Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
महाराष्ट्रातील प्रभावी राजकारणी, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी ने छापे टाकले. हे छापे टाकल्यानंतर स्वतः हसन मुश्रीफ आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी आरोप केले. काहींनी त्यांचे समर्थन केले तर सत्ताधाऱ्यांनी विरोधही केला. हा राजकीय कलगीतुरा रंगलेला असतानाच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ईडी धाडीनंतर हसन मुश्रीफ यांची पाठराखण केली. असा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
मूळ इंस्टाग्राम पोस्ट मधील हा व्हिडीओ डाउनलोड करून अनेक युजर्स तो व्हाट्सअप वरून प्रसारित करीत आहेत.
या व्हिडिओची कॅप्शन सांगते की, अभिनेते नाना पाटेकर हे ईडी च्या धाडीनंतर आमदार हसन मुश्रीफ यांच्याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओत नाना पाटेकर पत्रकारांशी बोलताना दिसतात. “तो माणूस जितकं काम करतो त्याची जाहीरात कधीच करत नाही. इमानानं गपचुप आपलं काम करत राहतो. एखादी कुठली चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच तुम्ही अधोरेखीत करता तुम्ही मंडळी; पण त्याने केलेलं काम समोर आणा. तो खरंच चांगला नेता आहे, चांगला पुढारी आहे.”
अभिनेते नाना पाटेकर यांनी ईडी धाडीनंतर हसन मुश्रीफ यांची पाठराखण केली का? हे पाहण्यासाठी आम्ही गुगल वर किवर्ड सर्च केले. यावेळी महाराष्ट्र टाइम्स ने प्रसिद्ध केलेले एक जुने वृत्त आम्हाला सापडले. त्यात आम्हाला नाना पाटेकर हे एका कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांचे कौतुक करताना पाहायला मिळाले. त्या संकेतस्थळावर तसा व्हिडीओ आणि लेखी वृत्तही आहे. मात्र या कार्यक्रमाचा आणि ईडी धाडीचा काहीही संबंध पाहायला मिळाला नाही. ५ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केलेली ती बातमीही जुनी असून ईडी धाडीच्या घटना अगदी अलीकडच्या आहेत. बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी छापेमारी झाली असल्याने नाना पाटेकर यांनी त्यानंतर पाठराखण केली आहे का? याचा शोध आम्ही घेतला. मात्र तशी कोणतीही माहिती आम्हाला मिळाली नाही.
व्हायरल व्हिडिओच्या की फ्रेम्स काढून त्यावर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला असता, आम्हाला एक युट्युब वरील व्हिडीओ मिळाला.
हा व्हिडिओ एका वर्षापूर्वीचा आहे. हे आमच्या लक्षात आले. एबीपी माझा वाहिनीच्या युट्युब चॅनेलवर नाना पाटेकर माध्यम प्रतिनिधींशी बोलतानाचा हा व्हिडिओ उपलब्ध आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की, नाना पाटेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी बोलत होते. मूळ व्हिडिओमध्ये 1.30 मिनिटांपासून तुम्ही पाहिल्यास, पत्रकारांनी नाना पाटेकरांना अजित पवारांच्या कामाविषयी प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर बोलताना त्यांनी अजित पवारांचे कौतुक करताना त्यांना ‘चांगला नेता, चांगला पुढारी’ म्हटले होते. हे विधान त्यांनी हसन मुश्रीफ यांच्याबद्दल केले नसल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून आले.
या संदर्भात महाराष्ट्र टाइम्स ने प्रसिद्ध केलेली बातमीही आम्हाला सापडली. अजित पवार यांनी २२ जानेवारी २०२२ रोजी पुण्यात जिल्हा कोरोना आढावा बैठक घेतली होती. या बैठकीपूर्वी नाना पाटेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवादही साधला होता. “राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. आम्हाला जास्त प्रसिद्धी मिळते. अजित पवार हे इमानाने गुपचूप काम करत राहतात. जाहिरात करत नाहीत. एखादी कुठली गोष्टी चुकली की मीडिया लगेच ते अधोरेखित करतो. पण अजित पवारांनी केलेलं काम लोकांसमोर आणा.” असे आवाहन नाना पाटेकर यांनी पत्रकारांना उद्देशून केले होते. असे ती बातमी सांगते.
अशाप्रकारे अभिनेते नाना पाटेकर यांनी केलेले मूळ विधान काही संदर्भ वगळून हसन मुश्रीफ यांच्याशी जोडण्याचा प्रकार झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मूळ व्हिडिओत माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबद्दल काढलेले उद्गार हसन मुश्रीफ यांच्याबद्दल काढल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.
Our Sources
News Published by Maharasthra Times
Video Published by ABP Maza
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in