Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckReligionExplainer: मुंबईच्या तळोजा सोसायटीत दिवाळीत दिवे लावण्यास विरोध झाल्याच्या व्हायरल दाव्याचे सत्य...

Explainer: मुंबईच्या तळोजा सोसायटीत दिवाळीत दिवे लावण्यास विरोध झाल्याच्या व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे? इथे वाचा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

मुंबईच्या तळोजा सोसायटीत दिवाळीत दिवे लावण्यास विरोध झाला, मुस्लिम समुदायाने हिंदूंना दिवाळी साजरी करण्यापासून रोखले किंवा आणखी अनेक प्रकारचे दावे करणारे सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल झाले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या काही महिलांना विरोध करणाऱ्या नागरिकांचा व्हिडीओ सर्वत्र कम्युनल अँगलने पसरविला जात आहे. हा प्रकार नेमका काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. संपूर्ण प्रकरणाची माहिती या एक्सप्लेनरच्या माध्यमातून वाचता येईल.

काय होतोय दावा?

यासंदर्भात फेसबुक आणि X वर आम्हाला असंख्य दावे पाहायला मिळाले. त्यापैकी काही दावे खाली पाहता येतील.

“नवी मुंबईच्या पंचानंद तळोजा सोसायटीत शांतिदूतांनी हिंदूंना दिवाळी साजरी करू दिली नाही. कारण मुस्लिमांची संख्या जास्त आहे.” या तसेच “नवी मुंबईतील तळोजा परिसरातील हाऊसिंग सोसायटीत जेव्हा हिंदूंनी दिवाळी पूजेसाठी रोषणाई आणि रांगोळी काढण्यास सुरुवात केली. तेव्हा समाजातील सर्व मुस्लिमांनी गुंडगिरीचा अवलंब केला आणि सांगितले की आम्ही एकाही हिंदूला दिवाळी साजरी करू देणार नाही, येथे दिवाळी सजावट किंवा रोषणाई केली जाणार नाही कारण ते आमच्या धर्मात हराम आहे. कल्पना करा, ते कोणत्याही समाजात गेले की लगेच त्यांचा धर्म आणि शरियत लादतात आणि गरीब हिंदू आपले सणही साजरे करू शकत नाहीत.” या कॅप्शनखाली हे दावे होताना आम्हाला दिसले.

दाव्यांचे संग्रहण इथे, इथे, इथे आणि इथे पाहता येतील.

काय घडली घटना?

एकंदर घटनेसंदर्भात माध्यमांनी काय माहिती दिली आहे का? हे शोधत असताना आम्हाला ABP माझाने २९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली न्यूज आम्हाला मिळाली.

बातमीमध्ये “संबंधित पंचानंद सोसायटीमध्ये सार्वजनिक जागेत रोषणाई करण्यावरून शाब्दिक वाद झाला आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने काढण्यात आली.” अशी माहिती मिळाली. आम्ही यासंदर्भात आणखी बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला मात्र कोठेच याबद्दल सविस्तर वृत्त सापडले नाही. वाद का झाला? त्याचे मूळ कारण काय? याची माहिती आम्हाला आढळली नाही. यामुळे आम्ही संबंधित सोसायटीच्या रहिवास्यांशी किंवा रहिवासी संघटनेशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.

कोणतेच सण साजरे न करण्याच्या निर्णयामुळे वाद

आम्हाला ‘पंचानंद हाईट्स को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष बद्रे आलम यांच्याशी संवाद साधता आला. त्यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणात त्यांनी सोसायटीने बहुमताने घेतलेल्या “कोणतेच सण सार्वजनिक पातळीवर साजरे न करण्याच्या” निर्णयाची माहिती दिली. सोसायटीच्या फेज १ मध्ये एकूण २१० फ्लॅट्स आहेत. त्यामध्ये ५० टक्के हिंदू कुटुंबे आणि ५० टक्के मुस्लिम कुटुंबे आहेत. यापैकी ८० टक्क्याहून अधिक जणांनी मिळून हा सोसायटीच्या कॉमन एरिया अर्थात सार्वजनिक जागेत कोणतेही धार्मिक सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जून २०२४ पासून हा निर्णय अंमलात आला आहे. असे असताना रोषणाई करण्यास दिवाळीत परवानगी देण्यात आली. यामुळे हा वाद झाला असे बद्रे आलम यांनी न्यूजचेकरशी बोलताना सांगितले. शिवाय संबंधित निर्णयाची प्रतसुद्धा उपलब्ध करून दिली.

Explainer: मुंबईच्या तळोजा सोसायटीत दिवाळीत दिवे लावण्यास विरोध झाल्याच्या व्हायरल दाव्याबद्दल जाणून घ्यायचेय? मग इथे वाचा

असा निर्णय का घेण्यात आला?

कोणतेही धार्मिक सण सार्वजनिक जागेत साजरे न करण्याबद्दलचा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न आम्ही बद्रे आलम यांना विचारला असता त्यांनी त्याची पार्श्वभूमी सांगितली. “यापूर्वीं सोसायटीत सर्व सण सार्वजनिक जागेत मिळून मिसळून साजरे केले जात होते. मुस्लिम समाजाच्या सणांवेळी सार्वजनिक जागेत बोकडे कापण्याची पद्धत काही कुटुंबांना खटकत होती. अखेर त्यांनी रहिवासी संघटनेचा अध्यक्ष म्हणून माज्याकडे दाद मागितली. मी त्यांना असे एका समुदायाला अडवता येणार नाही असे सांगून सर्वांनीच सार्वजनिक जागेत सण साजरे करणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल याची कल्पना दिली. यावर बहुमत झाले.” असे त्यांनी सांगितले.

“यामुळे त्यानंतर आलेल्या १६ जूनच्या ईद अल अदा, ७ जुलैच्या इस्लाम स्थापना दिन, १७ जुलैचा मोहरम आणि १६ सप्टेंबरच्या मिलाद ऊन नबी या मुस्लिम सणांना तसेच हिंदूंचे यादरम्यान आलेले लहान सण व गणेशोत्सवात सण साजरे करण्यासाठी सार्वजनिक जागेचा वापर झाला नाही. दरम्यान दिवाळीत रोषणाई लावण्यास मुभा द्यावी अशा काही कुटुंबांच्या विनंतीला आपण मान देऊन परवानगी दिली आणि सोमवार दि. २८ रोजी गोंधळ झाला.” असे त्यांनी सांगितले.

रोषणाईला परवानगी का दिली?

“दिवाळीचा सण घरातच साजरा होतो. मात्र आपण ज्याठिकाणी राहतो तेथे रोषणाई करण्याची हिंदू धर्मियांची पद्धत आहे. संपूर्ण देशभरात रोषणाई आणि पणत्या लावल्या जातात. यामुळे फक्त रोषणाई करण्यास आपण स्वतः परवानगी दिली. मात्र इतरांनी त्याला आक्षेप घेतला. एकदा निर्णय झालेला असताना तो मोडला का? अशा मुद्द्यावरून संबंधित वाद झाला. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. विशेषतः एका सोसायटीच्या वादाला जगासमोर मांडण्यात आले.” अशी खंतही अध्यक्ष बद्रे आलम यांनी व्यक्त केली.

आता सर्वच सण उत्साहात साजरे होणार

सोमवारचा प्रकार जगभर गाजल्यानंतर आता कोणीच कुणाची अडवणूक न करण्याचा निर्णय सर्वमताने घेण्यात आला आहे. असे अध्यक्ष बद्रे आलम यांनी सांगितले. मंगळवारी हा वाद धगधगत होता. बुधवारी यावर स्वतंत्र बैठक घेण्यात आली. यावेळी सणांच्या साजरे करण्यावरून निर्माण होत असलेला धार्मिक मुद्दा अधिक चिघळू नये असाच निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यापुढे सर्व सण उत्साहात आणि सार्वजनिक जागेत साजरे होणार आहेत. असे अध्यक्ष बद्रे आलम यांनी न्यूजचेकरला सांगितले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात हा वाद सर्वच सण सार्वजनिक जागेत न साजरे करण्याच्या निर्णयामुळे झाला होता आणि आता सर्व सण सार्वजनिक जागेत साजरे करण्याचा निर्णय घेऊन त्या वादावर पडदा टाकण्यात आला असल्याचे समजले आहे. विशेष म्हणजे वाद घालणाऱ्या कोणत्याही गटावर पोलिसात तक्रार देणे तसेच माध्यमात परस्पर विरोधी प्रतिक्रिया देण्यावरही रहिवासी संघटनेने बंदी घातली आहे.

Our Sources
Video published by ABP Majha on October 29, 2024
Conversation with Mr. Badre Alam, President, Panchanand Heights Co-operative Housing Society Ltd.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular