Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckFact Check: आप्पासाहेब धर्माधिकारी पत्राद्वारे म्हणाले 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार परत करणार? खोटा...

Fact Check: आप्पासाहेब धर्माधिकारी पत्राद्वारे म्हणाले ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार परत करणार? खोटा आहे तो दावा

Claim
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि राशी आपण सरकारला परत करणार असे आप्पासाहेब धर्माधिकारी एका पत्राद्वारे म्हणाले.
Fact
हा दावा खोटा आहे. आप्पासाहेब यांच्या नावे एक खोटे पत्र व्हायरल झाले असून त्यातील मजकूर खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. या कार्यक्रमात उष्माघाताने काहींचा मृत्यू झाला. यानंतर खुद्द आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी झालेल्या प्रकाराला कंटाळून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सरकारला परत करणार असे म्हटले आहे. असा दावा या पत्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Fact Check: आप्पासाहेब धर्माधिकारी पत्राद्वारे म्हणाले 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार परत करणार? खोटा आहे तो दावा
Courtesy: Twitter@AjayNDMakasare

ट्विटर आणि फेसबुकवर असंख्य युजर्सनी एक पत्र व्हायरल करीत हा दावा केला आहे. विशेष म्हणजे व्हाट्सअप वर हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: आप्पासाहेब धर्माधिकारी पत्राद्वारे म्हणाले 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार परत करणार? खोटा आहे तो दावा

“राज्य सरकारच्या गलिच्छ कारभारामुळे मला व माझ्या साधकांना त्रास झाला, मी पुरस्कार नको बोललो होतो, मला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला भाग पाडले. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला व त्यांचा जीव घेतला, माझ्या साधकांसाठी साधा मंडप ही टाकला नाही. वरुन भाजप चे मुनगंटीवार बोलतात मीच सांगितला कार्यक्रम दुपारी घ्यायला, हो मी सांगितले दुपारी घ्यायला, पण त्यांनी तशी सोय पण करायला हवी होती. झालेल्या घटनेची मी पुर्ण जबाबदारी घेऊन सर्व श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की इथून पुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका. दिनांक- २२ एप्रिल २०२३ मी लवकरच पुरस्कार आणि राशी सरकारला परत करत आहे.” असे व्हायरल पत्रातील मजकूर असल्याचे आम्हाला वाचायला मिळाले.

Fact check/ Verification

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार नाकारून सरकारला खडे बोल सुनावल्याचा मजकूर आणि ते व्हायरल पत्र याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न न्यूजचेकर मराठी ने केला. व्हायरल पत्रात आम्हाला “डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी “पद्म श्री पुरस्कार सम्मानित” असा उल्लेख असलेले लेटर पॅड आणि त्या पत्रा खाली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वाक्षरी आढळली.

आम्ही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे कोणते सोशल मीडिया अकाउंट्स आहेत का? आणि त्यावर अशापद्धतीने पत्र पोस्ट करण्यात आले का? हे शोधले. मात्र आम्हाला सोशल मीडियावर त्यांची थेट उपस्थिती पाहायला मिळाली नाही. त्यांनी लिहिलेले पत्र असे सांगून इतर सोशल मीडिया युजर्स हे पत्र पोस्ट करीत असल्याचे आम्हाला दिसले. याचपद्धतीने शोधत असताना आम्हाला, ट्विटर वर याचसंदर्भातील एक पोस्ट पाहायला मिळाली.

या पोस्ट मध्येही लेटरपॅड आणि खाली सही असून त्यामधील मजकूर मात्र वेगळा असल्याचे आमच्या निदर्शनास आले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेल्या उष्माघातामुळे झालेल्या प्रकाराचा खेद व्यक्त केला असल्याचे आढळले. मात्र या पत्रात महाराष्ट्र सरकारवर टीका किंवा पुरस्कार परत देण्याबद्दल कोणताही मजकूर आम्हाला आढळला नाही.

दरम्यान आम्ही सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी थेट आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे स्वीय सचिव तथा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते संदीप पाटील यांनी आम्हाला यासंदर्भातील माहिती दिली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे पुरस्कार परत देणार असा दावा करीत व्हायरल होत असलेले पत्र खोटे आहे. असे सांगून त्यांनी आम्हाला आप्पासाहेब यांच्या खऱ्या पत्राची प्रत उपलब्ध करून दिली.

Fact Check: आप्पासाहेब धर्माधिकारी पत्राद्वारे म्हणाले 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार परत करणार? खोटा आहे तो दावा

“खऱ्या पत्राची परत पाहता लेटरहेड चा वरील भाग आणि खालील सहीचा भाग वापरून मधील भागात चुकीचा मजकूर वापरून असा प्रकार केला गेला आहे. हा खोडसाळपणाने केलेला प्रकार असून त्यासंदर्भातील कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.” अशी माहिती संदीप पाटील यांनी न्यूजचेकरला दिली आहे.

आम्ही व्हायरल पत्राची इमेज आणि मूळ पत्र यामधील तुलनात्मक परीक्षण करून पाहिले असता, मूळ पत्रात मजकूर लिहिण्याची पद्धत आणि व्हायरल पत्रातील पद्धत यामध्ये आम्हाला फरक दिसून आला. मूळ लेटरपॅडवरील मजकूर हटवून त्याठिकाणी दुसराच मजकूर घालण्यात आला असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

Fact Check: आप्पासाहेब धर्माधिकारी पत्राद्वारे म्हणाले 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार परत करणार? खोटा आहे तो दावा

मूळ पत्रात १७ एप्रिल २०२३ ही तारीख असून व्हायरल पत्राची तारीख २२ एप्रिल ही आहे. व्हायरल पत्रात सर्व मजकूर बोल्ड करण्यात आला आहे. सहसा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून जारी केल्या जाणाऱ्या पत्रांमध्ये मूळ पत्राप्रमाणे मजकूर असतो तो बोल्ड नसतो. अशीही माहिती आम्हाला त्यांच्या कार्यालयाकडून मिळाली.

Conclusion

अशाप्रकारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे व्हायरल केले जात असलेले पत्र आणि त्यामधील दावे खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources

Tweet made by Sayali Shinde on April 23, 2023

Conversation with PA to Appasaheb Dharmadhikari Mr. Sandip Patil


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular