असे हा दावा सांगतो.
सोशल मीडियावर असंख्य यूजर्स हा दावा शेयर करीत आहेत.
या दाव्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहता येईल.
Fact Check/ Verification
कोईमतूर येथे जिहादी बिर्यानी च्या नावाखाली व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये आम्हाला अनेक छायाचित्रे वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. यापैकी तीन छायाचित्रांवर शोध घेऊन त्यांची सत्यता तपासण्याचा प्रयत्न आम्ही केला.
छायाचित्र क्र. १
या बिर्यानी विक्रेत्याच्या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च केला असता, बिर्याणी विक्रेत्याचे हे चित्र थंबनेल इमेज म्हणून विविध यूट्यूब व्हिडिओंवर बर्याच वेळा वापरण्यात आले आहे. असे आमच्या निदर्शनास आले.
हा व्हिडिओ जून २०१६ मध्ये “Indian Muslim festival DUM BIRYANI Preparation for 30 People & STREET FOOD” या मथळ्यासह अपलोड करण्यात आला होता. यावरून सदर चित्र २०१६ पासूनच इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आम्हाला समजले.
छायाचित्र क्र. २
बिर्यानीमध्ये हे औषध मिसळलेले जात आहे, या संदर्भाने व्हायरल पोस्टमध्ये वापरल्या जात असलेल्या या औषधी गोळ्यांच्या छायाचित्रावर रिव्हर्स इमेज सर्च केला असता, २०१९ मध्ये कोलंबो, श्रीलंका येथून ISIS द्वारे वापरल्या जाणाऱ्या संशयित औषधांचे छायाचित्र म्हणून आणि अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा केल्याबद्दल अनेक तमिळ वेबसाइट्समध्ये ही प्रतिमा वापरली गेली. व्हायरल प्रतिमा वेबसाइटवर इतर प्रतिमांसह पाहिली जाऊ शकते.
डेली मिरर श्रीलंकाने २ मे २०१९ मध्ये दिलेल्या वृत्तात या चित्राची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. औषधांचा अवैध साठा केल्याप्रकरणी एक पिता पुत्राला अटक करण्यात आली होती, असे ते वृत्त आम्हाला पाहायला मिळले.
छायाचित्र क्र. ३
हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला बिजनोर पोलिसांनी केलेले एक ट्विट सापडले.
११ जुलै २०१९ रोजी केल्या गेलेल्या या ट्विट च्या माध्यमातून शिरकोट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भातील हे छायाचित्र असून त्याचा कोईमतूर आणि बिर्यानी प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे आमच्या निदर्शनास आले.
यासंदर्भात आणखी शोध घेत असताना आम्हाला, २०२० पासूनच अशाप्रकारच्या फेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या आणि कोईमतूर पोलिसांनी त्यावर कारवाई सुरु केली होती हे लक्षात आले.
२०२३ मध्ये पुन्हा अशा पोस्ट दिसण्यास सुरु झाल्यावर कोईमतूर पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले असून अशा पोस्ट पसरविणाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. हे आम्हाला वार्ता भारतीने २२ मे २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावरून तसेच ९ ट्विटर हॅन्डल वर एफ आय आर करण्यात आल्याचे द सियासत डेलीने २३ मे २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावरून समजले.
टाइम्स ऑफ इंडियाने २६ मे २०२३ रोजी दिलेल्या वृत्तात बिर्यानी जिहाद संदर्भात फेक पोस्ट पसरविणाऱ्या भाजप आयटी सेल प्रमुख नेत्यावर कारवाईचे सत्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात बिर्यानी जिहाद हा खोटी छायाचित्रे जोडून अकारण अफवा पसरविण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून असे करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे.
Result: False
Our Sources
Video uploaded by videosmylive on July 1, 2016
News published by Daily Mirror Shrilanka on May 2, 2019
Tweet made by Bijnor Police on July 11, 2019
Tweet made by Coimbatore Police on March 2, 2020
News published by Varta Bharati on May 22, 2023
News published by Siyasat Daily on May 23, 2023
News published by TOI on May 26, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in