Authors
सोशल मीडियावर लोकसत्ताचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या फोटोद्वारे असा दावा केलाय की,”धनुष्यबाण निशाणी गेली तरी काही फरक पडत नाही. वेळ पडली तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर लढवणार!” हे विधान शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे.
८ जुलै २०२२ रोजी फालतुगिरी या नावाच्या फेसबुक पानाने हा फोटो पोस्ट करत त्यात लिहिले,”आता उध्वस्त सेना “घड्याळ” चिन्हावर पण निवडणूक लढायला तयार ….” काय होती शिवसेना , काय झाली उध्वस्त सेना ” फेसबुकवर हा फोटो खूप व्हायरल झाला आहे.
ट्विटरवर भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस आणि विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी या फोटोसहित ट्विट केले आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. या सर्व प्रक्रियेत धनुष्यबाण कोणाचे यावरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. यातच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नव्या चिन्हाबाबत सावध केले. त्यातच आता सोशल मीडियावर “धनुष्यबाण निशाणी गेली तरी काही फरक पडत नाही. वेळ पडली तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर लढवणार!” हे विधान संजय राऊत यांनी केले आहे, असा दावा केला जात आहे.
Fact Check / Verification
शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी हे विधान खरंच केलंय की नाही, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही लोकसत्ताचे अधिकृत फेसबुक पान तपासले. तेव्हा आम्हांला व्हायरल फोटोशी मिळता-जुळता एक फोटो मिळाला.
त्यानंतर आम्ही लोकसत्ताच्या अधिकृत फेसबुक पानावरील फोटो आणि व्हायरल झालेला फोटोची तुलना केली. दोन्ही फोटोतील विधान वगळता लोकसत्ता हे नाव, संजय राऊत यांचा फोटो आणि त्यांचे नाव, सर्वात खालची सोशल मीडियाची ओळ सारखीच असल्याचे आम्हांला समजले. त्याचबरोबर मूळ आणि व्हायरल फोटोतील मजकुराचा फॉन्ट वेगळा असल्याचे लक्षात आले.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही व्हायरल पोस्टमधील ‘धनुष्यबाण निशाणी गेली तरी काही फरक पडत नाही. वेळ पडली तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर लढवणार !’ हे विधान गुगलवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला ८ जुलै २०२२ रोजीची लोकसत्ताची एक बातमी मिळाली. तेव्हा आम्हांला मूळ फोटोतील संजय राऊत यांचे विधान व बातमीचे शीर्षक एकच असल्याचे आढळले.
शिवसेनेचे धनुष्यबाण हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली, या पार्श्वभूमीवर आम्हांला संजय राऊत यांनी केलेले ट्विट आढळले. ८ जुलै २०२२ रोजीच्या त्या ट्विटमध्ये लिहिलंय की, जब “खोने” के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता है!.. जय महाराष्ट्र !.” आपण पाहिले तर संजय राऊत यांच्या याच विधानाचा फोटो लोकसत्ताने बनवला आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.
न्यूजचेकरने या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी देखील हेच सांगितले की, व्हायरल होणारा फोटो एडिट केलेला आहे. या व्यतिरिक्त आम्ही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण आमचा संपर्क होऊ शकला नाही. जर संपर्क झाला तर आम्ही लेख अपडेट करू.
हे देखील वाचू शकता : ‘ॲफेलियन फेनोमेनन’मुळे ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहिल? याचे सत्य जाणून घ्या
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, लोकसत्ताच्या नावाने शेअर केल्या जाणाऱ्या फोटोतील संजय राऊत यांचे विधान एडिट केलेले आहे. शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी “धनुष्यबाण निशाणी गेली तरी काही फरक पडत नाही. वेळ पडली तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर लढवणार!” हे विधान केलेले नाही.
Result : Altered Photo/Video
Our Sources
लोकसत्ताच्या अधिकृत फेसबुक पानावरील मूळ फोटो
८ जुलै २०२२ रोजीची लोकसत्ताची प्रकाशित झालेली बातमी
८ जुलै २०२२ रोजी शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेले ट्विट
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.