Authors
अनेकांना नोटेवर लिहायची सवय असते. अशा व्यक्तींना सतावणारा एक संदेश सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरतोय. आपण नोटेवर लिहिण्याची सवय सोडा. कारण असे केल्यास ती नोट अवैध ठरते असे हा मेसेज सांगतोय. व्हाट्सअप वर हा मेसेज जोरदार फिरू लागला आहे.
एका शंभर रुपयाच्या नोटेवरील हा मेसेज सगळीकडे व्हायरल होत आहे. हा मेसेज पुढे पाठविण्याचे आवाहन केले जात आहे. जोडीला एका हिंदी बातमीचे कात्रणही युजर्स शेयर करीत आहेत.
या बातमीत तर आरबीआय ने काहीही लिहिलेल्या नोटा स्वीकारू नयेत अशी सूचना सर्व बँकांना केली आहे. असे म्हटले आहे. यामुळे आता अशा नोटांचे करायचे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
हा संदेश खरा आहे का? हे तपासण्याचा प्रयत्न आम्ही केला. नोटांची छपाई आणि त्या बाजारात आणण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. या बँकेने तसा काही आदेश दिला आहे का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आम्हाला तशी कोणतीच माहिती मिळाली नाही. दरम्यान बँकेने २०१५ मध्ये एक नोटीस काढून कोणीही नोटांवर काहीही लिहू नये, कारण त्यामुळे नोटांचे आयुष्य कमी होते असे जाहीर आवाहन केले असल्याचे आम्हाला दिसून आले. नागरिक आणि बँकांनी नोटांवर लिहू नये अशी विनंती याद्वारे करण्यात आली होती.
शोध घेत असताना आम्हाला इंडिया टुडे ने प्रसिद्ध केलेला एक लेख मिळाला. चलनी नोटांवर लिहिणे भारतात दंडनीय अपराध आहे का? अशा आशयाचा तो लेख होता. यामध्येही भारतात असा गुन्हा मानला जात नाही. नोटांवर लिहिणे चुकीचे आहे, मात्र बँक अशा नोटा नाकारू शकत नाहीत. अशीच माहिती उपलब्ध झाली.
नागरिकांना स्वच्छ नोटा मिळाव्यात यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरु केलेली क्लीन नोट पॉलिसी बद्दल आम्हाला पाहायला मिळाले. जुन्या फाटक्या आणि घाण झालेल्या नोटा बदलून देण्यासंदर्भात हे धोरण असले तरीही ज्या नोटांवर लिहिलेले असते त्या नोटा बँक स्वीकारणार नाहीत किंवा त्या नोटा अवैध ठरविल्या जातील असे त्यात काहीही आढळले नाही.
या दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत माहिती विनिमय केंद्राचे ट्विट आम्हाला पाहायला मिळाले.
त्यामध्ये, ” नोटांवर लिहिले गेले तरी त्यांना अधिकृत मानले जाते, त्या अवैध ठरत नाहीत.” असा स्पष्ट मजकूर आम्हाला दिसला. “क्लीन नोट पॉलिसी प्रमाणे नागरिकांनी नोटांवर काहीही लिहू नये कारण त्यामुळे त्या विचित्र दिसतात आणि त्यांचे आयुष्य कमी होते.” असे या ट्विट मध्ये लिहिलेले आहे. अमेरिकी डॉलर प्रमाणे भारतीय नोटाही त्यावर काही लिहिल्यास अवैध ठरू शकतात असा केला जाणारा दावा या ट्विट ने खोटा ठरविला आहे.
Conclusion
आमच्या तपासात भारतीय नोटांवर लिहिले गेल्यास त्या अवैध ठरतात, असे सांगणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Official Website of RBI
Tweet made by PIB Factcheck
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in