Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
औरंगाबादमध्ये कलम १४४ लागू झालंय, असा दावा करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावरच जमावबंदी लागू केली आहे.
या संदर्भात अनेक वृत्त वाहिन्यांनी बातमी दिल्या आहे. त्या बातम्यांच्या लिंक खाली जोडत आहे.
एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही या वृत्त वाहिन्यांनी बातमीत लिहिलंय की, औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू आहे. त्याचबरोबर लोकमत, सरकारनामा, टाइम्स नाऊ मराठी, तरुण भारत बेळगांव, मुंबई तक, माझा पेपर, थोडक्यात, एआयएन न्यूज यांनी देखील या संदर्भात बातम्या दिल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये १ मे २०२२ रोजी सभा घेण्याचे ठरवले होते. नुकतेच औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी २२ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश जारी केले आहे.
सदर आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात २५ एप्रिल ते ९ मे २०२२ पर्यंत लागू राहिल, असं त्या पत्रात लिहिलं आहे.
त्यातच आता औरंगाबादमध्ये कलम १४४ लागू झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे.
Fact Check / Verification
औरंगाबादमध्ये खरंच कलम १४४ लागू करण्यात आलाय, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ते पत्र काळजीपूर्वक वाचले.
त्या पत्रात कुठेही कलम १४४ आणि जमावबंदी याचा उल्लेख केलेला नाही. पत्रात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम अंतर्गत ३७ (१) व (३) याचा फक्त उल्लेख आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम अंतर्गत ३७ (१) व (३) अन्वये आदेशात खालील गोष्टी लागू होतात.
१) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
२) कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
३) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.
४) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
५) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
६) ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल. अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे.
यात आपण पाहिलं तर कुठेही जमावबंदीचा उल्लेख केलेला नाही. मुळात कलम १४४ हा फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम आहे.
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधला. तेव्हा तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले,”औरंगाबादमध्ये कलम ३७ (१) व (३) लागू करण्यात आलेला आहे. हा कायदा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या अंतर्गत येतो. इथे कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला नाही.”
आम्ही औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जर त्यांच्याशी संपर्क झाला तर लेख अपडेट करू.
दैनिक दिव्य मराठीने या संदर्भात बातमी दिली आहे. औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश दिले नाही, असं पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले आहे.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, औरंगाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेले नाही. औरंगाबादमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश जारी करण्यात आलेला आहे.
Result : Misleading Content/Partly False
Our Sources
स्वतः केलेले विश्लेषण
फोनवरून औरंगाबादमधील पोलीस आयुक्तालयाशी झालेला संवाद
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.