Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर एका शाळकरी मुलीचा गळा चिरण्याचा प्रयत्न करताना जिहादी मारला गेला.
हा एकतर्फी प्रेमातून झालेल्या घटनेचा सातारा येथील व्हिडीओ असून सदर मुलगी व तरुण हिंदू आहेत. तरुण जिवंत असून पोलिसांची कारवाई सुरु आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक तरुण एका शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावत असल्याचा हा व्हिडीओ सध्या कम्युनल अँगलने शेयर केला जात आहे.



दाव्यांचे संग्रहण येथे, येथे आणि येथे पाहता येईल.
“महाराष्ट्रातील घटना, लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर एका शाळकरी मुलीचा गळा चिरण्याचा प्रयत्न करताना जिहादी मारला गेला. जिहादी आणि मुल्लांवर लक्ष ठेवा, तुमच्या बहिणी आणि मुलींना सावध करा!!!” अशा मूळ हिंदी भाषेतील कॅप्शन सोबत हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.
आम्हाला हा एकतर्फी प्रेमातून झालेल्या घटनेचा सातारा येथील व्हिडीओ असून सदर मुलगी व तरुण हिंदू आहेत. तसेच या घटनेतील तरुण जिवंत असून त्याच्यावर पोलिसांची कारवाई सुरु असल्याचे आढळले.
व्हायरल दावा आणि व्हिडिओचा तपास करण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला समान किफ्रेम्स वापरलेली NDTV मराठीची २१ जुलै २०२५ रोजी प्रकाशित बातमी सापडली.

“सातारा शहरातील बसप्पा पेठ परिसरात ही घटना घडली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी युक्तीने पकडले आहे. त्याला पकडल्यानंतर तिथल्या लोकांनी त्याला बेदम चोप दिला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक शाळकरी मुलगी या भागातून जात असताना एक युवक तिला रस्त्यात अडवून एका बाजूला घेऊन गेला. बोलता बोलता त्याने खिशातून धारदार चाकू काढला. मुलीच्या गळ्याला लावून “तुला ठार मारीन,” अशी धमकी दिली. त्यावेळी तिथं बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.” असे आम्हाला या बातमीत वाचायला मिळाले.
घटनेची कल्पना येताच आम्ही संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला. यावेळी आम्हाला पुढारी, टीव्ही 9 मराठी, News 18 हिंदी आदी माध्यमांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या बातम्या आढळल्या. यामध्येही सातारा शहराच्या बसाप्पा पेठेत घडलेली ही घटना एकतर्फी प्रेमातूनच घडल्याची माहिती मिळाली. या बातम्यात संबंधित युवकाला चोप दिला, शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले असे उल्लेख आढळले. मात्र कुठेही लव्ह जिहादचा उल्लेख पाहायला मिळाला नाही.



अधिक तपास करताना आम्हाला तरुण भारत दैनिकाच्या सातारा आवृत्तीने २२ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध केलेली याच घटनेची सविस्तर बातमी मिळाली. या बातमीत संबंधित तरुणाचे नाव आर्यन चंद्रकांत वाघमाळे (रा. मोळाचा ओढा, सातारा) असे असल्याचे वाचायला मिळाले. यावरून सदर तरुण हिंदू असल्याचे स्पष्ट झाले.

अधिक माहितीसाठी आम्ही तरुण भारत साताराचे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “या घटनेतील तरुण आर्यन वाघमाळे असून तो हिंदू आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचे नाव जाहीर करता आलेले नाही. मात्र तीही हिंदूच आहे. ती गुरुकुल शाळेत शिकते तर तरुणही त्याच शाळेत शिकत होता. प्रेमभंग झाल्यावरून त्याने हा प्रकार केला आहे. व्हायरल दाव्यात म्हटल्याप्रमाणे यात लव्ह जिहाद किंवा कम्युनल अँगल नाही. शिवाय तो तरुण मारला गेल्याचा दावाही खोटा असून त्याच्यावर पोलीस कारवाई सुरु आहे.” अशी माहिती दिली.
आम्ही साताऱ्याच्या शाहूपुरी पोलीस स्थानकाशीही संपर्क साधला, तेथे व्हायरल दावा खोटा आहे. संबंधित तरुण आर्यन हा हिंदू असून त्याच्यावर पोक्सो, विनयभंग, हत्यार बाळगणे आणि जखमी करणे या गुन्ह्यांवरून कारवाई सुरु आहे. अशी माहिती मिळाली.
अशाप्रकारे आमच्या तपासात महाराष्ट्रात लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर एका शाळकरी मुलीचा गळा चिरण्याचा प्रयत्न करताना जिहादी मारला गेला असे सांगणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Article published by NDTV Marathi on July 21, 2025
Article published by TV9 Marathi on July 21, 2025
Article published by News18 Hindi on July 21, 2025
Article published by Tarun Bharat on July 22, 2025
Telephonic conversation with Mr. Dipak Prabhavalkar, Edition Incharge, Tarun Bharat Satara
Telephonic conversation with Shahuhpuri police station, Satara
Vasudha Beri
October 24, 2025
Sabloo Thomas
October 24, 2025
JP Tripathi
October 9, 2025