Fact Check
भारत-पाक संघर्षावर मौन बाळगल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांची बॉलीवूड कलाकारांवर टीका हा दावा खोटा
Claim
भारत-पाक संघर्षावर मौन बाळगल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांची बॉलीवूड कलाकारांवर टीका.
Fact
हा दावा खोटा आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अशी कोणतीही टीका केलेली नसून अशी पोस्ट करणारे अकाउंट फेक आहे.
भारत-पाक संघर्षावर सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. या संघर्षात बॉलिवूड कलाकारांनी मौन बाळगले असा आरोप करून अनेक युजर्स त्यांना ट्रोल करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांची भारत-पाक संघर्षावर मौन बाळगल्याबद्दल बॉलीवूड कलाकारांवर टीका असा दावा करीत एक स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.

“आज खर तर मला महाराष्ट्र पोलीस वर गर्व हे Proud of you Maharashtra police” अशा कॅप्शनखाली हा दावा करण्यात आला असून “प्रिय सेलिब्रिटींनो, आता सुरक्षित आहे. तुम्ही पुन्हा इंस्टाग्रामवर सरपटू शकता, तुमच्या आंतराष्ट्रीय फॅनबेसला नाराज करण्याचा धोका नाही.” अशी इंग्रजीमधील कॅप्शन बॉलिवूड कलाकारांच्या फोटो कॉलेजमध्ये लिहिण्यात आली आहे.
आम्हाला अशीच पोस्ट रेडीटवर “महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेली ही स्टोरी पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल तीव्र आदर आहे.” अशा कॅप्शनखाली पाहायला मिळाली.

“भारत-पाक संघर्षावर मौन बाळगल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांची बॉलीवूड कलाकारांवर टीका केली” अशा शीर्षकासह गुवाहाटी प्लस नामक वेबसाईटनेही बातमी प्रसिद्ध केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

दाव्यांचे संग्रहण येथे, येथे आणि येथे पाहता येईल.
Fact Check/Verification
दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम संबंधित किवर्डसच्या माध्यमातून Google सर्च केला. मात्र कोणत्याही अधिकृत माध्यमाने यासंदर्भात बातमी केल्याचे आढळले नाही. महाराष्ट्र पोलिसांनी बॉलिवूड कलाकारांवर अशी टीका केली असती तर त्याची मोठी बातमी झाली असती.

यामुळे संशय आल्याने आम्ही दाव्यामध्ये शेयर करण्यात आलेला स्क्रिनशॉट काळजीपूर्वक पाहिला. संबंधित स्क्रीनशॉटमध्ये themaharashtrapolice नामक इंस्टाग्राम खात्याने पोस्ट केलेल्या स्टोरीचा हा स्क्रिनशॉट असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

आम्ही themaharashtrapolice हे खाते Instagram वर शोधले. मात्र अपलोड केलेली स्टोरी फक्त १२ तासच उपलब्ध राहत असल्याने आम्हाला ती पोस्ट मिळाली नाही. आम्ही त्यावरील इतर पोस्ट पाहिल्या त्यामध्ये पोलिसांशी संबंधित कार्यक्रम व इतर पोस्ट पाहायला मिळाल्या. मात्र हे खाते व्हेरीफाईड नसल्याची बाब समोर आली.

महत्वाचे म्हणजे संबंधित खात्याने आपल्या बायोमध्ये “हे महाराष्ट्र पोलीसांचे सन्मानार्थ बनवलेले अनऑफिशियल पेज (Unofficial Page) आहे.” अशी जाहीर कबुलीच देण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले.
आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे असे खाते Instagram वर आहे का? याचा शोध घेतला. मात्र या माध्यमावर पोलीस खात्याची अधिकृत उपस्थिती जाणवली नाही. आम्ही X वर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत खात्यावर शोध घेतला असता बॉलिवूड कलाकारांवर टीका करणारी अशी कोणतीही पोस्ट करण्यात आल्याचे दिसून आले नाही.


यामुळे आम्ही महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर सेलचे डीजी संजय शिंत्रे यांच्याशी बोललो. त्यांनी “संबंधित स्टोरी प्रसारित करणारे अकाउंट महाराष्ट्र पोलीस असे भासवणारे फेक अकाउंट आहे. असे सांगितले.” याचबरोबरीने “संबंधीत खात्याबद्दलच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की हे खाते महाराष्ट्र पोलिसांचेच असल्याचा आभास निर्माण करीत आहे. त्यातील मजकूर महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अधिकृत पोस्टशी जवळजवळ जुळतो. हे खाते तोतयागिरीचे मजबूत संकेत दर्शविते आणि नाशिक पोलिस किंवा महाराष्ट्र पोलिस दलाशी संबंधित अधिकृत संस्था म्हणून ते भासवत आहे.” अशी माहिती दिली.
यावरून इंटरनेट युजर्स महाराष्ट्र पोलिसांचे खाते असे भासवणाऱ्या खात्याच्या इंस्टाग्राम स्टोरीचा स्क्रिनशॉट घेऊन हा चुकीचा दावा करीत असल्याचे स्पष्ट झाले.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात भारत-पाक संघर्षावर मौन बाळगल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांची बॉलीवूड कलाकारांवर टीका हा दावा खोटा असून महाराष्ट्र पोलिसांनी अशी कोणतीही टीका केलेली नाही. अशी पोस्ट करणारे अकाउंट फेक व महाराष्ट्र पोलिसांचे खाते असल्याचा बनाव करीत आहे.
Our Sources
Google Search
Self Analysis
Official X account of Maharashtra Police
Conversation with Maharashtra Police Cyber Cell DG Sanjay Shintre