Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Explainer
महाराष्ट्रातील लोकांच्या स्मार्टफोनवर गुरुवार दि. २० जुलै रोजी एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल. साधा मेसेज म्हणून काहींनी दुर्लक्ष केले असेल मात्र अनेकजण पॅनिकसुद्धा झाले. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर युजर्सनी या अलर्टबद्दल भाष्य केले. हा ऑनलाईन फ्रॉड आहे का? अशी चर्चा सुरु झाली. अखेर इतर जागरूक युजर्सनी घाबरू नका किंवा हा काळजीचा विषय नाही. अशा आशयाचेही मेसेज पसरविण्यास सुरुवात झाली. जाणून घेऊयात नेमका हा प्रकार काय आहे ते, या एक्सप्लेनरच्या माध्यमातून.
मोबाईलवर हा अलर्ट येताच अनेक युजर्सनी त्याबद्दलचे कारण विचारणाऱ्या पोस्ट करण्यास सुरुवात केली होती.
काही वेळातच हा मेसेज तुला एकट्याला नाही तर सगळ्यांना आलाय. असे सांगणारे विनोदी ढंगाचे मेसेजही पसरू लागले होते.
या मेसेजच्या धुमाकुळात वाढ होताच सर्वांना सरकारी उत्तराची अपेक्षा होती. मात्र तेवढ्यात काळजी करू नका. असे सांगणारे असंख्य पोस्ट सोशल मीडियावर झळकू लागले होते.




“देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.” असा संदेश अनेकांनी देण्यास सुरुवात केली होती.
इमर्जन्सी अलर्टने सोशल मीडियावर पोस्टची बरसात होऊ लागल्यानंतर विविध माध्यमांनीही या अलर्ट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पॅनिक परिस्थितीची दखल घेतल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. दिव्यमराठीने गुरुवारी अपडेट केलेल्या एका बातमीत सायबर पोलिसांचा हवाला देऊन माहिती दिली. “आपत्कालीन काळात केंद्र सरकार कमीत कमी वेळेत देशातील किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो याची चाचपणी आहे. सध्या भारतासह जगभरात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. अशी आपत्ती आलीच तर नागरिकांना तातडीने माहिती देता यावी म्हणून भारतात विक्री होणाऱ्या स्मार्ट फोनमध्ये अलर्ट फीचर बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना तसे आदेश दिले आहेत. त्याबाबतची चाचपणी करण्यासाठीच आज अनेकांच्या अँड्राईड मोबाईल्सवर अलर्ट मॅसेज पाठविण्यात आले.” असे या बातमीत वाचायला मिळाले.

याचबरोबरीने लोकसत्ता, साम टीव्ही, सकाळ आदी माध्यमांनीही विविध हवाले देऊन या घटनेसंदर्भात काळजी न करण्याचे आवाहन केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट पाठविला आहे. अशी माहिती पाहायला मिळाली असली तरी त्याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया गुरुवारी दिवसभरात आली नव्हती.



सरकारी यंत्रणासाठी अधिकृत घोषणा यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PIB Fact Check ने शुक्रवार दि. २१ जुलै रोजी ट्विट करून गुरुवारी निर्माण झालेल्या विविध समजांचे निरसन केले.
सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिमद्वारे तपासणीसाठी हे मेसेज पाठविण्यात आले होते. या मेसेजच्या माध्यमातून कोणतीही वास्तविक इमर्जन्सी दर्शविण्यात आलेली नाही. असे PIB ने याद्वारे स्पष्ट केले. या ट्विटच्या माध्यमातूनच मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन ने जारी केलेले प्रेस रिलीजही देण्यात आले आहे.

“दूरसंचार विभागाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, आपत्तींच्या काळात आपत्कालीन संप्रेषण वाढविण्यासाठी आणि आपल्या मौल्यवान नागरिकांची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम चाचणी आयोजित करणार आहे. भारतातील नागरिकांच्या आणि समुदायांच्या सुरक्षेसाठी आमच्या सतत वचनबद्धतेनुसार, प्रत्येक दूरसंचार सेवा प्रदात्यावर सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टमच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विविध मोबाईल ऑपरेटर्स आणि सेल ब्रॉडकास्ट सिस्टीमच्या आपत्कालीन सूचना प्रसारण क्षमतांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता मोजण्यासाठी या चाचण्या वेळोवेळी देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये केल्या जातील.” असे या प्रेस रीलिजमध्ये म्हटलेले आहे.
दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, “सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे आम्हाला आपत्ती व्यवस्थापनासाठी गंभीर आणि कमी वेळात संदेश एका नियुक्त भौगोलिक क्षेत्रामध्ये सर्व मोबाइल डिव्हाइसवर पाठविण्याची परवानगी देते, प्राप्तकर्ते रहिवासी किंवा अभ्यागत असले तरीही. हे सुनिश्चित करते की महत्त्वाची आपत्कालीन माहिती वेळेवर शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचते. सरकारी एजन्सी आणि आपत्कालीन सेवांद्वारे संभाव्य धोक्यांची माहिती देण्यासाठी आणि गंभीर परिस्थितींमध्ये त्यांना माहिती देण्यासाठी याचा वापर केला जातो. सेल ब्रॉडकास्टचा वापर सामान्यतः आपत्कालीन इशारे वितरीत करण्यासाठी केला जातो, जसे की गंभीर हवामान चेतावणी (उदा., त्सुनामी, फ्लॅश फ्लड, भूकंप इ.), सार्वजनिक सुरक्षा संदेश, निर्वासन सूचना आणि इतर गंभीर माहिती.”
प्रत्येक दूरसंचार सेवा प्रदात्यावर सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टमच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. चाचणी कालावधी दरम्यान, लोकांना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर सिम्युलेटेड आपत्कालीन सूचना मिळू शकतात. आम्ही खात्री देतो की हे अलर्ट नियोजित चाचणी प्रक्रियेचा भाग आहेत आणि वास्तविक आणीबाणी सूचित करत नाहीत. गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक चाचणी सूचना स्पष्टपणे “नमुना चाचणी संदेश” म्हणून लेबल केली जाईल. याची नोंद घेण्याचे आवाहन दूरसंचार मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
अशाप्रकारे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने जारी केलेला इमर्जन्सी अलर्ट हा सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टमच्या चाचणीचा एक भाग होता. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या आधी आलेल्या अलर्ट बद्दल काळजी करण्याची गरज नाही. यापुढेही असे अलर्ट येऊ शकतात. कोणीही याबद्दल चुकीचे समज करून घेणे किंवा पसरविणे योग्य ठरणार नाही.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in