Authors
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 19 जानेवारी रोजी मुंबई येथे मेट्रो लाइन 2A आणि 7 सोबत अनेक प्रकल्पांच्या उदघाटन सोहळ्यात भाग घेतला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्यामुळे भारताला G20 चे आयोजन करण्याची संधी मिळाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते. एकंदर व्हिडिओत 29 मिनिटांनंतर आपल्याला त्यांनी केलेले नेमके विधान पाहता येते. याचबरोबरीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भातील व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिला असून त्यामध्येही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा अंश पाहता येतो. यात मुख्यमंत्री म्हणतात की, “भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्यामुळे भारताला G20 चे आयोजन करण्याची संधी मिळाली”
Fact check/ Verification
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे विधान केलेले आहे. याचे पुरावे त्यांनी स्वतः आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विट मध्ये दिसून आले. दरम्यान भारताला G20 चे आयोजन करण्याची संधी भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्यामुळे मिळाली हे त्यांनी केलेले विधान कितपत खरे आहे? हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. यासंदर्भात किवर्ड च्या माध्यमातून शोध घेत असताना, काँग्रेस नेते आणि प्रवक्ते जयराम रमेश यांनी केलेले एक ट्विट आम्हाला सापडले.
“G20 चे अध्यक्षपद फिरते आहे आणि त्यानुसार भारताला ही संधी मिळणे अपरिहार्य होते. G20 चे पूर्वीचे आयोजक यूएसए, यूके, कॅनडा, दक्षिण कोरिया, फ्रान्स, मेक्सिको, रशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्की, चीन, जर्मनी, अर्जेंटिना, जपान, सौदी अरेबिया, इटली आणि इंडोनेशिया हे आहेत. यापैकी कोणत्याही देशाने हाय व्होल्टेज नाटक केलेले नाही जसे नाटक भारताला एकवर्षीय आयोजनाची संधी मिळाल्यावर केले जात आहे. मला लालकृष्ण अडवाणींनी 5.4.2014 रोजी गांधीनगर येथे जे सांगितले होते ते आठवते – त्यांनी श्री. मोदींना एक उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजर म्हटले होते. G20 च्या भोवती जे सध्या फिरविले जात आहे, हा त्याचाच भाग आहे.” असे जयराम रमेश यांनी या ट्विट मध्ये म्हटल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
G20 संदर्भात हा राजकीय आरोप असला तरी आम्हाला त्यामध्ये त्याच्या आयोजनासंदर्भातील माहिती समजली. हे आयोजन फिरते असते. अशी माहिती आमच्या हाती लागली. दरम्यान या माहितीची सत्यता पटविण्यासाठी आम्ही G20 च्या अधिकृत संकेतस्थळाचा शोध घेतला. तेथे वेबसाइटच्या ‘G20 बद्दल‘ विभागात स्पष्टपणे नमूद केले आहे की “G20 शिखर परिषद दरवर्षी फिरत्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाते”.
यानंतर शोध घेताना आम्हाला वेबसाईट च्या व्हिडीओ सेक्शन मध्ये संसद टीव्ही चा एक व्हिडीओ सापडला.
व्हिडिओमध्ये अँकर भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत यांच्याशी बोलताना दिसत आहे. 2 मिनिटे 50 सेकंदाच्या व्हिडिओनंतर अँकर G20 चे कायमस्वरूपी आयोजन स्थळ नसल्याचे सांगताना दिसत आहे आणि G20 त्याचे सदस्य देश ‘रोटेशन’च्या आधारे यजमानपद मिळवतात. म्हणजेच, दरवर्षी त्याचे यजमानपद नवीन देशात पोहोचते. दरवर्षी यजमानपद भूषविणारे देश यापुढे यजमानपद भूषवणार आहेत अशा दोन देशांसोबत ‘Troika’ बनवतात. ‘Troika’ गट G20 मध्ये भारतासह इटली आणि इंडोनेशियाचा समावेश आहे, जेणेकरून G20 चा अजेंडा सुनिश्चित होईल. असे या मुलाखतीत ऐकायला मिळते.
यासंदर्भात आम्ही परराष्ट्र व्यवहार तज्ञ सुशांत सरीन यांच्याशी बोललो. “G20 च्या आयोजनाची किंवा यजमानपदाची संधी मिळणे हा भाग अर्थव्यवस्थेवर आधारित नसून तो रोटेशन चा भाग असतो. दरवेळी दुसऱ्या सदस्य देशाला ही फिरती परिषद आयोजित करण्याची संधी मिळते.” असे त्यांनी सांगितले.
G20 म्हणजे काय?
G20 ची स्थापना 1999 मध्ये झाली. आशियाई आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी त्याची सुरुवात झाली. त्यात भारतासह जगातील 20 देशांचा समावेश आहे. मागील G20 परिषद इंडोनेशियातील बाली येथे झाली. ज्याचे यजमानपद इंडोनेशियाकडे होते. सुरुवातीला G20 हा मॅक्रो इकॉनॉमिक मुद्द्यांवर आधारित समूह होता, पण नंतर त्याचा अजेंडा वाढवण्यात आला. आणि त्यात व्यापार, हवामान बदल, शाश्वत विकास, आरोग्य, कृषी, ऊर्जा, पर्यावरण आणि भ्रष्टाचाराला विरोध यांचाही समावेश करण्यात आला आहे.
Conclusion
हे खरे आहे की भारत ही जगासाठी मोठी बाजारपेठ आहे तसेच एक उदयोन्मुख आर्थिक शक्ती आहे. पण असा कोणताही पुरावा किंवा दस्तऐवज आम्हाला सापडला नाही, ज्याच्या आधारे असे म्हणता येईल की भारताला जी-20 चे अध्यक्षपद त्याच्या वाढत्या आर्थिक ताकदीमुळे मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात केलेला दावा आम्हाला खोटा आढळला आहे. ही परिषद आयोजित करण्याची संधी भारताला मिळली हे गौरवास्पद आहे. याबद्दल आम्ही कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
Result: False
Our Sources
Tweet made by Congress leader Jairam Ramesh
Official Website of G20
Video Published by Sansad TV
Telephonic conversation with foreign affairs expert Sushant Sareen
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in