Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
उद्धव ठाकरे म्हणाले की मला हिंदू मतांची गरज भासणार नाही, मुस्लिम मतांवरच विधानसभा जिंकू.
Fact
हा दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे तसे म्हणालेले नाहीत. शिवसेनेने तसेच लय भारी फेसबुक पेजने याचा इन्कार केला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक दावा सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की मला हिंदू मतांची गरज भासणार नाही, मुस्लिम मतांवरच विधानसभा जिंकू असे हा दावा सांगतो.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या महाविकास आघाडीला त्यात यश मिळाले. तसेच महाराष्ट्राला आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा दावा व्हायरल होत आहे.
“उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे धर्मपरिवर्तन करूनच दाखवले. भगवा हातात घेऊन हिंदुत्वासाठी केस अंगावर घेतलेल्या बाळासाहेबांशी व समस्त एकनिष्ठ कार्यकर्त्यांशी केलेला हा दगा आहे. आता हिंदूंची त्यांना गरज नाही तर हिंदूंना देखील त्यांची गरज नाही.” अशा कॅप्शनखाली हा दावा व्हायरल होत आहे. त्यामधील पोस्टरवर “उद्धव ठाकरे यांचा फोटो असून ” मला गर्व आहे मुस्लिम समाजामुळे माझे खासदार निवडून आले. मी माझ्या भाषणात हिंदू उल्लेख बंद केला म्हणून भाजपाला मिर्च्या झोंबल्या. हिंदूंच्या मतांची आम्हाला तितकीशी गरज भासणार नाही. मुस्लिम मतांवरच विधानसभा पण जिंकून दाखवतो. – उद्धव ठाकरे” असे लिहिलेले आहे.
या दाव्याचा तपास करण्यासाठी व्हायरल दाव्यामध्ये केलेली विधाने आणि त्यासाठी वापरले गेलेले पोस्टर इमेज यांची आम्ही बारकाईने पाहणी केली. आम्ही संबंधित किवर्डसच्या माध्यमातून यासंदर्भात किवर्ड सर्च केला. मात्र एकाही अधिकृत वृत्तसंस्थेने याबद्दल बातमी दिल्याचे आमच्या पाहणीत आले नाही. उद्धव ठाकरे यांनी असे विधान केले असल्यास त्याची सर्वत्र बातमी झाली असती. मात्र तसे आढळले नाही.
दरम्यान आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संबंधित अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्स वर शोध घेतला. ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray, Shivsena UBT Communication, Office of Uddhav Thackeray आणि Uddhav Thackeray या सर्व अधिकृत खात्यांवर आम्ही धुंडाळले. मात्र हिंदू मतांची गरज भासणार नाही आणि मुस्लिम मतांवर आम्ही जिंकू अशाप्रकारचे विधान, पोस्ट किंवा भाषण केले गेल्याचे आमच्या पाहणीत आले नाही.
दरम्यान पुढील तपासात आम्ही व्हायरल पोस्टर इमेजवर असलेल्या लोगोचा विचार करून त्याअनुषंगाने शोध घेतला. आम्हाला व्हायरल पोस्टर इमेजवर ‘लय भारी’ चा लोगो आढळला. हा लोगो वापरून राजकीय व इतर विषयावर पोस्ट करणारे एक फेसबुक पेज कार्यरत असल्याने आम्ही ‘लय भारी’ च्या सोशल मीडिया अकौंट्सवर उद्धव ठाकरेंच्या नावाने अशी पोस्ट आली आहे का? याचा शोध घेतला. आम्हाला ‘लय भारी’ ने आपल्या फेसबुक पेजवर २६ जून २०२४ रोजी केलेली पोस्ट आढळली. यावर व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगून “कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका हीच विनंती..!” अशी कॅप्शन घातल्याचे दिसून आले.
“आमच्या फेसबुक पेजचा लोगो वापरून काही समाजकंटकांनी चुकीचे विधाने प्रसार माध्यमांमध्ये पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे सदर विधाने आमच्या पेजचे नसून याबद्दल आम्ही ऑनलाईन तक्रार केली असून, लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहोत. तरी कृपया अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका हीच विनंती..!” असे ‘लय भारी’ ने स्पष्ट केले आहे.
यावरून संबंधित व्हायरल पोस्टर इमेज ‘लय भारी’ चा लोगो वापरून बनविण्यात आले असल्याचे आणि या पोस्टशी संबंधित पेजचा कोणताच संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिक तपासासाठी आम्ही शिवसेना ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांच्याशी संपर्क साधला, “चुकीचे नरेटिव्ह सेट करण्यासाठी असा खोटारडेपणा केला जात असून हा प्रकार पूर्णपणे फेक आहे.” अशी माहिती त्यांनी आम्हाला दिली. “उद्धव ठाकरे यांनी असे कोणतेही विधान केले नाही आणि कुणीही तसे छापलेले नाही. काहीजण नसते समज निर्माण करण्यासाठी असे प्रकार करीत आहेत. हे सर्वांच्याच लक्षात आले आहे.” असे त्यांनी सांगितले.
अशाप्रकारे आमच्या तपासात उद्धव ठाकरे यांनी न बोललेली वाक्ये त्यांच्या तोंडी घालून आणि ‘लय भारी’ या फेसबुक पेजचा लोगो वापरून खोटा दावा करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google Search
Social Media accounts of Shivsena UBT
Facebook post by page Lay Bhari on June 26, 2024
Conversation with Shivsena UBT PRO Mr. Harshal Pradhan
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
April 12, 2025
Prasad S Prabhu
April 11, 2025
Komal Singh
January 16, 2025