Fact Check
मुंबईतील रस्ता कोसळल्याचा दावा करणारा व्हिडिओ प्रत्यक्षात बँकॉकमधील आहे
Claim
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये असा दावा केला जातो की मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात रस्ता कोसळल्याची ही दृश्ये आहेत.
हा व्हिडिओ Newschecker ला त्यांच्या WhatsApp टिपलाइन (+91-9999499044) वर प्राप्त झाला असून, त्याची तथ्य-पडताळणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact
व्हायरल व्हिडिओतील प्रमुख फ्रेम्सवर केलेल्या रिव्हर्स इमेज सर्चमध्ये, २४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘द इंडिपेंडंट’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीचा संदर्भ आढळला.
त्या बातमीत हाच व्हिडिओ वापरला गेला असून, त्यात नमूद करण्यात आले आहे की बँकॉकमधील एका रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी सुमारे ५० मीटर खोल सिंगहोल तयार झाला, ज्यामध्ये गाड्या आणि विजेचे खांब कोसळले. या घटनेचा संबंध जवळच सुरू असलेल्या भूमिगत रेल्वे स्टेशनच्या बांधकामाशी जोडला जातो.
पुढे त्या बातमीत म्हटलं आहे की थायलंडमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सॅमसेन रोडवरील वजिरा हॉस्पिटलच्या परिसरातील रस्ते बंद केले असून, सुमारे ३० बाय ३० मीटर रुंदीचा आणि ५० मीटर खोलीचा खड्डा वाढत गेल्यामुळे आसपासच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं.
येथे, येथे आणि येथे अशा अनेक वृत्तसंस्थांनी देखील या घटनेवर बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.

थायलंडमधील ‘द नेशन‘ या वृत्तसंस्थेच्या अलीकडील अहवालानुसार, सॅमसेन पोलिस ठाण्याच्या इमारतीचे पाडकाम पूर्ण होईपर्यंत सिंगहोलजवळील वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
Google Maps आणि “Vajira Hospital” तसेच “Bangkok” या कीवर्ड्सचा वापर करून केलेल्या भौगोलिक पडताळणीत (Geo-verification) व्हायरल व्हिडिओतील दृश्यं पूर्णपणे जुळली असून, त्या ठिकाणाची ओळख निश्चित झाली आहे.

तपासणीतून स्पष्ट होतं की व्हायरल व्हिडिओ मुंबईतील रस्त्याच्या कोसळण्याचा नसून, तो बँकॉक (थायलंड) येथील Vajira हॉस्पिटलसमोरील सिंगहोल घटनेचा आहे. म्हणून सोशल मीडियावर शेअर होत असलेला दावा खोटा (False) आहे.
Sources
YouTube Video By The Independent, Dated September 24, 2025
Google Maps