Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckFact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील...

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे

Claim
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सख्ख्या आणि चुलत भावंडांना पंतप्रधानांच्या प्रभावामुळे मोठा आर्थिक लाभ झाला आहे.
Fact
आमच्या तपासात प्रत्यक्षात पंतप्रधानांच्या भावंडांना आर्थिक लाभ मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले असून हा दावा खोटा आणि काल्पनिक माहितीवर आधारित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा एक व्हायरल मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे. पंतप्रधानांच्या प्रभावामुळे त्यांच्या सख्ख्या आणि चुलत भावंडांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. त्यांना सन्मानाची पदे मिळाली आहेत. तसेच काहींच्या नावावर मोठे उत्पन्न मिळविणारे व्यवसाय आहेत. असे हा दावा सांगतो. “मोदी सरकार मध्ये हिम्मत असेल तर, यांच्यावर ED ची चौकशी लावणार का?” असा प्रश्नही युजर्स या दाव्याच्या माध्यमातून व्यक्त करीत आहेत.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Courtesy: Facebook/ श्रीकांत पवार

न्यूजचेकरला आमच्या checkthis@newschecker.in या ईमेल आयडीवर समान दावा पाठविण्यात आला असून या दाव्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये पीएम मोदींच्या कुटुंबियांबद्दल वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा मोठा भाऊ सोमाभाई मोदी (75) हे आता “गुजरातमधील नोकर भरती मंडळाचे अध्यक्ष” आहेत तर धाकटा भाऊ पंकज मोदी (58) हे “भरती मंडळाचे उपाध्यक्ष” आहेत असा आरोप आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, प्रल्हाद मोदी (६४) यांचे अहमदाबाद आणि वडोदरा येथे कार शोरूम आहेत. पंतप्रधानांच्या चुलत भाऊ आणि काकांच्या संपत्तीबाबतही अनेक दावे करण्यात आले आहेत. दाव्याचा संपूर्ण मजकूर येथे जोडला आहे.

“अत्यंत महत्वपूर्ण माहिती:- १. सोमाभाई मोदी (७५ वर्ष):- सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी – सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत. २. अमृतभाई मोदी (७२ वर्ष):- पूर्वी खाजगी फॅक्टरीत नोकरी करणारे आज अहमदाबाद व गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती आहेत. ३. प्रह्लाद मोदी (६४ वर्ष):- यांचे रेशन दुकान होते, सध्या अहमदाबाद, वडोदरा येथे Hyundai, Maruti आणि Honda चे फोर व्हीलर चे शो-रूम आहेत. ४. पंकज मोदी (५८ वर्ष):- पूर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी होते, आज रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमा भाई सोबत असतात. ५. भोगीलाल मोदी (६७ वर्ष):- किराणा दुकानाचे मालक होते, आज अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत. ६. अरविंद मोदी (६४ वर्ष):- हे भंगार व्यापारी होते , ते आज रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार आहेत. ७. भारत मोदी (५५ वर्ष):- पेट्रोल पंपावर काम करत होते. आज अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप त्यांचा आहे. ८. अशोक मोदी (५१ वर्ष):- यांचे पतंग आणि किराणा दुकान होते. आज तो रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार आहेत. ९. चंद्रकांत मोदी (४८ वर्ष):- एका गौशालेमध्ये कार्यरत होते. आज अहमदाबाद, गांधीनगर येथे त्यांची नऊ दुग्ध उत्पादन केंद्रे आहेत. १०. रमेश मोदी ( ५७ वर्षे):- शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज त्यांच्याकडे पाच शाळा, ३ अभियांत्रिकी महाविद्यालये, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत. ११. शिकवणी केंद्रात कार्यरत असलेले भार्गव मोदी (४४ वर्ष):- हे रमेश मोदी यांच्या संस्थांमध्ये भागीदार आहेत १२. बिपिन मोदी (४२ वर्ष):- अहमदाबाद लायब्ररीत काम करायचे. आज K.G ते बारावी पर्यंत शालेय पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कंपनीत भागीदार आहेत. १ ते ४ – पंतप्रधान मोदी यांचे भाऊ ५ ते ९ – मोदींचे चुलत भाऊ १० – जगजीवन दास मोदी, काकांचा मुलगा ११ – भार्गव कांतीलाल, १२ – बिपिन हे जयंतीलाल मोदी (पंतप्रधानांचे सर्वात छोटे काका) यांचे पुत्र आहेत ..सर्वांना विनंती आहे की हा मेसेज प्रत्येक भारतवासी पर्यंत पोहचला पाहिजे…भाजपा नेते व भाजपा आय.टी.सेल वाले आणि दलाल व भक्त मंडळी सतत टिमकी वाजवत असतात की म्हणे….मोदी आपल्या नातेवाईकां समोर गवत सुद्धा घालत नाहीत. परंतु हे सर्व गेल्या कांही वर्षांत कोट्याधीश आणि काही अब्जाधीश कसे काय झाले आहेत ??”

Fact check/ Verification

फेसबुकवर व्हायरल झालेल्या या पोस्टची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही आमचा तपास सुरू केला. सर्व प्रथम, आम्ही काही संबंधित कीवर्डद्वारे Google वर व्हायरल दावा शोधण्यास सुरुवात केली. शोध दरम्यान, आम्हाला आढळले की व्हायरल दावा २०१९ मध्ये देखील ट्विटरवर व्हायरल झाला होता.

आमच्या प्राथमिक संशोधनातून असे दिसून आले की २०१६ मध्ये, इंडिया टुडे मासिकाने PM मोदींच्या जवळच्या आणि विस्तारित कुटुंबावर एक वैशिष्ट्यपूर्ण स्टोरी प्रकाशित केली होती. इंडिया टुडेचे माजी उपसंपादक उदय माहूरकर यांनी ही स्टोरी लिहिली आहे. माहूरकर यांनी लिहिले की पंतप्रधानांचे कुटुंब एका विनम्र पार्श्वभूमीतून आले आहे जे पीएम मोदींच्या सत्तेत वाढ होऊनही मुख्यत्वे अपरिवर्तित राहिले आहे. लेखात पंतप्रधान मोदींनी त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय जीवन कसे दूर ठेवले आहे हे स्पष्ट केले आहे.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Screengrab of India Today

आणखी शोध घेतला असता, स्वतः या स्टोरीचे लेखक उदय माहूरकर यांनी व्हायरल दावा कसा खोटा आहे याबद्दल ट्विट केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

पुढील तपासात आम्हाला २०१७ मध्ये मोदिनामा या फेसबुक पेज ने मोदींच्या भावांचा उल्लेख करून अशाप्रकारे आरोप केल्याचे निदर्शनास आले.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Courtesy: Facebook/ ModiNama

यामधील मजकूर मूळ इंग्रजी भाषेतील आहे. व्हायरल मराठी संदेश हा याचाच अनुवाद असल्याचे आमच्या लक्षात आले. विशेषतः २०१६ मध्ये प्रकाशित स्टोरी, २०१७ ची मोदिनामा ची पोस्ट आणि सध्या मराठीत व्हायरल होत असलेला संदेश यामध्ये व्यक्तींची नावे, त्यांची वये आणि त्यांच्या पूर्वीच्या कामा संदर्भातील उल्लेख सामान आहेत. महत्वाचे म्हणजे मोदींच्या भावंडांची वये २०१६ मध्ये जितकी आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे, तितक्याच वयाचा उल्लेख आजही व्हायरल दाव्यामध्ये केला जात असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

यामुळे व्हायरल दाव्यातील प्रत्येक पोट दावा स्वतंत्र्यरित्या तपासण्याचा प्रयत्न आम्ही केला.

