Authors
Claim
रेल्वेवर विविध मार्गानी जिहाद करणाऱ्यांची मजल आता वंदे भारतच्या काचा फोडण्यापर्यंत गेली आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. गुजरातमधील कांकरिया येथील डेपोमध्ये दुरुस्तीचे काम सुरु असताना केलेला व्हिडीओ कम्युनल अँगलने व्हायरल केला जात आहे.
वंदे भारतच्या काचा फोडल्या जात आहेत असे सांगत कम्युनल अँगलने शेयर केला जात असलेला दावा चांगलाच व्हायरल झाला आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
X च्या बरोबरीनेच हा दावा आम्हाला फेसबुकवरही आढळला.
“आधी वंन्दे भारत च्या गाड्यावर दगडफेक, रेल्वे ट्रेक वर दगड, काल रेल्वे ट्रेकवर भरलेला सिलेंडर, पेट्रोल भरलेल्या बाटल्या, आणी आता कोच ची काच फोडण्या पर्यंत यांची मजल गेली आहे. विचार करा फक्त 99 सीट आले तर यांना इतका माज आलेला आहे देशात राज्यात सत्ता आली तर हे तुम्हालाही ठेचायला मागे पुढे पहाणार नाहीत.” या कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल व्हिडिओचा तपास करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही वंदे भारत कोचच्या काचांची तोडफोड या आशयाच्या किवर्ड्स च्या माध्यमातून शोध घेतला. मात्र आम्हाला यासंदर्भात कोणतेही अधिकृत रिपोर्ट किंवा रेल्वे विभागाचे कोणतेही विधान मिळाले नाही. दरम्यान दाव्यांचा शोध घेताना आम्हाला 10 सप्टेंबर 2024 रोजी @trainwalebhaiya या X खात्याने केलेले ट्विट सापडले.
“नाही, तो ट्रेनचे नुकसान करत नाही, तर आधीच खराब झालेली काच तोडत आहे आणि ती दुरुस्ती डेपोमध्ये नवीन लावण्यासाठी तोडली जात आहे, काच घट्ट चिकटलेली असल्यामुळे ती आधी तोडणे आवश्यक आहे.” अशी कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली.
मात्र व्हायरल दाव्यातील व्हिडीओ आणि हा व्हिडीओ यात फरक असल्याने आणि हे रेल्वे खात्याचे अधिकृत स्पष्टीकरण नसल्याने आम्ही आणखी शोध सुरु ठेवला असता, फेसबुकवरील एका युजरने इंस्टाग्रामची एक लिंक शेअर करीत वंदे भारत ट्रेनच्या खिडकीचे फलक तोडणाऱ्या व्यक्तीची इंस्टाग्राम प्रोफाइल लिंक असल्याची पोस्ट केल्याचे आमच्या पाहणीत आले.
त्यानुसार आम्ही इंस्टाग्रामवर signare_mahi_manish प्रोफाईल पाहिले आणि शोध घेतला की असा ट्रेनच्या काचा फोडतानाचा व्हिडीओ आहे का? मात्र असा कोणताही व्हिडिओ सापडला नाही.
आम्हाला India Today ने 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेले फॅक्टचेक वाचायला मिळाले. यावरून “वंदे भारतची गुजरात येथील कांकरिया येथील डेपोमध्ये दुरुस्तीचे काम सुरु असताना केलेला व्हिडीओ कम्युनल अँगलने व्हायरल केला जात आहे.” तसेच हे खाते बिहारमधील आरा येथील रहिवासी मनीष कुमार यांचे आहे. मनीष कुमार सध्या अहमदाबादमध्ये असून तो रेल्वेमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो. अशी माहिती आम्हाला मिळाली.
यावरून सुगावा घेऊन आम्ही रेल्वेच्या गुजरात विभागीय जनसंपर्क खात्याशी संपर्क साधला. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागाचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी पुढील माहिती दिली आहे. “वंदे भारतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे ज्यामध्ये वंदे भारतच्या खिडकीची काच एक व्यक्ती हातोड्याच्या सहाय्याने फोडत आहे, वरील व्हिडिओ हा कोचिंग डेपो कांकरिया येथील अहमदाबाद-मुंबई इंटिग्रेटेड येथील वंदे भारतच्या दुरुस्ती दरम्यान तयार केलेला जुना व्हिडिओ आहे.”
“वंदे भारतच्या खिडकीची काच प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून कठिण काचेची बनवण्यात आली आहे, जेणेकरुन प्रवाशांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, देखभाल करताना खिडकीच्या काचेला तडा गेल्यास ती दुरुस्त केली जाते धारदार हातोड्याच्या मदतीने ती तोडून काढली जाते. हे काम कंत्राटी कामगार करत असताना हा व्हिडिओ दुसऱ्या कंत्राटी कामगाराने बनवला, रेल्वेच्या आवारात व्हिडीओग्राफी करण्यास मनाई आहे, देखभालीची व्हिडीओग्राफी करून ती सोशल मीडियावर टाकणाऱ्या कंत्राटी मजुरावर कडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच करारातील नियमांचे पालन न केल्याने कंत्राटदारावरही कारवाई करण्यात येत आहे.” असे त्यांनी पुढे जोडले.
यावरून संबंधित व्हिडीओ हा वंदे भारताच्या खिडकीच्या काचेची दुरुस्ती करताना काढण्यात आलेला असून पुढे कम्युनल अँगलने व्हायरल झाला असल्याचे स्पष्ट झाले.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात वंदे भारतच्या खिडकीची काच रेल्वेच्या गुजरात येथील दुरुस्ती डेपोमध्ये दुरुस्त केला जात असतानाचा व्हिडीओ खोट्या कम्युनल दाव्याने व्हायरल केला जात असल्याचे स्पष्ट झाले.
Result: False
Our Sources
Tweet made by @trainwalebhaiya on September 10, 2024
Fact Check published by India Today on September 13, 2024
Conversation with Pradeep Sharma, Senior Public Relations Officer, Western Railways Ahmedabad.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा