मागील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले. या दरम्यान सरकारी यंत्रणांसह अनेक संस्था संघटना देखील पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून मदत पाठविली गेली तर अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मदत केली. याच्या बातम्या देखील माध्यमें आणि समाजमाध्यमांत प्रसिद्ध झाल्या. अशातच सर्वाधिक फटका बसलेल्या महाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पूरग्रस्तांसाठी स्वयंपाक तयार करत असल्याचा फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाला.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाड रेल्वे स्टेशनवर पूरग्रस्त बांधवांसाठी स्वयंपाक तयार करत असताना राष्ट्रीय स्वंयसेवर संघाचे स्वयंसेवक. आमच्या एका वाचकाने या फोटोची पडताळणी करण्यासाठी हा फोटो आमच्या व्हाट्सअॅप हेल्पलाईनवर शेअर केला आहे.
हा फोटो फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक पोस्टमध्ये हाच दावा करण्यात आला आहे की, हा फोटो महाड रेलवे स्टेशनवर पूरग्रस्त बांधवांसाठी स्वयंपाक करत असलेल्या संघ स्वयंसेवकांचा आहे.

Fact Check / Verification
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या मदतीचा फोटो नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला कारण महाडमध्ये रेल्वे स्टेशनच नाही आणि पोस्टमध्ये रेल्वे स्टेशनचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यासाठी आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला ANI या वृत्तसंस्थेची 26 मे 2020 रोजीची बातमी आढळून आली या बातमीनुसार हा फोटो उत्तरप्रदेशातील मुरादाबाद स्टेशनवरील आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान संपूर्ण देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता, यादरम्यान परराज्यात काम करणा-या मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या विशेष श्रमिक ट्रेन देखील चालवण्यात आल्या होत्या. लाखों मजूर त्यांच्या मूळ गावी परतले होते या मजुरांना वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर अन्नाची पाकीटे देखील देण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक स्वयंपाक तयार करुन ट्रेनमधील मजुरांना अन्नाची पाकीटे वाटत होते. हा फोटो त्यावेळचा आहे.

टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने देखील ही बातमी आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या मदतकार्याचा व्हिडिओ देखील ANI ने आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, संघ स्वयंसेवकाच्या मदतीचा फोटो महाड येथील पूरग्रस्तांना मदत करतानाचा नसून मागील वर्षी स्थलांतरित मजुरांच्या मंदतीसाठी उत्तरप्रदेशातील मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर केलेल्या मदतीचा आहे.
Result: Misleading
Our Sources
TIMES NOW- https://twitter.com/timesnow/status/1265284051188903937
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा