Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
पक्ष आणि चिन्ह भविष्यात जाणार असे फडणवीस यांनी सांगितल्याचे उदय सामंत म्हणाले.
Fact
हा दावा खोटा आहे. लोकसत्ताचे न्यूजकार्ड एडिट करून हा बनावट दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी अखेर महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. अजितदादा पवार आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. दरम्यान शिंदे या खांदेबदलावरून नाराज असल्याच्या अनेक बातम्या आठवडाभर रंगत होत्या. शपथविधी झाला तरी यासंदर्भातील अनेक पोस्ट फिरत असून यातच ‘लोकसत्ता’ चा लोगो वापरत उदय सामंत यांच्या नावे व्हायरल न्यूजकार्ड चर्चेत आले आहे.
“मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन व संघटन वाढवेन असे एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. पण देवेंद्रजी म्हणाले की भविष्यात तुमचा पक्ष व चिन्ह जाणार आहे. मग काय डोमल्याचे संघटन वाढवणार काय? मग त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार झाले” असे उदय सामंत यांनी म्हटल्याचे हा दावा सांगतो.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
आमच्या तपासात हा दावा एडिटेड न्यूजकार्डच्या माध्यमातून करण्यात आला असून बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
आम्ही सर्वप्रथम व्हायरल न्यूजकार्ड काळजीपूर्वक वाचले. आम्हाला त्यामध्ये व्याकरणाच्या चुका आढळल्या. न्यूजकार्डमध्ये “काय डोमल्याचे संघटन वाढवणार काय?” असा उल्लेख आढळला. मुळात ‘काय डोंबलाचे’ ऐवजी ‘डोमल्याचे’ असा उल्लेख आल्याने आम्हाला संशय आला.
तरीही आम्ही काही कीवर्डसच्या माध्यमातून शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदावरून असे कोणते विधान केले आहे का? याचा शोध घेतला. आम्हाला ‘लोकसत्ता’ ने आपल्या अधिकृत X खात्यावरून ४ डिसेंबर २०२४ रोजी केलेले एक ट्विट सापडले.
संबंधित पोस्टमध्ये उदय सामंत यांच्या हवाल्याने पुढील मजकूर देण्यात आला असल्याचे आम्हाला दिसले. “मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन आणि संघटना वाढवेन असं एकनाथ शिदे आम्हाला म्हणाले होते. मात्र आम्हा सगळ्या आमदारांची इच्छा आहे की त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनात जावं अशी आमची इच्छा आहे.”
दरम्यान व्हायरल न्यूजकार्ड आणि ओरिजिनल न्यूजकार्डमध्ये आम्हाला मजकूर वगळता उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि इतर गोष्टी समान आढळल्या. यासंदर्भातील तुलनात्मक परीक्षण खाली पाहता येईल.
यासंदर्भात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार उदय सामंत यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? हे शोधताना आम्हाला त्यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी केलेले ट्विट सापडले.
“दैनिक “लोकसत्ता” चा लोगो वापरून प्रसारित करण्यात आलेल्या एका बातमी संदर्भात मी आज माझ्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून पोस्ट केली होती. या पोस्ट शी “लोकसत्ता” चा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, ही बातमी फेक असून कोणीतरी लोकसत्ताचा लोगो वापरून खोटी केली आहे हे कळल्यावर मी केलेले ट्वीट डिलीट केले आहे..ह्या मध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता..आणि वृत्तपत्राचा अवमान करण्याचा मानस देखील नव्हता.” असे त्यांनी स्पष्ट केल्याचे आम्हाला दिसून आले.
यासंदर्भात लोकसत्तानेही बातमी प्रसिद्ध करून संबंधित एडिटेड न्यूजकार्डचे खंडन केले असून यासंदर्भात लोकसत्ताची भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित बातमी येथे वाचता येईल.
अशाप्रकारे आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, उदय सामंत यांच्या नावे लोकसत्ताचा लोगो वापरून बनविण्यात आलेले न्यूजकार्ड बनावट आहे. एडिटेड तंत्राचा वापर करून ओरिजनल कार्डमध्ये फेरफार करण्यात आला आहे.
Our Sources
Self Analysis
Google Search
Tweet made by Lokmat Live on December 4, 2024
Tweet made by Uday Samant on December 5, 2024
News published by Losatta on December 5, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
March 8, 2025
Prasad S Prabhu
March 6, 2025
Prasad S Prabhu
December 7, 2024