Authors
Claim
मुख्यमंत्री पदावर दाखल होताच सिध्दरामय्यांनी दिवंगत हिंदुत्ववादी कार्यकर्ता प्रवीण नेतारुच्या पत्नीला सरकारी नोकरीवरून काढून टाकले.
Fact
दिवंगत प्रवीण नेतारू यांची पत्नी नूतन कुमारी या कंत्राटी पद्धतीवर सेवेत होत्या. नूतन सरकार अस्तित्वात आल्यानंतर हे कंत्राट रद्द झाले आहे. त्यांना जाणीवपूर्वक नोकरीवरून काढण्यात आलेले नाही.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेल्या सिध्दरामय्यांनी मागील भाजप सरकारने अनुकंपा तत्वावर नोकरी दिलेल्या नूतन कुमारी नेतारू यांना नोकरीवरून काढून टाकले. असा एक दावा करण्यात येत आहे.
नूतन कुमारी या दिवंगत हिंदुत्ववादी नेते प्रवीण नेतारू यांची पत्नी आहेत. “प्रवीण यांची पीएफआय च्या जिहादींनी हत्या केली होती. यामुळे त्यांच्या पत्नीला मागील भाजप सरकारने नोकरी दिली होती. ही नोकरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढून घेतली.” असे हा दावा सांगतो.
असे अनेक दावे सोशल मीडियावर सध्या फिरत आहेत.
Fact Check/ Verification
काँग्रेसचे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर मोठ्याप्रमाणात आरोप करणाऱ्या या दाव्यासंदर्भात न्यूजचेकरने शोध घेतला. किवर्ड सर्च च्या माध्यमातून शोधताना आम्हाला, डेक्कन हेराल्डने २७ मे २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली ही बातमी पाहायला मिळाली.
“कर्नाटकातील भाजपच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने कंत्राटी पद्धतीने केलेल्या सर्व भरती रद्द करण्याचे आदेश काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने दिल्यामुळे, अनुकंपा तत्त्वावर नियुक्त केलेल्या प्रवीण नेतारू यांच्या विधवेलाही नोकरी गमवावी लागली आहे.” असे या बातमीत आम्हाला वाचायला मिळाले.
डेक्कन हेराल्डने याच दिवशी प्रसिद्ध केलेली आणखी एक बातमी आमच्या पाहणीत आली. यामध्ये प्रवीण नेतारू यांच्या पत्नीला तिची नोकरी परत दिली जाईल, अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केल्याचे दिसून आले.
“नवीन सरकार आल्यावर तात्पुरत्या कर्मचार्यांना काढून टाकले जाणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केवळ प्रवीण नेत्तारू यांच्या पत्नी नाही तर सुमारे १५० कंत्राटी कामगारांना काढून टाकण्यात आले आहे,” असे सिद्धरामय्या यांनी एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान “नूतन कुमारी यांना पुन्हा नियुक्त केले जाईल.” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे या बातमीत म्हटले आहे.
यासंदर्भात आणखी शोध घेत असताना आम्हाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेले ट्विट पाहायला मिळाले.
“नवीन सरकार आल्यानंतर पूर्वीच्या सरकारने नियुक्त केलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. केवळ प्रवीण नेत्तारू यांच्या पत्नीच नाही तर १५० हून अधिक कंत्राटी कामगारांना यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये सरकारी हस्तक्षेप नाही. ही बाब विशेष मानून मानवतेच्या आधारावर नूतन कुमारीची पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे.” हाच समान मजकूर आम्हाला त्यामध्ये पाहायला मिळाला.
इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, टाइम्स नाऊ आदी माध्यमांनी यासंदर्भात दिलेल्या बातम्यांमध्ये असाच उल्लेख आम्हाला वाचायला मिळाला.
यासंदर्भात कर्नाटक भाजपने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून केलेले २९ सप्टेंबर २०२२ चे ट्विट आमच्या पाहणीत आले. नूतन कुमारी यांना कंत्राटी सेवेत रुजू केल्याबद्दल देण्यात आलेले पत्र या ट्विट मध्ये आहे.
“ही नोकरी कराराच्या अटींनुसार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळापर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत हा करार असेल असे या पत्रात लिहिलेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नावाने आणि कर्मचारी व प्रशासकीय सुधारणा मंत्रालयाच्या सचिवांच्या स्वाक्षरीने ते पत्र देण्यात आले होते.” अशी माहिती आम्हाला मिळाली. यावरून मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल संपल्याने नूतन कुमारी यांच्या नोकरीचे कंत्राट संपुष्ठात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान आम्ही नेक्स्ट मराठी टीव्ही चॅनेलचे संचालक आणि राजकीय विश्लेषक जितेंद्र पाटील यांच्याशी संवाद साधला, ” प्रत्येक सरकार आणि मुख्यमंत्र्यांना काही घटनांच्या अनुषंगाने मयत व्यक्तींचे वारस किंवा नातेवाईकांना कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकरीत घेण्याचे अधिकार असतात. याच अधिकारांच्या जोरावर मागील भाजप सरकारने नूतन कुमारी यांना नोकरी दिली होती. त्या मंगळूर येथे काम करीत होत्या. मात्र प्रशासकीय कार्यप्रणालीचा नियमांप्रमाणे नूतन सरकार स्थापन झाल्यानंतर हे कंत्राट रद्द झाले आहे. हा कार्यप्रणालीचा भाग आहे. यात कोणतेही राजकारण नाही.” अशी माहिती आम्हाला दिली.
Conclusion
आमच्या तपासात दिवंगत हिंदुत्ववादी नेते प्रवीण नेतारू यांची पत्नी नूतन कुमारी यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाणीवपूर्वक नोकरीवरून काढून टाकल्याचा करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: Missing Context
Our Sources
News published by Deccan Herald on May 27, 2023
Tweet made by Chief Minister of Karnataka Siddharamayya on May 27, 2023
Tweet made by BJP Karnataka on Suptember 29, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in