लाडकी बहीण योजनेत आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात 15000 महिला ठरल्या अपात्र असे वृत्त सध्या व्हायरल आहे. विशेषतः महाराष्ट्रातील प्रमुख टीव्ही माध्यम एबीपी माझा ने वृत्त प्रसिद्ध करीत हा दावा केला आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
विशेष म्हणजे “रायगडमधील 15 हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र” या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करीत पुढारी न्यूजनेही हाच दावा केला आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
Fact Check/Verification
दोन मेनस्ट्रीम माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली असल्याने आणि एबीपी माझा ने आपल्या वेबसाईटवर याचसंदर्भात बातमी देताना “राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवी माहिती समोर आली आहे.” असे म्हटल्याने आम्ही याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.
कीवर्ड सर्च करीत असताना आम्हाला या योजनेशी प्रमुख संबंधित असणाऱ्या आणि ज्यांच्या नावाचा आणि जिल्ह्याचा उल्लेख करून हा दावा केला जात आहे त्या, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे २५ मार्च २०२५ रोजी केलेले एक ट्विट आढळले. यामध्ये त्यांनी या दाव्याचे खंडन केले असल्याचे आम्हाला आढळले.

“रायगड जिल्ह्यातील १५ हजारहून अधिक महिला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून अपात्र झाल्याचे वृत्त जनतेची दिशाभूल करणारे आहे. दिनांक २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकषांच्या आधारावर महिलांनी अर्ज केले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र / अपात्र महिलांची वर्गवारी केली. त्यानुसार रायगड जिल्ह्यातून आलेल्या एकूण अर्जांपैकी सुमारे ६ लाख अर्ज पात्र ठरले, तर १५,८४९ महिला अर्ज छाननी प्रक्रियेतच अपात्र ठरल्या होत्या. ही संपूर्ण प्रक्रिया बऱ्यापैकी सुमारे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ पूर्वीच पार पडली आहे. पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मार्च २०२५ पर्यंतचा सन्मान निधी यशस्वीरित्या वितरित करण्यात आला आहे. ज्या अर्जदार कधी योजनेसाठी पात्रच ठरल्या नाहीत, ज्यांना कधी योजनेचा लाभ देण्यात आला नाही त्या महिलांना पुन्हा नव्याने अपात्र ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हा खोटा संदर्भ देऊन करण्यात आलेले वृत्त धादांत खोटे व खोडसाळ आहे.महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. एकाही पात्र भगिनीवर अन्याय होणार नाही हा शब्द मी संपूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना देते.” असे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
यावरून अर्ज केलेल्या रायगड जिल्ह्यातील १५,८४९ महिला अर्ज छाननी प्रक्रियेतच अपात्र ठरल्या होत्या. ही संपूर्ण प्रक्रिया बऱ्यापैकी सुमारे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ पूर्वीच पार पडली आहे. हे स्पष्ट झाले.
अधिक तपासासाठी आम्ही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला, दरम्यान महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती योग्य असून संबंधित दावा दिशाभूल करणारा आहे.” अशी माहिती दिली. दरम्यान जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग ने मंत्री आदिती तटकरे यांनी केलेले दाव्याचे खंडन करणारे ट्विट री ट्विट केले असल्याचे सांगितले.

आणखी तपास करताना आम्हाला e sakal ने यासंदर्भात प्रसिद्ध केलेले २६ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध केलेले वृत्त पाहायला मिळाले. यामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या स्पष्टीकरणाचा उल्लेख करीत संबंधित महिला अपात्रता मुद्दा सध्याचा नसून १० ऑक्टोबर २०२५ चा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात लाडकी बहीण योजनेत आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात 15000 महिला ठरल्या अपात्र हा दावा चुकीच्या संदर्भाने दिशाभूल करीत व्हायरल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Tweet made by Aditi Tatkare on March 25, 2025
Tweet made by Information Officer, Raigad on March 25, 2025
Conversation with DC Office Raigad
News published by esakal on March 26, 2025