Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
Claim
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अश्रफ हुसेन याला नागरिकांनी चांगलाच चोपला.
Fact
हा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात आरोपीचे नाव अक्षय शिंदे आहे. शाळेच्या तोडफोडीवेळी काही कर्मचाऱ्यांना मारहाण करतानाचा हा व्हिडीओ खोट्या कम्युनल दाव्याने व्हायरल केला जात आहे.
बदलापूर येथील शाळा तोडफोडी दरम्यान एक जमाव एका दाढीवाल्या वयस्क व्यक्तीस मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदलापूर येथे झालेल्या शाळकरी मुलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अश्रफ हुसेन याला नागरिकांनी चोपला असे सांगत हा व्हिडीओ शेयर केला जात आहे.
बदलापूर येथील एका खाजगी शाळेत नर्सरीच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात 20 ऑगस्ट 2024 रोजी, शेकडो नागरिकांनी निदर्शने केली, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. बदलापूर रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणी आंदोलन झाले. शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाळेबाहेर हे आंदोलन सुरु असताना मारहाण झाली. आरोपी सफाई कर्मचारी अक्षय शिंदे ज्या ठिकाणी काम करतो त्या शाळा प्रशासनाने आणि पोलिसांनी त्यांची तक्रार गांभीर्याने घेण्यास आणि एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. आरोपी शिंदे याला 16 ऑगस्ट 2024 रोजी अटक करण्यात आली होती. आंदोलनानंतर तीन पोलीस अधिकारी आणि एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला राज्य सरकारने निलंबित केल्याची नोंद आहे.
“महाराष्ट्रातील बदलापूर येथील शाळेच्या बाथरूममध्ये दोन 4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी शाळेचा सफाई कामगार अश्रफ हुसेन याला अटक करण्यात आली आहे. जमावाने आरोपींना बेदम मारहाण केली” असे व्हायरल दाव्याच्या कॅप्शनचे मराठी रूपांतरण आहे. दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव शोधण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. कीवर्डसच्या माध्यमातून आम्ही शोध घेतला असता, आम्हाला यासंदर्भात प्रसिद्ध झालेले TV9 मराठीचे 21 ऑगस्ट 2024 चे एक वृत्त सापडले. त्यामध्ये याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे असल्याचे सांगून छायाचित्रासह त्याची माहिती देण्यात आली असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
दरम्यान आम्ही आणखी शोध घेतला असता, या प्रकरणातील आरोपीचे नाव अक्षय शिंदे असल्याचे आणि त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत ठाणे पोलिसांनी कारवाई सुरु केली असल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि मुंबई तक चे रिपोर्ट आम्हाला मदतीचे ठरले.
यासंदर्भात आणखी तपास घेताना आम्ही संतप्त पालक आणि नागरिकांनी केलेल्या तोडफोडीसंदर्भातील वार्तांकनही पाहिले. यामध्ये आम्हाला आरोपीचे नाव अश्रफ असल्याचे कोठेही आढळले नाही. ABP MAJHA ने यासंदर्भात केलेली व्हिडीओ न्यूज येथे पाहता येईल.
यावरून या घटनेतील आरोपीचे नाव अक्षय शिंदे असून अश्रफ हुसेन नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. तरीही खात्री करून घेण्यासाठी आम्ही ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी सांगितले की, “कम्युनल दावा खोटा आहे आणि अटक केलेला आरोपी अक्षय शिंदे आहे.” आरोपी अक्षय शिंदे वगळता इतर कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
व्हिडिओमध्ये मारहाण होत असलेली दाढीवाली वयस्क व्यक्ती कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही स्थानिक पत्रकारांशीही बोललो. संतप्त जमावाकडून शाळेवर हल्ला झाला तेंव्हा अनेक कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून संबंधित व्यक्ती माराची शिकार बनली. मात्र त्या व्यक्तीचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा कोणताच संबंध नाही. अशी माहिती मिळाली.
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल व्हिडिओद्वारे केला जाणारा बदलापूरच्या घटनेतील आरोपी अश्रफ यास जमावाने मारहाण केली हा दावा खोटा आहे. शाळा तोडफोडीचा व्हिडीओ खोट्या कम्युनल दाव्याद्वारे शेयर केला जात आहे.
Our Sources
News published by TV9 Marathi on August 21, 2024
News published by ABP MAJHA on August 20, 2024
News published by Loksatta on August 22, 2024
News published by Maharashtra Times on August 21, 2024
News published by Mumbai Tak on August 23, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
July 15, 2025
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025