Authors
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ दरम्यान झाकीर नाईकने चार जणांना इस्लाम मध्ये धर्मांतरित केल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये झाकीर नाईकसारखा दिसणारा एक व्यक्ती मंचावर चार जणांना इस्लामिक कलमा म्हणवताना दिसत आहे. फिफा विश्वचषकादरम्यान शेकडो लोकांनी हा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हायरल व्हिडीओ ला सत्यापित करणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्या बातम्या ट्विट करण्यात आल्या आहेत.
व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लोक लिहित आहेत, “अल्हमदुलिल्लाह, कतार फिफा वर्ल्ड कपच्या एका कार्यक्रमात ४ लोकांनी इस्लामचा स्वीकार केला, डॉ. झाकीर नायक साहिबांनी कलमा शिकवला का”.
भारतात, झाकीर नाईकवर मनी लाँड्रिंग, द्वेषयुक्त भाषण आणि दहशतवादी कारवायांचे आरोप आहेत. आरोपांनंतर झाकीर नाईक २०१७ मध्ये देश सोडून मलेशियाला गेला होता. त्याच्या कारवायांमुळे बांगलादेश आणि ब्रिटननेही नाईकवर बंदी घातली आहे.
Fact Check/Verification
व्हायरल व्हिडिओसह यूट्यूबचा स्क्रीनशॉट शेअर करत एका व्यक्तीने हा व्हिडिओ ६ वर्षे जुना असल्याचे सांगितले आहे. हा स्क्रीनशॉट ‘abdelghani boudra’ नावाच्या यूट्यूब चॅनलचा आहे.
आम्हाला या चॅनेलवर व्हायरल व्हिडिओची दीर्घ आवृत्ती देखील सापडली आहे. हा व्हिडिओ कॅमेऱ्याच्या दुसऱ्या कोनातून शूट करण्यात आला आहे. चॅनेलवरील व्हिडिओ २७ मे २०१६ रोजी अपलोड करण्यात आला होता. झाकीर नाईक यांच्या कतारा (Katara) येथील व्याख्यानानंतर चार जणांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे व्हिडिओच्या शीर्षकात लिहिले होते. कतारा (Katara) हे कतारची राजधानी दोहा येथे बांधलेल्या सांस्कृतिक गावाचे नाव आहे.
शोध घेतल्यानंतर आम्हाला कताराच्या सत्यापित ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ देखील सापडला. २७ मे २०१६ रोजी व्हिडिओ येथे शेअर करण्यात आला होता. झाकीर नाईक यांच्या “Does God Exist” या व्याख्यानानंतर चार जणांनी इस्लामचा स्वीकार केल्याचेही सांगण्यात आले आहे. ट्विटनुसार, या चार व्यक्तींपैकी तीन जण केनियाचे आहेत आणि एक फिलीपिन्सचा आहे.
तथापि, झाकीर नाईकला फिफा विश्वचषक २०२२ मध्ये इस्लामिक प्रवचन देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे हे खरे आहे. याबाबतच्या सर्व बातम्या इंटरनेटवर प्रसिद्ध झाल्या आहेत. झाकीर नाईकला फिफा विश्वचषकाच्या निमंत्रणावरून वाद निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर त्याला विश्वचषकाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणा म्हणून आमंत्रित करण्यात आले असल्याचे म्हटले असून ते खरे नसल्याचे आढळले आहे.
Conclusion
झाकीर नाईकचा ६ वर्षे जुना व्हिडिओ फिफा वर्ल्ड कप २०२२ शी लिंक करून शेअर केला जात असल्याचे आमच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. पण कतारमध्ये फिफा विश्वचषकादरम्यान इस्लामिक प्रवचन देण्यासाठी झाकीर नाईकला निश्चितपणे आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र प्रमुख पाहूणा म्हणून बोलावलेले नाही.
Rating: False
Our Sources
YouTube video uploaded by ‘abdelghani boudra’ on May 27, 2016
Tweet of ‘Katara‘, posted on May 27, 2016
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in