Thursday, April 3, 2025
मराठी

Daily Reads

आंबेडकर वाद: केंद्रीय गृहमंत्र्यांवर दलितांचा अपमान केल्याचा विरोधकांचा आरोप, अमित शहा म्हणाले ‘विकृत टिप्पणी’

Written By Tanujit Das, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Dec 19, 2024
banner_image

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राज्यसभेत केलेल्या विधानानंतर विरोधकांनी देशभरात जोरदार राजकीय वादाला तोंड फोडले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवर दलितांचा अपमान केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांनी शाह यांच्यावर राज्यघटनेच्या जनकाचा अनादर केल्याचा आरोप केला, तर काँग्रेसने आंबेडकरांचा निवडणूक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप करत भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

वाद कशावरून?

17 डिसेंबर 2024 रोजी, भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यसभेत चर्चेदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक विधान केले. काँग्रेसला डॉ. आंबेडकरांचे नाव घेण्याची सवय लागली आहे. आंबेडकरांच्या नावाप्रमाणेच त्यांनी देवाच्या नावाचा वारंवार उल्लेख केला असता, तर त्यांनी सात आयुष्यं स्वर्गात मिळवली असती,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. काँग्रेसचे लोकसभा खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी शहा यांचे भाषण त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करून केंद्रीय गृहमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला.

अमित शहा असे म्हणाले होते का?

तथापि, संसद टीव्हीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या अमित शहांच्या सभागृहातील संपूर्ण भाषणावर नजर टाकल्यास असे सूचित होते की गृहमंत्री अमित शहा हे विधान आंबेडकर यांच्यावर एकेरी करीत नाहीत, तर त्यांनी काँग्रेसवर आरोप करताना हे विधान केले. आंबेडकरांना काँग्रेस पक्षाने दिलेली वागणूक यासंदर्भाने ते बोलत होते. यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या भाषणाच्या एक तास आणि सात मिनिटांवर, गृहमंत्री आता व्हायरल झालेली टिप्पणी करताना ऐकू येत आहेत. “आंबेडकरांचे नाव घेणे ही आता फॅशन झाली आहे. आंबेडकरांचा उल्लेख जितक्या वेळा केला तितक्या वेळा त्यांनी देवाचे नाव घेतले असते तर त्यांनी सात जन्मासाठी स्वर्ग मिळवला असता. ही चांगली गोष्ट आहे,” असे ते म्हणतात. दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगेचच व्यत्यय आणत, “म्हणजे आम्ही आंबेडकरांचे नाव घेऊ नये?” असा प्रश्न केल्याचे ऐकावयास मिळाले.

या टप्प्यावर, शाह पुढे म्हणतात, “नाही नाही… ऐका… कृपया ऐका. तुम्ही आता आंबेडकरांचे नाव घेता याचा आम्हाला आनंद आहे. आंबेडकरांचे नाव आणखी शंभर वेळा घ्या, पण त्याचवेळी आंबेडकरांबद्दल तुमचा दृष्टिकोन काय होता हे मी तुम्हाला सांगतो. आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला? देशातील अनुसूचित जाती-जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आंबेडकरजींनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. ते सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी आणि कलम ३७० बाबत असहमत होते. त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यायचा होता. त्यांना आश्वासन देण्यात आले असले तरी ते आश्वासन पूर्ण झाले नाही आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले, ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. बीसी रॉय यांनी पत्र लिहून आंबेडकरजी आणि राजाजी या दोन विद्वान व्यक्तींनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याच्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या उत्तरात, नेहरूजींनी कबूल केले की राजाजींच्या जाण्याने काही नुकसान होईल, परंतु आंबेडकरांच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळ कमकुवत होणार नाही. यावरून त्यांची वृत्ती दिसून येते. खर्गेजी विचारतात, “काय आक्षेप आहे?” तुम्ही आंबेडकरांना विरोध केला, तरीही आता मतांसाठी वारंवार त्यांचे नाव घेता. हे करणे योग्य आहे का? आंबेडकरांचे अनुयायी आता पुरेशा संख्येत असल्याने तुम्ही सतत आंबेडकरांचे नाव घेत आहात.”

अमित शहा यांची विधाने, त्यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेपासून अलिप्त राहून आंबेडकरांबद्दलच्या कथित अवहेलने बद्दल संदर्भ बदलून समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे दिसून आले.

‘काँग्रेस खोटे नरेटिव्ह तयार करण्याच्या प्रयत्नात’: अमित शहा

बी.आर. आंबेडकर यांच्यावरील त्यांच्या वक्तव्यावरील वादावर प्रतिक्रिया देताना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेसवर संसदेत केलेल्या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला. त्यांनी पुढे काँग्रेसला “आरक्षणविरोधी, आंबेडकरविरोधी आणि संविधानविरोधी” असे संबोधले आणि पक्ष चुकीच्या पद्धतीने आपली टिप्पणी मांडत आहे आणि समाजात खोटे नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन केले. “काँग्रेसने लोकांची विधाने फिरवून गोंधळ घालणे आता सामान्य झाले आहे. यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांची संपादित विधाने पसरवली होती. निवडणुकीदरम्यान, माझी विधाने एआय वापरून संपादित केली गेली आणि नंतर ती देशभर पसरली. आज त्यांनी आंबेडकरांबद्दलचे माझे विधान फिरवले. मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो आणि प्रसारमाध्यमांना विनंती करतो की माझी विधाने संपूर्णपणे लोकांसमोर मांडावीत. मी अशा पक्षातून आलो आहे जो आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही.

शहा यांच्या वक्तव्या विरोधात विरोधक आक्रमक

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमित शहा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची विनंती केली. “जर पंतप्रधान बाबासाहेब आंबेडकरांचा खरोखर आदर करत असतील तर त्यांनी अमित शहा यांना त्यांच्या पदावरून हटवावे… हा एका दलित प्रतिकाचा अपमान आहे आणि त्यांचा संविधानाबद्दलचा अवमान दिसून येतो,” असे ते म्हणाले.

“मनुस्मृतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना नक्कीच आंबेडकरांची अडचण येईल,” असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी रात्री उशिरा म्हटले होते.

तृणमूल काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात विशेषाधिकार नोटीस देखील हलवली, तर पक्षाच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीका केली आणि आरोप केला की अमित शहा यांच्या वक्तव्यातून पक्षाची “जातीवादी” आणि “दलितविरोधी” मानसिकता प्रतिबिंबित होते.

भाजप मुख्यालयाजवळ निदर्शने करताना, आप नेते अरविंद केजरीवाल म्हणाले की शाह यांच्या वक्तव्यामुळे कोट्यवधी दलितांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध “कठोर कारवाई” करण्याची मागणी केली आहे.

भाजपला राज्यघटना बदलण्याची इच्छा असल्याचा आरोप पुन्हा एकदा उपस्थित करत सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “भाजप पीडीएच्या (प्रगतशील दलित आघाडी) वाढत्या प्रभावामुळे घाबरले आहे आणि त्यामुळेच अशी विधाने वेळोवेळी केली जात आहेत.”

आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भाजप अस्तित्वात येण्यापूर्वी, संविधान स्वीकारले जात असताना त्यांच्या पूर्वज जनसंघ आणि आरएसएसने बाबासाहेबांना विरोध केला होता… विधानात नवीन काहीही नाही. ते त्यांच्या जुन्या योजना राबवू शकत नाहीत. काँग्रेसमुळे नाही तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि ते यापुढेही गुरफटत राहतील.”

पंतप्रधानांनी शहा यांची पाठराखण करत काँग्रेसवर हल्लाबोल केला

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा जोरदार बचाव केला आणि असे प्रतिपादन केले की गृहमंत्र्यांनी केवळ काँग्रेसच्या “अपमानाचा काळा इतिहास” अधोरेखित करीत राज्यघटनेच्या शिल्पकारावर प्रकाश टाकला आहे.

चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. सूत्रांनी स्पष्ट केले की ही बैठक “आंबेडकर ही फॅशन आहे” या वादाशी संबंधित नाही, चारही प्रमुख नेते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पुढील प्रमुखाच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यासाठी भेटले आहेत.


(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम तनूजीत दास यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,631

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.