Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार असे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे

फॅक्ट चेक: आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार असे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत, त्यांनी वरळीतून माघार घेतली.
Fact

हा दावा खोटा आहे.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात येणाऱ्या वरळी मतदारसंघातून निवडून येऊन विद्यमान आमदारपदावर असलेले शिवसेना उद्धव बळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबद्दलचा एक दावा व्हायरल झाला आहे. आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार आणि ते निवडणूक लढणार नाहीत असा दावा एका न्यूजकार्डच्या माध्यमातून केला जात आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २० नोव्हेंबर रोजी निवडणूक तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येतील. यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून यादरम्यान अनेक दावे सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. याच क्रमाने हा दावा झाला आहे.

“आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाही; काँग्रेसच्या दबावानंतर आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार” असे हा दावा सांगतो.

Fact Check/ Verification

महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुती कोणता उमेदवार देणार याची चर्चा सुरु असताना आदित्य ठाकरेंच्या माघारीबद्दलचा हा दावा आम्हाला संशयास्पद वाटला. प्राथमिक तपासात आम्ही Google वर संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला असता आम्हाला याबद्दलचे एकही वृत्त मिळाले नाही. आदित्य ठाकरे, शिवसेना ठाकरे पक्ष किंवा महाविकास आघाडीने याबद्दल निर्णय घेतला असता तर त्याची मोठी बातमी झाली असती.

फॅक्ट चेक: आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार असे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे
Google Search

यानंतर आम्ही यासंदर्भात शिवसेना ठाकरे पक्ष आणि आदित्य ठाकरे यांच्या सोशल मीडिया खात्यांवर धुंडाळून पाहिले. मात्र आम्हला अशी माहिती असणारी कोणतीही पोस्ट मिळाली नाही.

दरम्यान आम्ही यासंदर्भात जाणून घेण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “हा दावा पूर्णपणे खोटा असून आदित्य ठाकरे २४ ऑक्टोबर रोजी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत.” अशी माहिती आम्हाला दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात दिली आहे.

यासंदर्भात अधिक तपास करताना आम्हाला लोकमत या माध्यमाच्या फेसबुक पेजवरून १९ ऑक्टोबर २०२४ रोजी केलेली याच दाव्याचे खंडन करणारी पोस्ट आढळली. यामध्ये समान मजकूर असलेले लोकमतचे न्यूजकार्ड दाखवून संबंधित पोस्ट लोकमतची नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. लोकमतचे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल करण्याचा हा प्रकार असून या खोडसाळपणाची तक्रार सायबर क्राईम विभागाकडे करत आहोत. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

फॅक्ट चेक: आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार असे सांगणारे न्यूजकार्ड खोटे आहे
Courtesy: Lokmat

आम्हाला लोकमतचा लोगो वापरून दिशाभूल करण्यात आलेली मूळ पोस्ट मिळाली नाही. मात्र असा प्रकार याआधीही झाला असून तो खोटा असल्याचे यावरून स्पष्टही झाले आहे.

Conclusion

आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत आणि त्यांनी वरळीतून माघार घेतली, हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Google Search
Analysis of social media accounts of Shivsena and Aditya Thakrey
Conversation with Adv. Harshal Pradhan, PRO, Shivsena UBT
Post published by Lokmat on October 19, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular