Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact Checkमहाराष्ट्रात मशिदींपेक्षा मंदिरांना जास्त वीज बिल आकारत नाहीत, व्हायरल दावा खोटा

महाराष्ट्रात मशिदींपेक्षा मंदिरांना जास्त वीज बिल आकारत नाहीत, व्हायरल दावा खोटा

आपल्या भारत देशात किंवा महाराष्ट्रात मशिदींपेक्षा जास्त दराने मंदिरांसाठी वीजबिल आकारले जाते, असा दावा सध्या केला जात आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील असा दावा करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. आपला देश एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणायचा आणि दुसरीकडे मंदिर आणि मशिदीच्या बाबतीत असा दुजाभाव करायचा असे सुरु असल्याचे व्हायरल मेसेज सांगतो.

” विचित्र विडंबन, हिंदू झोप घेतोय, सामान्य नागरिकांसाठी प्रति युनिट वीजदर ७.८५, मशिदींना प्रति युनिट १.८५ तर मंदिरांना ७.८५ रुपये प्रति युनिट दराने वीज बिल आकारले जात आहे.” असे हा व्हायरल मेसेज सांगतो. हा मेसेज व्हाट्सअप वर ही मोठ्याप्रमाणात पसरताना आढळला. अनेक वाचकांनी आम्हाला आमच्या व्हाट्सअप क्रमांकावर संदेश पाठवून या संदेशाची पडताळणी करण्याची विनंती केली.

Screengrab of Viral message

Fact Check/Verification

व्हायरल संदेशाची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही किवर्ड सर्च करून मशिदींना कमी वीज दर आणि मंदिरांना वाढीव वीज दर आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती आढळली नाही. मात्र आम्हाला असेच विविध भाषेत व्हायरल झालेले अनेक संदेश आढळले. ते इतर राज्यांशी संबंधित आरोप करणारे होते.

यामुळे आमच्या हे लक्षात आले की असा संदेश विविध भाषांमधून तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळ आदी राज्यातही पसरू लागला आहे. संबंधित कोणत्याही राज्यांनी अशी वीजदर संदर्भातील माहिती घोषित केलेली नाही हे आमच्या लक्षात आले. मराठीत मिळालेला संदेश महाराष्ट्राशी संबंधित असल्याचे लक्षात येताच आम्ही महावितरण च्या अधिकृत वेबसाईटवर पाहणी केली मात्र धार्मिक धोरणावर कोणत्याही प्रार्थनास्थळांसाठी अशी वेगवेगळी बिले आकारली जात असल्याचे आम्हाला आढळले नाही.

महावितरण च्या वेबसाइटवर आम्ही नियमन आणि धोरणे या सदरात जाऊन वीज बिलातील तफावत आणि प्रार्थनास्थळांसाठी काही वीज बिलांबद्दल निर्णय घेण्यात आला आहे का? याबद्दल शोध घेतला मात्र तशी कोणतीही माहिती मिळाली नाही.

screengrab of Mahavitaran Website

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महावितरण च्या कोल्हापूर आणि कोकण परिमंडळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता, त्यांनी विस्तृत माहिती दिली. प्रार्थनास्थळांना (मंदिर, गुरुद्वारा, चर्च, मस्जिद इ.) ना घरगुती वीज दराने वीज पुरवठा केला जातो. १ एप्रिल २०२२ पासून घरगुती वीज आकार दर ३.३६ पैसे इतका आहे. ० ते १०० युनिट पर्यंत याच दराने वीजबिलाची आकारणी केली जाते अशी माहिती त्यांनी दिली.

व्हायरल संदेशाप्रमाणे मंदिर, मस्जिद, चर्च यांसाठी वेगवेगळे वीजदर आकारले जातात का? असा प्रश्न उपस्थित केला असता, तसा प्रश्नच नाही. “आम्ही प्रार्थनास्थळ ही एकमेव कॅटेगरी गृहीत धरतो. प्रार्थनास्थळे कोणत्या धर्माची आहेत हे पाहून वीजबिल आकारणी करण्याचा किंवा ठरविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” असे ते म्हणाले. त्यांनी वीजबिलाच्या धोरणाबद्दल महावितरण ने जारी केलेले २०२०-२०२१ ते २०२४-२५ पर्यंतचे सर्क्युलर आम्हाला उपलब्ध करून दिले.

Circular of Mahavitaran

याचप्रमाणे प्रार्थनास्थळांना ज्याप्रमाणे वीजदर आकारला जातो त्याची अधिकृत माहिती देणारे या सर्क्युलर वरील पृष्ठ क्र. १५ वरील कोष्टक उपलब्ध झाले.

Screengrab of Mahavitaran Circular

यावरून कोणतेही वेगवेगळे वीजबिल प्रार्थनास्थळांसाठी आकारले जात नाही. अशी माहिती मिळाली आहे.

Conclusion

आमच्या तपासणीत आढळलेल्या तथ्यांनुसार हा व्हायरल दावा खोटा आहे. महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या दराने मशिदी आणि मंदिरांकडून वीज बिल आकारत नाही. शासनाकडून सर्व धार्मिक स्थळांकडून समान दराने वीजबिल वसूल केले जाते.

Result: False

Our Sources

Official website of MSEB

Telephonic Conversation with MSEB Officer


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

1 COMMENT

Most Popular