छत्रपतींचा केलेला अपमान चिल्लर असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असे सांगणारा दावा सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

“फडणवीसांच्या मते, औरंगाजेबची स्तुती करणारा दोषी…पण महाराजांची बदनामी करणारे सोलापूरकर, कोरटकर चिल्लर दोषी…” असे हा दावा सांगतो.
“कोरटकरने छत्रपतींचा केलेला अपमान चिल्लर? इतका निर्लज्जपणा कुठून येतो?” असा सवाल करीत व्हिडिओच्या माध्यमातूनही हा दावा केला जात आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्यासंदर्भात पाहणी करताना आम्हाला दाव्याच्या खाली करण्यात आलेली कॅप्शन पाहायला मिळाली. कॅप्शन लिहिणाऱ्या @PritamSakolkar या X युजरने “अर्धी क्लिप कापून, वेगळाच चुकीचा संदर्भ देवून कशाला उडता तीर घेतोस बघ पूर्ण व्हिडिओ” असे लिहीत एक व्हिडीओ शेयर केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
कॅप्शनमध्ये घालण्यात आलेल्या व्हिडिओत आम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे बोलतांना दिसतात. “अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे, अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले आहेत इथे समोर आतापर्यंत उचलून टाकायला पाहिजे होतं त्याला जेलमध्ये, आपली इथल्या लॉकअप मध्ये…..” असे त्यांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलू लागतात. “सभापती महोदय, जेलमध्ये टाकीन… शंभर टक्के टाकू…. आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती, या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टामध्ये स्थगिती घेतली आहे, त्याच्या वरती जायला सांगितलंय मी. तर हे मी तुम्हाला सांगतो कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो, मला सांगा जितेंद्र आवाढ काय बोलला, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही…..जितेंद्र आवाढ याठिकाणी म्हणतात, की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता महाराज पाच फुटाचे होते. रेकॉर्डवर? कधीही निषेध करा तुम्ही असे सिलेक्टिव्ह करू नका. नाही केला तुम्ही, नाही केला….” असे सांगतानाच पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात केलेल्या नोंदींबद्दलही ते बोलताना दिसतात.
संबंधित व्हिडीओवरून आम्हाला हे भाषण महाअर्थसंकल्पिय अधिवेशनातील असल्याचे दिसून आले. यावरून संबंधित किवर्डसच्या माध्यमातून आम्ही शोध घेतला. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणा संदर्भात माहिती देणाऱ्या अनेक बातम्या पाहायला मिळाल्या त्या येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील.




तपास करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर आम्हाला ५ मार्च २०२५ रोजीचा हा व्हिडीओ पाहायला मिळाला. यामध्ये १ मिनिटा नंतर देवेंद्र फडणवीस या मुद्द्यावर बोलताना दिसतात. तेथील पूर्ण भाषण ऐकल्यास मागील आणि पुढील भाग काढून दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येते.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात छत्रपतींचा केलेला अपमान चिल्लर असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असे सांगणारा दावा संदर्भ बदलून करण्यात आला आहे, हे स्पष्ट झाले.
Our Sources
News published by TV 9 Marathi on March 5, 2025
News published by Lokshahi Marathi on March 5, 2025
News published by Loksatta on March 5, 2025
Video published by Devendra Fadanvis on March 5, 2025