Authors
Claim
महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला.
Fact
हा दावा खोटा आहे. सदर फ्लॅग इस्लामिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला. असा दावा सध्या केला जात आहे. @SudarshanNewsMH या सुदर्शन न्यूज मराठीच्या X खात्यावरून हा दावा करण्यात आला आहे. विशेषतः देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दि. ४ मे रोजी जाहीर करण्यात आल्यानंतर हा दावा व्हायरल झाला आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
व्हायरल दावा एक व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ज्या व्हिडिओमध्ये काही नागरिक विजयोत्सव करीत असल्याचे आणि फटाके फोडत असल्याचे दिसून येत आहेत. याचवेळी हिरव्या रंगाचा ध्वज फडकविताना दिसत आहेत.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. यामध्ये एक व्यक्ती हिरव्या रंगाचा ध्वज फडकावीत असल्याचे आणि त्यावर अर्धचंद्र आणि तारा असल्याचे आम्हाला पाहावयास मिळाले.
आम्ही अर्धचंद्र आणि तारा असलेल्या ध्वजाबद्दल माहिती शोधली असता, आम्हाला researchgate.net वर या ध्वजाची माहिती मिळाली. हा ध्वज इस्लामिक असल्याचे यामधून आमच्या निदर्शनास आले.
यानंतर आम्ही पाकिस्तानी फ्लॅग संदर्भात माहिती शोधली. आम्हाला zameen.com ने प्रसिद्ध केलेल्या लेखात पाकिस्तानच्या ध्वजाचे चित्र आणि त्यासंदर्भातील माहिती मिळाली.
दरम्यान आम्ही व्हायरल व्हिडिओतील फ्लॅग आणि पाकिस्तानी फ्लॅग यांचे तुलनात्मक निरीक्षण केले असता आम्हाला इस्लामिक फ्लॅगमध्ये हिरव्या रंगात फक्त अर्धचंद्र आणि तारा पाहायला मिळाला. तर पाकिस्तानी ध्वजामध्ये हिरवा रंग, अर्धचंद्र आणि तारा तसेच पांढऱ्या रंगाची पट्टी असते, हे दिसून आले.
यावरून आमच्या तपासात संबंधित ध्वज पाकिस्तानी ध्वज नसून इस्लामिक समाजाचा ध्वज असल्याचे स्पष्ट झाले.
व्हायरल दाव्यात श्रीरामपूरमध्ये महाविकास आघाडीच्या जल्लोषात असा उल्लेख आढळतो. दरम्यान आम्ही श्रीरामपूर हे कोणत्या लोकसभा मतदारसंघात येते याचा शोध घेतला. Google वर सर्च केले असता श्रीरामपूर हा भाग शिर्डी लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघात महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे निवडून आले असल्याची माहिती मिळाली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर विभागात याप्रकारे जल्लोष करण्यात आला का? आणि तेथे असा ध्वज फडकविण्यात आला का? हे तपासण्यासाठी आम्ही स्थानिक पत्रकार नितीन ओझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला, ” अशाप्रकारे जल्लोष साजरा करण्यात आला असून त्यावेळी फडकवण्यात आलेला आणि व्हायरल झालेला ध्वज पाकिस्तानचा नसून इस्लामिक ध्वज असल्याचे स्पष्ट केले.” विशेष म्हणजे “यावेळी जल्लोष करताना भगवा ध्वजही फडकवण्यात आला” असल्याची माहिती देऊन त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला असून तो खाली पाहता येईल.
यावरून आमच्या तपासात संबंधित व्हायरल दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात महाविकास आघाडीच्या विजयोत्सवात श्रीरामपूरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला, हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. फडकवण्यात आलेला ध्वज इस्लामिक आहे, तसेच संबंधित जल्लोषात भगवा ध्वजही फडकवण्यात आला होता. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Information published on researchgate.net
Article published by Zameen.com
Conversation with local Journalist Nitin Oza
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा