Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी हिंदू तरुणांनी लग्न करावे, ५ लाख रुपये देऊ, असे आवाहन आरएसएस ने पत्राद्वारे हिंदू तरुणांना केले आहे.
Fact
आरएसएस च्या लेटर हेड चा वापर करून गैरसमज निर्माण केला जात आहे. आरएसएस ने असे पत्र जारी केल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे.
आरएसएस ने हिंदू तरुणांना उद्देशून लिहिलेले पत्र म्हणून एक दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. हिंदू तरुणांनो मुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवा, त्यांच्याशी शारिरिक संबंध बनवा आणि त्यांच्याशी विवाह करा. याकामासाठी संघटनेकडून आपल्याला ५ लाख रुपये दिले जातील असे आवाहन आरएसएस ने या पत्राद्वारे जाहीररीत्या केले असल्याचा आरोप या दाव्याद्वारे होऊ लागला आहे. व्हाट्सअप वर तसेच ट्विटर वर हे पत्र व्हायरल झाले आहे.
या पोस्टाचे संग्रहण आपण येथे पाहू शकता.
फेसबुकवर सुद्धा असंख्य युजर्सनी या पत्राची दोन पृष्ठे शेयर केली आहेत. मुस्लिम महिलांनी आणि मुलींनी सावध राहावे असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे.


महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणा या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चे सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आरएसएस च्या नावे लव्ह जिहाद सारखाच प्रकार मुस्लिम तरुणीच्या बाबतीत करावा असे जाहीर आवाहन करण्यात आल्याचा हा दावा वादग्रस्त ठरत आहे. याप्रकारच्या दाव्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून न्यूजचेकर मराठीने या दाव्याच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आरएसएस च्या नावे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पत्र आम्ही सर्वप्रथम बारकाईने पाहिले. या पत्राची दोन पृष्ठे आपणही याठिकाणी पाहू शकता.


या पत्राच्या दोन पृष्ठांची पाहणी करता आम्हाला त्यामध्ये मुस्लिम तरुणींना जाळ्यात कसे अडकवावे यासंदर्भात सूचना लिहिण्यात आल्या असल्याचे पाहायला मिळाले. सरसंघचालकांनी व्यापक प्रसाराच्या हेतूने हे अतिगोपनीय सूचना पत्र दिले असल्याचा उल्लेख सर्वात वर आढळतो. मुस्लिम मुलींना फशी पाडवण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मिळेल आणि यशस्वी झालेल्यांना ५ लाख रुपये देऊन तसेच सर्वप्रकारचे संरक्षण देऊन लग्न करण्यास मदत केली जाईल असा उल्लेख आढळतो. या पत्राच्या प्रति अखिल भारतीय हिंदू समाज, बजरंग दल, हिंदू सेना, हिंदू युवा वाहिनी आणि समस्त हिंदू समाज या संलग्न हिंदू संघटनांना देण्यात आल्याचाही उल्लेख आढळला आहे. दरम्यान या पत्रावर आरएसएस शी संबंधित कोणाच्याही स्वाक्षऱ्या किंवा नावांचा उल्लेख आम्हाला आढळला नाही.
आम्ही पत्रातील मजकूर वाचण्याचा प्रयत्न केला असता व्याकरणाच्या दृष्टीने झालेल्या काही चुका आम्हाला पाहायला मिळाल्या. जसे की पत्रात ‘बजरंग दल’ चा उल्लेख ‘बजरंग दिल’ असा करण्यात आला आहे. ‘इस लडकी’ च्या ऐवजी ‘उस लडकी’, ‘तलाशें’ च्या ऐवजी ‘तलाश’ यासारख्या इतर अनेक चुका आम्ही पाहिल्या.
आम्ही व्हायरल पत्र ज्या लेटर हेड वर लिहिण्यात आले आहे त्याचीही बारकाईने पाहणी केली. त्यावर आम्हाला आरएसएस चे नवी दिल्ली येथील केशवकुंज या कार्यालयाचा पत्ता आढळला. तसेच आरएसएस चा लोगोही पाहायला मिळाला.

अशा प्रकारचा कोणता फतवा किंवा जाहीर प्रकटन आरएसएस च्या माध्यमातून काढण्यात आले आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. इतका मोठा आवाहनाचा निर्णय घेण्यात आलेला असताना त्यासंदर्भात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का? याचा आम्ही शोध घेतला. मात्र काहीच उपलब्ध झाले नाही. यामुळे आम्ही संघटनेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर यासंदर्भात काही सापडते का हे शोधून पाहिले. मात्र तशी कोणतीच माहिती किंवा व्हायरल पत्राचा उल्लेख आम्हाला सापडला नाही.
यानंतर किवर्ड सर्च च्या माध्यमातून शोधताना आम्हाला VSK BHARAT या माध्यम संस्थेने १० एप्रिल २०२३ रोजी केलेले एक ट्विट सापडले. ही संस्था आरएसएस ची माध्यम संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचा अराजकतावादी घटकांचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न, संघाच्या लेटरहेडवर सरसंघचालकांच्या नावाचे खोटे पत्र सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून व्हायरल केले जात आहे.” असा उल्लेख पाहायला मिळाला. यावरून याबद्दल आरएसएस मार्फत या पत्राबद्दल स्पष्ट इन्कार केला गेला असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
आरएसएस च्या लेटरहेड चा दुरुपयोग करण्यात झाला असल्याचा आरोप पाहायला मिळताच आम्ही त्याबाबतीत तुलनात्मक परीक्षण पाहिले.
आम्हाला आरएसएस च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून पोस्ट करण्यात आलेले लेटरहेड वरील एक पत्र मिळाले.
त्याची आणि व्हायरल पत्रातील लेटरहेडची तुलना केली असता आम्हाला व्हायरल पत्रात आरएसएस च्या लोगो मध्ये फेरफार झालेला असल्याचे निदर्शनास आले. मूळ लेटरहेड वर लोगोच्या खाली ‘संघे शक्ति: कलौयुगे‘ असा उल्लेख असून तो व्हायरल पत्रासाठी वापरण्यात आलेल्या लेटरहेड वर दिसत नाही. यासंदर्भातील तुलनात्मक परीक्षण आपण खालील इमेज मध्ये पाहू शकता.

आरएसएस आजही ओरिजनल फोटोत दिसणारे लेटरहेड आपल्या सर्व व्यवहारांसाठी वापरते अशी माहिती आम्हाला मिळाली.
यानंतर आम्ही मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी संपर्क साधला. आरएसएस अशाप्रकारे पत्र प्रसिद्ध करून हिंदू तरुणांनी मुस्लिम तरुणींना जाळ्यात ओढावे असे आवाहन करू शकते का? आरएसएस ने असे केले असेल का? असा प्रश्न विचारला. त्यांनी “आपल्याला आरएसएस असे थेट पत्र लिहून अश्यापद्धतीचे आवाहन करेल असे वाटत नाही. असेच सांगितले. आरएसएस ची मते आपल्याला पटत नाहीत. मात्र याविषयावर आपल्याला नक्कीच वाटत नाही की आरएसएस असे काही थेट करेल. अशाप्रकारच्या पत्रांनी सामाजिक हिताला नक्कीच बाधा येऊ शकते. दरम्यान अशा गोष्टी वाढल्या जाऊ नयेत यासाठी सरकार आणि इतर जबाबदार घटकांनी योग्य ती पाऊले उचलायला हवीत.” असे सांगितले.
आरएसएस संबंधित कार्यक्रमांचे वृत्तांकन करण्याचा अनुभव असलेले आणि मागील १८ वर्षांपासून संघटनेच्या घडामोडींसंदर्भात माहिती असणारे पत्रकार प्रकाश बिळगोजी यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता, “ते पत्र पाहताच हा बनवटगिरीचा प्रकार असल्याचे लक्षात येते. आरएसएस चा लोगो चुकीचा आहे. पत्राचा पॅटर्न चुकीचा आहे. विशेष म्हणजे पत्र हिंदीत असून व्याकरणाच्या असंख्य चुका आहे. आरएसएस ने आजवर जारी केलेल्या प्रत्येक पत्रात खाली संबंधित पत्र लेखकाचे नाव आणि सही जोडण्याची प्रथा पाळली आहे. मात्र या पत्रात हे घटक दिसत नाहीत. महत्वाचे म्हणजे या पत्रात वापरलेली भाषा ही आरएसएस च्या भाषेशी मिळती जुळती नाही. हे पत्र दिशाभूल करण्यासाठी तयार केले गेलेले आहे.” हे बारकावे त्यांनी न्यूजचेकर च्या निदर्शनास आणून दिले. “विशेषतः आरएसएस ने आपल्या लेटरहेड वर वापरण्याचा लोगो बदललेला नसून व्हायरल पत्रात लोगो च्या बाबतीत झालेली चूक पाहता हे पत्र खोटे असल्याचे निदर्शक आहे.” असेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात थेट जाणून घेण्यासाठी आम्ही आरएसएस च्या प्रचारप्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांची प्रतिक्रिया मिळताच हा लेख अपडेट केला जाईल.
आरएसएस च्या अनेक विभागप्रमुखांशी आम्ही बोललो. “आरएसएस ही संघटना असे घाणेरडे प्रकार कधीच करीत नाही. आम्हाला अशा प्रकारांनी धर्म प्रसार करण्याची गरज नाही,” अशी माहिती त्यांनी दिली. यासंदर्भातील खुलासा VSK BHARAT वर करण्यात आला असून हा कारभार बदनामी करण्यासाठीचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. संघाच्या नियमानुसार इतरांना नावे जाहीर करून प्रतिक्रिया देण्यास अनुमती नसल्याने यासंदर्भात प्रतिक्रिया देणाऱ्यांची नावे याठिकाणी देण्यात आलेली नाहीत.
दरम्यान आरएसएस चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ११ एप्रिल २०२३ रोजी यासंदर्भात केलेले ट्विटही आम्हाला मिळाले असून ते आम्ही याठिकाणी जोडत आहोत.
मुस्लिम मुली किंवा महिलांना जाळ्यात ओढा असे सांगणारे व्हायरल पत्र आरएसएस ने जारी केले आहे असे सांगणारा ठोस पुरावा आमच्या तपासात मिळाला नाही. आरएसएस ने ही अशाप्रकारे पत्र प्रसारित केल्याच्या दाव्याचा इन्कारच केलेला असून हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Tweet made by VSK BHARAT on April 10, 2023
Tweet made by RSS on July 28, 2015
Self Analysis
Conversation with Political Analysit and Senior Journalist Hemant Desai
Conversation with Karyakrtaas and Divisional Heads of RSS
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
October 25, 2025
Vasudha Beri
October 24, 2025
Prasad S Prabhu
October 23, 2025