Authors
Claim
आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर पडलेल्या धाडीचा व्हिडीओ.
Fact
हा व्हिडिओ २०२१ मध्ये मुंबईतील दीपा बारवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्याचा आहे, ज्याचा ठाकरे कुटुंबाशी काहीही संबंध नाही.
आदित्य ठाकरेंच्या कॉफी क्लबमध्ये गुहेचे मंथन केल्यानंतर गुहेच्या आतून अनेक रत्ने बाहेर पडत आहेत, असा दावा करीत एक व्हिडीओ शेयर केला जात आहे. दरम्यान यावर तपास केला असता मुंबईतील ‘डान्सबार’ वर पडलेल्या छाप्याचा जुना व्हिडीओ आदित्य ठाकरेंशी जोडून व्हायरल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
“उद्धव ठाकरे का बिगडा हुआ बेटे आदित्य ठाकरे का …अंधेरी के केफे बियर बार शोप के भूगर्भ में …पुलिस छापे मे मुंबई का सबसे बड़ा शर्मनाक सेक्स रेकेट कौ भंडाफोड़” अशा हिंदी आणि “Raid in Udhav Thackeray son Aditya Thackeray’s Cafe in Andheri Mumbai found large underground Treasure” अशा इंग्रजी कॅप्शनखाली हा दावा शेयर होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
दोन मिनिटांपेक्षा थोड्या जास्त लांबीच्या या व्हिडिओमध्ये महिला एका भूमिगत चेंबरमधून आपले चेहरे लपवून बाहेर पडताना दिसत आहेत. व्हिडिओसोबतच्या आरोपांमध्ये (आणि ओव्हरले टेक्स्टमध्ये) असे म्हटले आहे की हे फुटेज मुंबईतील अंधेरी येथील उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्या मालकीच्या बारमधील आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्याच्या तपासासाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला १४ डिसेंबर २०२१ रोजीचा न्यूज तकचा एक व्हिडिओ रिपोर्ट सापडला. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओप्रमाणेच फुटेज पाहायला मिळाले असून जेव्हा आम्ही दोन्ही व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या महिलांच्या पोशाखांची तुलना केली तेव्हा स्पष्ट झाले की त्या महिला एकाच पोलिस छाप्यातील आहेत.
“माया नगरी मुंबईत बार डान्सर्सचे नृत्य कधी बंद खोलीत तर कधी एका विशिष्ट प्रकारच्या ठिकाणी घडते हे तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये पाहता आणि ऐकता….पण आज मी तुम्हाला अशी बातमी दाखवणार आहे की ती पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही…. मुंबई पोलिसांनी अशा ठिकाणी छापा टाकला जिथे तुम्ही जाण्याचा विचारही करू शकत नाही आणि एक-दोन नाही तर १७ मुलींची सुटका केली…माया नगरी मुंबईत दिवस आणि रात्र सारखेच असतात, जर तुम्ही मुंबईत गेला असाल किंवा तिथे राहत असाल तर तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे… जर तुम्ही तिथे कधीच गेला नसाल तर तुम्ही ते चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिले असेल.. .मुंबई पोलिसांनी जिथे छापा टाकला होता त्या जागेबद्दल जाणून तुम्ही हैराण व्हाल….प्रथम हा व्हिडिओ पहा…” असे डिस्क्रिप्शन आम्हाला वाचायला मिळाले.
१४ डिसेंबर २०२१ ही तारीख आणि बारवरील छाप्याच्या बातमीवरून आम्ही आणखी शोध घेतला. आम्हाला इंडिया टुडेने या छाप्याबद्दल प्रसिद्ध केलेली १३ डिसेंबर २०२१ ची बातमी मिळाली.
“एका स्वयंसेवी संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने अंधेरीतील दीपा बारवर कोविड-१९ निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल छापा टाकला. छाप्यादरम्यान एका गुप्त खोलीत १७ महिला लपून बसल्याचे पाहून पोलिस अधिकारी आश्चर्यचकित झाले. गुप्त खोलीत एअर कंडिशनिंग आणि व्हेंटिलेशन होते आणि त्यात अन्न, पाणी आणि थंड पेये होती. पोलिसांनी २० जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला.” अशी माहिती आम्हाला या बातमीत मिळाली.
या बातमीत किंवा त्याच घटनेवरील इतर बातम्यांमध्ये आम्हाला या घटनेत ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख नाही. महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे अशी दोन मुले आहेत. दरम्यान आम्ही ही दोन्ही नावे वापरून मुंबईत त्यांच्या नावे बार आहेत का किंवा त्यावर छापा पडला का? याबद्दल शोध घेतला पण तशी कोणतीच माहिती हाती लागली नाही.
आम्ही अधिक माहिती जाणून घेण्यासाठी छापा टाकणारे मुंबई पोलिसांचे सामाजिक सेवा विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “छापा १५ तासांहून अधिक काळ चालला आणि आम्ही बारच्या व्यवस्थापकालाही अटक केली. परंतु उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्या मालकीचा तो बार असल्याचा दावा खरा नाही.”
यावरून जुन्या छाप्याचा व्हिडीओ खोट्या दाव्याने शेयर केला जात असल्याचे स्पष्ट होते.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर पडलेल्या धाडीचा व्हिडीओ असे म्हणत व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल व्हिडिओ २०२१ मध्ये मुंबईतील दीपा बारवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्याचा आहे, ज्याचा ठाकरे कुटुंबाशी काहीही संबंध नाही.
Result: False
Our Sources
News published by News Tak on December 14, 2021
News published by India Today on December 13, 2021
Conversation with DCP Raju Bhujbal
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा