Thursday, March 30, 2023
Thursday, March 30, 2023

घरFact Checkलाडली फाउंडेशन खाजगी वैयक्तिक विवाहांना आर्थिक सहाय्य देत नाही

लाडली फाउंडेशन खाजगी वैयक्तिक विवाहांना आर्थिक सहाय्य देत नाही

भारतात लग्न हे एक महाग प्रकरण आहे. अनेक गरीब कुटुंबे आपल्या मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होतात कारण त्यात हुंडा, विवाह समारंभ आणि आहेर आदी आव्हाने पार पाडायची असतात. सध्या याचसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे आणि तो पालकांच्या डोक्यावरून मुलीच्या लग्नाचे ओझे कमी करण्याचे आश्वासन देत आहे. मेसेजमध्ये एका संस्थेची माहिती आहे जी गरीब कुटुंबांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी संपूर्ण खर्च देते आणि एक लाख रुपयांचे घरगुती साहित्य भेट स्वरूपात देते. अनेक लोक हा संदेश पसरवण्यासाठी आणि गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी ती पोस्ट शेअर करत आहेत. लाडली फौंडेशन ही मदत करीत असून हा संदेश सर्वांना पाठवा असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावे या मेसेजच्या शेवटी करण्यात येत आहे.

गोरगरीब पालकांना त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी लाडली फौंडेशन आर्थिक व घरगुती साहित्यासाठी एक लाख रुपये मदत करते.
Screengrab Of Whatsapp Viral Message

“जो आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च करण्यास असमर्थ आहे, त्यांनी आपल्या मर्जीने आपल्या मुली साठी योग्य स्थळ (जावई) पसंत करुन खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. लग्नाचा पूर्ण खर्च लाडली फाउंडेशन मार्फत केला जाईल व प्रत्येक लाडक्या मुलीला नवे जीवन सुरू करण्यासाठी संस्थेकडून १ लाख रूपये किमतीचे घरगुती सामान भेट स्वरूपात दिले जाईल. लाडली फाउंडेशन ९८७१७२७४१५, ९८७३१८२४६८, ९७१७२३१६६३. आपल्या सर्वांना विनंती आहे की, विनोदी चुटकुले पाठवण्यापेक्षा ह्या मेसेजला पाठवा जेणेकरून लोकांना माहिती होईल.🙏 🙏 श्री. नाना पाटेकर टिप – शेर करा कोणी तरी याचा उपयोग नक्की करेल. माणूस म्हणून जगण्यापेक्षा एक चांगला व्यक्ति म्हणून जगा.” असे हा मेसेज सांगतो. यामुळे अनेकजण हा मेसेज व्हाट्सअप वरून पाठवत आहेत.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact check/ Verification

आम्ही या दाव्याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी कॉल करा, असे आवाहन करून देण्यात आलेल्या ९८७१७२७४१५, ९८७३१८२४६८, ९७१७२३१६६३ या मोबाईल क्रमांकांवर आम्ही कॉल करून पाहिले. मात्र हे तीनही क्रमांक बंद असल्याचे आमच्या लक्षात आले. या मेसेज च्या शेवटी नाना पाटेकर यांचे नाव आढळले. अभिनेते नाना पाटेकर विविध सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असतात. यामुळे त्यांचा नेमका काय संबंध लाडली फौंडेशन च्या या कामाशी आहे का? याचा शोध आम्ही घेतला. त्यावेळी नाना पाटेकर यांचा लाडली शी कोणताही थेट संबंध असल्याचे दिसून आले नाही. दरम्यान नाना पाटेकर यांची महाराष्ट्रात नाम फौंडेशन नावाची सामाजिक सेवा संस्था असल्याचे आणि त्या माध्यमातून दुष्काळ पीडितांना त्यांनी मदत केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. महाराष्ट्र टाइम्स ने ६ मे २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत नाना पाटेकर याने गरीब मुलींच्या लग्नासाठी १७ लाखांची मदत वैयक्तिक स्वरूपात केल्याची माहिती आम्हाला मिळाली, मात्र याचा लाडली फौंडेशन शी संबंध असल्याचे आम्हाला दिसले नाही.

गोरगरीब पालकांना त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी लाडली फौंडेशन आर्थिक व घरगुती साहित्यासाठी एक लाख रुपये मदत करते.
Screengrab Maharashtratimes.com

गरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन धर्मादाय आयुक्तांनी विविध संस्थांना केलं होतं. या आवाहनाला नानानं प्रतिसाद दिला आहे. धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे यांनी सांगितलं की, ‘नाना पाटेकरनं शनिवारी आमच्याकडे १७ लाख रुपयांचा धनादेश सोपवला आहे. मराठवाडा, विदर्भासहित राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी तो पैसा खर्च केला जाईल.’ असे ती बातमी सांगते.

दरम्यान आम्ही लाडली फौंडेशन संदर्भातील आणि वैयक्तिक खासगी विवाहांना मदती संदर्भातील काही माहिती मिळते का? याचा शोध घेतला. आम्हाला namati.org ने प्रसिद्ध केलेली या संस्थेबद्दलची माहिती मिळाली. दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेली ही संस्था समाजाच्या काही वर्गातील पीडित तरुणींच्या जीवनाचा दर्जा वाढवणे या उद्देशाने काम करीत असून ६५००० हून अधिक मुलींना मूळ प्रकल्पांद्वारे थेट फायदा झाला आहे. अशी माहिती मिळाली. लाडली फौंडेशन च्या फेसबुक पेजलाही आम्ही भेट दिली. तेथेही आम्हाला बरीच सामाजिक उपक्रमांची माहिती मिळाली. सामुदायिक विवाह व इतर मदतीचे उपक्रम या पेजवर पाहायला मिळतात.

गोरगरीब पालकांना त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी लाडली फौंडेशन आर्थिक व घरगुती साहित्यासाठी एक लाख रुपये मदत करते.
Courtesy: Facebook/Ladli Foundation

या पेजवर लग्नासाठी आर्थिक मदत या अनुषंगाने शोध घेत असताना आम्हाला फौंडेशन ने केलेले जाहीर प्रकटन सापडले.

गोरगरीब पालकांना त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी लाडली फौंडेशन आर्थिक व घरगुती साहित्यासाठी एक लाख रुपये मदत करते.
Courtesy: Facebook/Ladli Foundation

लाडली फौंडेशन चे अध्यक्ष देवेंद्र गुप्ता यांनी केलेले ते जाहीर प्रकटन असून त्यात त्यांनी वैयक्तिक लग्नांना मदत देण्याच्या संदेशाचा इन्कार केला आहे. “मी लाडली फाऊंडेशनशी संबंधित संदेशाबद्दल सर्वांना कळवू इच्छितो की आमचा संदेश एका व्हॉट्सअप ग्रुपने चुकीच्या पद्धतीने संपादित केला आहे आणि देशभरातून लाखो लोकांना पाठविला गेला आहे, ज्यामुळे आम्हाला देशभरातून मोठ्या संख्येने कॉल येत आहेत. सर्व कॉल्सना उत्तर देणे शक्य नाही. म्हणूनच ते नंबर बंद केले आहेत. आणि देशभरातून हजारो लोक फोन करून नाराज होत आहेत. मला तुम्हाला सांगायचे आहे की २९ नोव्हेंबर २०१५ रोजी दिल्लीतील छत्तरपूर मंदिराच्या मैदानावर लाडली फाउंडेशनच्या वतीने ५१ दिव्यांग मुलींचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला. ज्यात हिंदू, मुस्लिम आणि इतर सर्व धर्मातील गरीब मुलींचे विवाह मोठ्या धूमधडाक्यात केले. ज्यामध्ये प्रत्येक मुलीला जवळपास सर्व घरगुती वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. लाडली फाउंडेशन त्यांच्या सामूहिक विवाह कार्यक्रमात गरीब मुलींना फक्त घरगुती वस्तू आणि इतर मदत पुरवते आणि इतर कोणतीही मदत करत नाही. संस्थेच्या पुढील कार्यक्रमाची माहिती संस्थेच्या फेसबुकवर टाकण्यात येणार आहे. सर्वांना विनंती आहे की लाडली संस्थेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आपण संस्थेच्या फेसबुक पेजवर सहभागी होऊ शकता.” असे त्यांनी ३ डिसेंबर २०१५ रोजी केलेल्या त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

यावरून २०१५ साला पासूनच लाडली फौंडेशन च्या नावे खोटा आणि दिशाभूल करणारा मेसेज केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

आम्ही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी लाडली फौंडेशन चे अध्यक्ष देवेंद्र गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असून ते उपलब्ध झाल्यावर अधिक माहिती अपडेट केली जाईल.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात लाडली फौंडेशन च्या नावे पसरविला जात असलेला मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या फौंडेशन शी अभिनेते नाना पाटेकर यांचा काहीच संबंध नाही. त्यांनी संस्थेच्या नावे कोणतेही आवाहन केले नाही आणि हे फौंडेशन वैयक्तिक खासगी स्वरूपातील लग्नांना कोणतीही मदत करीत नाही. हे निदर्शनास आले आहे.

Result: False

Our Sources


Article Published by namati.org

Post Published by Ladli Foundation


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : [email protected]

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular