Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact Checkविक्रम गोखले निधनाची अफवा मृत्यूच्या तीन दिवस आधीपासून

विक्रम गोखले निधनाची अफवा मृत्यूच्या तीन दिवस आधीपासून

प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची अफवा बुधवारी रात्री पासून जोरदार पसरली आहे. दीनानाथ मंगेशकर इस्पितळात गोखले यांचा मृत्यू झाल्याचे सांगून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून हजारो पोस्ट व्हायरल झाल्या.

निधनाच्या पोस्ट झळकल्या आणि अनेक माध्यमांनी त्याची बातमीही केली. विक्रम गोखले यांच्या चाहत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यास सुरुवात केली होती.

Fact Check/ Verification

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या वृत्ताने खरेतर त्यांचे चाहते आणि चित्रपट सृष्टीतील माणसांना दुःख होणे साहजिक आहे. दीनानाथ मंगेशकर इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाल्याच्या वृत्ताने हळहळ व्यक्त होत असताना त्यांची पत्नी आणि मुलीने निधनाच्या वृत्ताचा इन्कार केला आणि निधन झाले कि नाही हा संभ्रम निर्माण झाला. महाराष्ट्र टाइम्स ने याबद्दल गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेले वृत्त आपण पाहू शकता.

Screengrab of Maharasthra Times

यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अनेक बातम्या आपण इथे, इथे, इथे, आणि इथे पाहू शकता.

हे सारे सुरु असतानांच दीनानाथ मंगेशकर इस्पितळाने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन विक्रम गोखले यांचे निधन ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याबद्दल एक प्रसिद्धी पत्रकही जाहीर केले.

विक्रम गोखले निधनाची अफवाच, त्यांची प्रकृती सुधारत आहे
Press release of Dinanath Mangeshkar Hospital

विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरु आहेत. असेच गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी इस्पितळाने स्पष्ट केले.

यासंदर्भात मराठी दैनिक दिव्य मराठी ने प्रसिद्ध केलेले वृत्त आपण येथे पाहू शकता.

तरीही शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर पर्यंत निधनाच्या बातम्या आणि श्रद्धांजलीचे संदेश पसरतच होते.

यामुळे आम्ही दीनानाथ मंगेशकर इस्पितळाशी संपर्क साधला. इस्पितळाचे व्यवस्थापक शिरीष यादगीकर यांच्याशी बातचीत केली असता, अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावरील उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपले डोळे उघडले आहेत आणि त्यांचा रक्तदाब व हृदयाची क्रिया स्थिर आहे. दरम्यान अशीच सुधारणा जाणवल्यास येत्या ४८ तासात त्यांचे व्हेंटिलेटर काढले जाऊ शकते असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी शुक्रवार दि. २५ रोजी जारी केलेले प्रसिद्धी पत्रक आम्हाला उपलब्ध करून दिले.

Press release of Dinanath Mangeshkar Hospital

यावरून प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याच्या माहितीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.

Conclusion

अशापद्धतीने गुरुवारी रात्रीपासून प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल केला जाणारा दावा निव्वळ खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात उघड झाले आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आले आहे. आमचे आर्टिकल शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचे निधन झाले असून त्यापूर्वी तीन दिवस आधीपासून निधनाची अफवा पसरली होती.

Result: False

Our Sources

News published by Maharashtra Times on November 24, 2022

Press releases of Dinanath Mangeshkar Hospital

Telephonic conversation with Dinanath Mangeshkar Hospital

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular