Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
लातूर जिल्ह्यात महाशिवरात्रीला युवकास लोखंडी सळईने मारहाण झाली.
ही घटना जालना जिल्ह्यात घडली असून ठिकाणात बदल करून व्हायरल केली जात आहे.
लातूर जिल्ह्यात एका युवकास महाशिवरात्रीला अमानुष मारहाण करण्यात आली. असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. दरम्यान आमच्या तपासात जालना जिल्ह्यात घडलेल्या मारहाणीचा व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने पसरविला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला! गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख “निर्दयी” असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल!” अशा भल्यामोठ्या कॅप्शनसह हा दावा करण्यात येत आहे.
व्हायरल दाव्याची पाहणी करताना दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवर लातूर पोलिसांनी केलेली एक कॉमेंट आम्हाला पाहायला मिळाली. यात “सदर घटना लातूर जिल्ह्यात घडलेली नसून कोणीही फेक न्यूज वर विश्वास ठेवू नये.” अशी कॅप्शन लिहिण्यात आली असल्याचे आम्हाला दिसले.
लातूर पोलिसांनी संबंधित दाव्याला फेक म्हणजेच खोटी म्हटल्याने आम्हाला ही घटना लातूर जिल्ह्यात झालेली नसल्याची पुष्टी मिळाली.
दरम्यान व्हायरल व्हिडीओ बारकाईने पाहत असताना त्यामध्ये ‘अन्वा जालना’ असे लिहिण्यात आल्याचे आम्हाला दिसून आले. यावरून संबंधित कीवर्ड्सचा वापर करून आम्ही शोध घेतला. दरम्यान लोकमतने आपल्या युट्युब चॅनेलवरून ५ मार्च २०२५ रोजी “तापलेला रॉड पार्श्वभागात घुसवला, जालन्यातील तो संतापजनक व्हिडीओ.. | Jalna Bhokardan Crime News |AM3” या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेला व्हिडीओ रिपोर्ट आम्हाला मिळाला. व्हायरल व्हिडिओप्रमाणेच व्हिज्युअल्स असलेल्या या घटनेला या बातमीत जालना जिल्ह्यात घडलेली घटना असल्याचे सांगण्यात आले आहे.
पीडित व्यक्तीचे नाव कैलास गोविंदा बोराडे आहे. तो अनवा गावाचा रहिवासी असून तो २६ फेब्रुवारी रोजी जानेफळ गावाच्या रस्त्यावरील वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यावेळी आरोपी सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौंड याने मंदिरात महिला दर्शन घेत असल्याने, तू दर्शनासाठी मंदिरात जाऊ नको, असे सांगत कैलासला मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यानंतर दौंड याने जुन्या वाद उकरून काढत कैलासला मारहाण केली, त्याला अर्धनग्न करत यांच्या पायाला, पोटाला, मानेवर, हाताच्या तळव्यावर, पार्श्वभागावर गरम लोखंडी रॉडने चटके दिले. यासंदर्भात अधिक माहिती देणाऱ्या बातम्या येथे, येथे व येथे वाचता येतील.
अशाप्रकारे आमच्या तपासात जालना जिल्ह्यातील जानेफळ गावाजवळ घडलेली घटना लातूर येथे घडल्याचा दावा करून व्हायरल केली जात आहे.
Our Sources
Comment made by Latur Police
Video report published by Lokmat on March 5, 2025
News published by Lokmat on February 28, 2025
News published by Divya Marathi on March 1, 2025
News published by Sarkarnama on February 28, 2025