दावा १. सोमाभाई मोदी हे गुजरातमधील नोकर भरती मंडळाचे अध्यक्ष आहेत

सोमाभाई मोदी हे पंतप्रधान मोदींचे मोठे भाऊ आहेत. ते “गुजरातमधील नोकर भरती मंडळाचे अध्यक्ष” असल्याच्या दाव्याकडे एक नजर टाकल्यास ते खरे असू शकत नाही असे सूचित करते. संदेशात कोणते हे न सांगता फक्त “भरती मंडळ” असे म्हटले आहे. कोणत्याही राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र भरती मंडळे असतील. सर्वांसाठी एकच मंडळ असू शकत नाही. गुजरात सरकारच्या वेबसाइटवर शोध घेतला असता मुख्य भरती मंडळे रेल्वे, पोलिस (लोकरक्षक) आणि शिक्षण विभागांमध्ये आहेत. असे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Screengrab of Google Search

आम्ही संबंधित मंडळांच्या वेबसाईटवर जाऊन सोमाभाई मोदी हे चेअरमन पदावर कार्यरत आहेत का? याचा शोध घेतला मात्र आम्हाला कोणतीच माहिती मिळाली नाही. सोमाभाई मोदी यांची नियुक्ती एकाद्या मंडळावर झाल्याची माहिती देणारा कोणताही मीडिया रिपोर्टही आम्हाला पाहायला मिळाला नाही. जर त्यांची नियुक्ती एकाद्या मंडळावर झाली असती तर किमान त्याबद्दल अधिकृतरीत्या बातमी तरी प्रसिद्ध झाली असती. मात्र तसे कोठेही आढळून आले नाही.

दावा २. अमृतभाई मोदी हे अहमदाबाद आणि गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत.

अमृतभाई मोदी हे पंतप्रधान मोदींचे मोठे भाऊ आहेत. रिअल इस्टेट वेबसाइट PropertyTiger नुसार, अहमदाबाद आणि गांधीनगरमधील सर्वात मोठे एकूण गृहनिर्माण प्रकल्प अनुक्रमे गोदरेज प्रॉपर्टीज (१२८ प्रकल्प) आणि शोभा लिमिटेड (१५४ प्रकल्प) यांच्या नेतृत्वाखाली आहेत. दरम्यान कोणत्याही रियल इस्टेट व्यवसायाशी त्यांचा संबंध असल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Screengrab of Property Tiger

न्यूजचेकर ने यापूर्वी केलेल्या आर्टिकल नुसार अमृतभाई मोदी २००५ पर्यंत एका खाजगी कंपनीत १०००० रुपये पगारावर काम करत असल्याचे तपासात आढळून आले. तर आता ते आपल्या मुलासोबत अहमदाबादमध्ये राहतात. परंतु कोणत्याही रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित नाहीत.

दावा ३. प्रल्हादभाई मोदी यांचे अहमदाबाद आणि वडोदरा येथे ह्युंदाई, मारुती आणि होंडाचे शोरूम आहेत

प्रल्हाद मोदी तीन वर्षांपासून रस्त्यावर खाद्यपदार्थांचा स्टॉल लावायचे. पण आता अहमदाबाद आणि वडोदरा येथे त्यांच्या ह्युंदाई, मारुती आणि होंडा चारचाकी शोरूम आहेत. असा दावा करण्यात आला.

आमच्या तपासात आम्हाला आढळले की प्रल्हाद मोदी हे स्वस्त धान्य दुकान चालवत आहेत आणि ते गुजरात राज्य स्वस्त धान्य दुकान मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत. The Tribune ने ९ मे २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी आम्हाला सापडली. यामध्ये प्रल्हादभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वस्त धान्य दुकान चालकांनी केलेल्या आंदोलनाची माहिती मिळते.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Screengrab of The Tribune

दावा ४. पंकजभाई मोदी हे सोमाभाई यांच्यासोबत नोकर भरती मंडळात उपाध्यक्ष आहेत.

पंकज मोदी तीन वर्षांपूर्वी माहिती विभागात होते पण आज सोमाभाई यांच्यासोबत भरती मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. असे व्हायरल दाव्यात म्हटलेले आहे. दरम्यान सोमाभाई हेच नोकर भरती मंडळात नाहीत हे सिद्ध झालेले असून पंकज मोदी हे सुद्धा या मंडळात असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

दरम्यान ते माहिती खात्यात सेवा बजावीत होते ही बाब खरी असल्याची माहिती आम्हाला India.com ने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत मिळाली.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Screengrab of India.com

दावा ५. भोगीलालभाई मोदी हे अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत.

भोगीलाल मोदी यांची ३ वर्षांपासून किराणा दुकाने होती आणि आज ते अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत. असा दावा करण्यात आला.

आमच्या तपासात आम्हाला आढळले की, भोगीलाल मोदी हे पंतप्रधान मोदींचे चुलत भाऊ आहेत. बिझनेस टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स अशी कोणतीही फ्रेंचायझी कुणालाही देत नाही. यामुळे भोगिलाल हे रिलायन्स मॉल चे मालक होऊच शकत नाहीत.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Screengrab of Business Today

दावा ६. अरविंदभाई मोदी हे स्टील ते रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांचे कंत्राटदार आहेत.

अरविंद मोदी तीन वर्षे भंगार व्यापारी होते पण आता ते रिअल इस्टेट आणि मोठ्या इमारती बांधकाम कंपन्यांचे स्टील कंत्राटदार आहेत. असा उल्लेखही व्हायरल दाव्यात आहे.

आमच्या तपासात आम्हाला आढळून आले की अरविंद मोदी सध्या वडनगर येथे राहत असून ते भंगाराचे व्यापारी आहेत. ते जवळपासच्या गावातुन भंगार विकत घेतात आणि मोठ्या केंद्रांवर विकतात.

दावा ७. भरतभाई मोदी हे अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप चे मालक आहेत.

आमच्या तपासात आम्हाला आढळून आले की, भरत मोदी वडनगर येथे राहतात. ६००० रुपये पगारावर पालनपूर येथील पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांची पत्नी रमिलाबेन गावात किराणा माल विकतात.

तरीही आम्ही तपासासाठी अहमदाबाद येथे गुगल मॅप च्या साहाय्याने अगियारस पेट्रोल पंप आहे का याचा शोध घेतला. मात्र आम्हाला या नावाचा एकही पेट्रोल पंप आढळला नाही.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
Screengrab of Google Map

महत्वाचे म्हणजे आमच्या तपासात आम्हाला अगियारस या नावाचे माता मंदिर मात्र आढळले आहे.

दावा ८. अशोकभाई मोदी हे रिलायन्स मॉल मध्ये भोगीलालभाईंचे भागीदार आहेत.

आम्ही दावा क्र. ५ ची पडताळणी करताना आधीच सिद्ध केले आहे की रिलायन्सचे फ्रेंचायझी मॉडेल नाही, यामुळे पीएम मोदींचे चुलत भाऊ अशोकभाई मोदी हे भोगीलाल मोदींसोबत रिलायन्स मॉलमध्ये व्यवस्थापकीय भागीदार असण्याच्या दाव्याला काहीच अर्थ उरत नाही.

व्हायरल दाव्यामध्ये असे आणखी काही आरोप करण्यात आले आहेत जे काल्पनिक माहितीवर आधारित असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Conclusion

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या दाव्याचा बारकाईने अभ्यास केल्यावर आम्हाला असे आढळून आले की नरेंद्र मोदींच्या बंधूंच्या व्यवसायाबाबत केला जात असलेला दावा पूर्णपणे खोटा, काल्पनिक आणि दिशाभूल करणारा आहे.

Result: False

Our Sources

Self Analysis of Various Websites of Gujrat recruitment boards.

Property Tiger Website

News published by The Tribune on May 9, 2017

News published by India.com on January 23, 2020

News published by Business Today Suptember 11, 2020

Google Map


(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम नेहा वर्मा यांनी केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in


1 COMMENT

Most Popular