केंद्र सरकारने नुकतेच वक्फ सुधारणा बिल संसदेत मंजूर केले. या बिलावरून देशाचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. एनडीए सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेसने या बिलाला चांगलाच विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी वक्फच्या सरकारी निर्णयाला पूर्ण समर्थन दिले आणि विरोध करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत व प्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलेच फटकारले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे एबीपी माझा टीव्ही चॅनेलच्या abp live अंतर्गत येणाऱ्या न्यूज वेबसाईटने यासंदर्भात विशेष वृत्त प्रसिद्ध केले. “Prakash Ambedkar: वक्फवर नियंत्रण गरजेचे होते, प्रकाश आंबेडकरांनी राऊतांसह उद्धव ठाकरेंनाही फटकारलं, म्हणाले, नव्याने मुस्लीम झाल्याने ते आदाब आदाब करतात” या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताचे स्क्रिनशॉट खाली पाहता येतील.




या वृत्ताचे संग्रहण येथे पाहता येईल.
याचबरोबरीने @LetsUppMarathi या साधारणपणे महाराष्ट्राशी निगडित बातम्या देणाऱ्या माध्यमाने “वक्फचा निर्णय स्वागतार्ह! नव्या मुस्लिमांना काय कळणार? आंबेडकरांची ठाकरे-राऊतांवर खरमरीत टीका” या शीर्षकाखाली आपल्या X खात्यावर हीच माहिती पोस्ट केली.

पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात खळबळ माजविणाऱ्या या वृताबद्दल न्यूजचेकरने फॅक्ट चेक करण्याचा निर्णय घेतला.
Fact Check/ Verification
न्यूजचेकरने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नावे व्हायरल झालेल्या या दाव्याचे फॅक्टचेक करताना संबंधित कीवर्ड्सचा वापर करून त्याबद्दल काही माहिती मिळते का? याचा शोध घेतला. मात्र दावा करणाऱ्या माध्यमांव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमांनी याबद्दल वृत्त प्रसारित केले असल्याचे आम्हाला आढळले नाही.

नव्याने पारित झालेल्या वक्फ बिलासंदर्भात वंचित बहुजन आघाडीची समर्थनाची भूमिका आहे का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. दरम्यान आघाडीच्या अधिकृत X खात्यावर पोस्ट केलेली वक्फ बिलासंदर्भातील विरोधी भूमिका आम्हाला पाहायला मिळाली.

“जब गैर-भाजपा सरकार चुनी जाएगी, तो हम मांग करेंगे कि वक्फ संशोधन अधिनियम को निरस्त किया जाए!” अशा शीर्षकाखाली करण्यात आलेल्या या पोस्टमुळे या पक्षाची विरोधी भूमिका स्पष्ट झाली. दरम्यान वक्फचे समर्थन करणारी आणि संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी एकही पोस्ट आम्हाला वंचित बहुजन आघाडी किंवा आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या X खात्यांवर दिसली नाही.


दरम्यान ही खाती शोधताना संबंधित वृत्ताचे खंडन करून हा दावा चुकीचा असल्याची पोस्ट वंचित बहुजन आघाडीने आपल्या X खात्यावर १० एप्रिल २०२५ रोजी केल्याचे आणि नेते प्रकाश आंबेडकर यांनी रिपोस्ट केल्याचे आम्हाला आढळले.


दरम्यान आम्ही या वृत्तासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी थेट एबीपी माझा डिजिटलचे एडिटर सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सदर चूक मान्य करीत कन्टेन्ट रायटरने नाव समजून घेण्यात केलेल्या घोळामुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगितले. प्रकाश महाजन यांनी केलेली विधाने आम्ही जशीच्या तशी प्रसिद्ध केलेली आहेत. तसेच ज्याठिकाणी प्रकाश महाजन ऐवजी प्रकाश आंबेडकर असे झाले आहे तेथे चूक दुरुस्त केली आहे.” असे सांगितले.
हे आर्टिकल प्रकाशित होईपर्यंत संबंधित वेबसाईटवरील बातमीत दुरुस्ती झालेली नव्हती.
दरम्यान वक्फचे समर्थन आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना अशी विधाने केली असल्याचे आमच्या निदर्शनास आले. एबीपी माझाने १० एप्रिल २०२५ रोजी अपलोड केलेल्या युट्युब चॅनलवरील बातमीत प्रकाश महाजन असे बोलताना ऐकू येतात.
मनसे नेते प्रकाश महाजन या व्हिडिओत वक्फचे समर्थन करताना त्याची गरज होती असे सांगत ३.२२ मिनिटांनंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आम्हाला ऐकू आले.
यासंदर्भात सरकारनामा आणि दिव्य मराठी या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्याही आढळून आल्या असून संबंधित विधाने प्रकाश आंबेडकर यांनी नव्हे तर प्रकाश महाजन यांनी केल्याचे स्पष्ट होते.


यावरून आमच्या तपासात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी काढलेले उदगार व्हायरल बातम्यात प्रकाश आंबेडकर यांच्या नावावर घालण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात प्रकाश आंबेडकरांनी वक्फच्या निर्णयाला पूर्ण समर्थन देत संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलंय असा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Tweet made by Vanchit Bahujan Aaghadi on April 7, 2025
Tweet made by Vanchit Bahujan Aaghadi on April 10, 2025
Retweet made by Prakash Ambedkar on April 10, 2025
News published by ABP Majha on April 10, 2025
News published by Sarkarnama on April 11, 2025
News published by Divya Marathi on April 10, 2025
Conversation with Sachin Patil Editor, ABP Majha Digital