Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेतून विवाहित जोडप्यास अडीच लाख रुपये मिळणार.
हा दावा खोटा आहे. संबंधित योजना २०२३ पासून बंद झाली आहे.
लग्नानंतर सरकार देणार अडीच लाख रुपये अशा शीर्षकाखालील एक इंस्टाग्राम रील सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
संबंधित व्हिडिओमध्ये अँकर लग्नानंतर सरकार जोडप्याला अडीच लाख रुपये देणार असे सांगताना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेतून’ हे पैसे मिळतात असे सांगताना ऐकू येते. विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीतला असणे आणि त्यांचं हे पहिलं लग्न असणं आवश्यक आहे या दोन अति या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरेशा आहेत. अशी माहिती आम्हाला मिळाली.
दरम्यान अशी कोणती योजना प्रत्यक्षात सुरु आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
सर्वप्रथम आम्ही व्हायरल दाव्यात म्हटल्याप्रमाणे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अशाप्रकारे अडीच लाख रुपये देणारी कोणती योजना सुरु आहे का? याचा शोध घेतला.
आम्हाला ‘एकात्मिक आंतरजातीय विवाह बंद’ या शीर्षकाखाली सकाळ या माध्यमाने ३० एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी आढळली.
या बातमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना केंद्र सरकारने बंद केली असल्याची आणि ही योजना १ एप्रिल २०२३ पासून बंद करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली. केंद्र सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनमार्फत ही योजना चालवत होते असेही या बातमीत म्हटले आहे. तत्सम बातम्या लोकसत्ता, दिव्य मराठी आणि टाइम महाराष्ट्र आदी माध्यमांनी प्रसिद्ध केल्या असल्याचे आम्हाला दिसून आले.
दरम्यान आम्ही यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या समाज कल्याण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या योजनेबद्दल शोधले. वेबसाईटवरील योजना या सदरात पाहताना सध्या सुरु असलेल्या योजनांच्या बरोबरीनेच बंद करण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. संबंधित बंद झालेल्या योजनांच्या यादीत आम्हाला “Dr. Ambedkar Scheme for Social Integration through Inter-Caste Marriages & Dr. Ambedkar National relief to the scheduled castes/scheduled tribes victims of Atrocities” ही योजना सापडली आणि त्यासोबत जोडलेले परिपत्रक सुद्धा मिळाले.
संबंधित २३ जानेवारी २०२३ च्या परिपत्रकात “डॉ. आंबेडकर आंतरजातीय विवाह आणि डॉ. आंबेडकर यांच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेसाठी योजना अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचारांना बळी पडलेल्यांना राष्ट्रीय मदतसाठी फौंडेशन २८ एप्रिल २०२३ पर्यंतच अर्ज स्वीकारणार असून शिल्लक अर्ज ३१ मार्च २०२३ पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. १ एप्रिल २०२४ पासून अशाप्रकारच्या गरजांसाठी संबंधित लाभार्थींनी आपापल्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या समाज कल्याण विभागांकडे अर्ज करावेत. शिवाय १ एप्रिल २०२४ पासून यासंदर्भात फौंडेशनकडे केल्या जाणाऱ्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.” अशी माहिती देण्यात आली आहे.
यामुळे व्हायरल दाव्यात सांगितली जात असलेली योजना २०२३ पासून बंद करण्यात आली असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
brambedkar.in या वेबसाईटवर संबंधित योजना २०१४-१५ या आर्थिक वर्षात देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी, या उद्देशाने सुरु करण्यात आली होती आणि लाभार्थींना अडीच लाख रुपये दिले जात होते. अशी माहिती आम्हाला मिळाली.
महत्वाचे म्हणजे सध्या महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना चालविली जात आहे. या योजनेतुन आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास एकत्रित ५० हजार रुपयाचा निधी दिला जातो. यासंदर्भातील माहिती सामाजिक न्याय व विशेष साहाय्यता विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेतून विवाहित जोडप्यास अडीच लाख रुपये मिळणार हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित योजना २०२३ पासून बंद झाली आहे.
Our Sources
News published by esakal on April 30, 2025
News published by Loksatta on May 13, 2025
News published by Divya Marathi on May 20, 2025
Website of Dr. Babasaheb Ambedkar Foundation
Website of Social Justice and Special Assistance Department, Maharashtra Government.
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025
Vasudha Beri
July 1, 2025