Authors
Claim
हरियाणातील सिरसा येथे भाजप उमेदवार अशोक तंवर यांच्या विरोधात लोकांनी निदर्शने केली.
Fact
हा व्हिडिओ सुमारे 3 वर्षांपूर्वी उपसभापती रणबीर गंगवा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचा आहे.
एका वाहनावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरियाणातील सिरसा येथे लोकांनी भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा दावा करत व्हिडिओ शेअर केला जात आहे.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की हा व्हिडिओ सुमारे 3 वर्षे जुना आहे आणि 2020-2021 मधील शेतकरी आंदोलनाचा आहे. हरियाणा विधानसभेचे उपसभापती रणबीर गंगवा यांच्या ताफ्यावर सिरसा येथे दगडफेक करण्यात आली होती.
व्हायरल व्हिडिओ सुमारे 28 सेकंदांचा आहे. ज्यामध्ये काही लोक ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवताना दिसत आहेत. दरम्यान, काही लोक ताफ्यातील वाहनावर दगडफेक करू लागतात, त्यामुळे वाहनाच्या काचा फुटल्या जातात. व्हिडिओच्या शीर्षस्थानी सिरसा असे लिहिलेले आहे आणि “पीबी न्यूज” चा लोगो देखील आहे.
व्हिडिओ शेअर करताना लिहिलेली कॅप्शन पुढील प्रमाणे आहे, “शिरसा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अशोक तंवर यांना संतप्त जनतेने गावातून अक्षरशः हाकलून लावले. देशभरात भाजप उमेदवारांना गावबंदी केली जात आहे. सर्वत्र भाजप विरोधात जबरदस्त राग दिसत आहे. म्हणून मोदी आणी शहा बिथरले आहेत.”
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
Fact Check/ Verification
Newschecker ने व्हिडिओच्या कीफ्रेमच्या मदतीने प्रथम Google वर शोधले आणि Pahredar Bharat नावाच्या पोर्टलवरून 11 जुलै 2021 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. या व्हिडिओमध्ये तेच लोक होते, जे व्हायरल व्हिडिओमध्येही आहेत.
सुमारे 7 मिनिटे 41 सेकंदांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागात व्हायरल झालेला व्हिडिओ आम्हाला आढळला. व्हिडिओसोबतच्या वर्णनात सिरसा येथील शेतकऱ्यांनी हरियाणाचे उपसभापती रणबीर गंगवा यांची गाडी फोडल्याचे सांगण्यात आले.
यानंतर, जेव्हा आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने Google वर शोधले तेव्हा आम्हाला 11 जुलै 2021 रोजी ETV भारत वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. यामध्ये, व्हायरल व्हिडिओशी संबंधित व्हिज्युअल फीचर इमेजच्या स्वरूपात उपस्थित होते.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै 2021 रोजी सिरसा येथील चौधरी देवीलाल विद्यापीठात भाजपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रणबीर गंगवा आणि इतर अनेक भाजप नेतेही सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर उपसभापती रणबीर गंगवा बाहेर आले तेव्हा त्यांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी तीन कृषी कायद्यांना विरोध करत थांबवले. यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या.
तपासादरम्यान, आम्हाला 12 जुलै 2021 रोजी Aaj Tak च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील सापडला. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या रणबीर गंगवा यांना शेतकऱ्यांनी विरोध केला आणि यादरम्यान त्यांच्या गाडीलाही लक्ष्य करण्यात आल्याचेही या वृत्तात सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, त्यामुळे शेतकरीही जखमी झाले.
या व्यतिरिक्त, आम्हाला 13 जुलै 2021 रोजी न्यूज 18 हिंदी वेबसाइटवर प्रकाशित केलेला रिपोर्ट देखील सापडला. या वृत्तात सिरसा पोलिसांनी या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात सुमारे 100 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.
आमच्या तपासात आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ अलीकडचा नसून 2021 मध्ये उपसभापती रणबीर गंगवा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचा आहे.
यानंतर, आम्ही अशोक तन्वर यांना विरोध झाल्याच्या दाव्याचीही चौकशी केली आणि 6 एप्रिल 2024 रोजी दैनिक भास्करच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. गेल्या शनिवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भाजपचे उमेदवार अशोक तंवर यांना आपला कार्यक्रम रद्द करावा लागला, असे या वृत्तात म्हटले आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता.
Conclusion
त्यामुळे, आमच्या तपासानुसार, अशोक तंवर यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याच्या दाव्यासह व्हायरल होणारा हा व्हिडिओ जुलै 2021 मध्ये उपसभापती रणबीर गंगवा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचा आहे.
Result: False
Our Sources
Video Report by PB News on 11th July 2021
Article Published by ETV Bharat on 11th July 2021
Article Published by AAJ TAK on 12th July 2021
Article Published by NEWS 18 on 13th July 2021
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून, ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा