Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: सर्पदंशावरील रामबाण उपाय सांगणारा मेसेज आलाय? जाणून घ्या सत्य काय...

Fact Check: सर्पदंशावरील रामबाण उपाय सांगणारा मेसेज आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
नाजा २०० हे औषध सर्पदंशावरील रामबाण उपाय असून तीन तासात रुग्णाचा जीव वाचविता येतो.
Fact

हा दावा चुकीचा आहे. संबंधित माहिती चुकीची असल्याचे माहिती पसरविणाऱ्यानेच स्पष्ट केले आहे.

सर्पदंशावरील रामबाण उपाय असे सांगत एक भलामोठा टेक्स्ट मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रामुख्याने व्हाट्सअपवरून हा मेसेज मोठ्याप्रमाणात प्रसारित केला जात आहे. हा उपाय केला की सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव तीन तासात वाचविता येतो, असा दावा केला जात आहे.

WhatsApp Viral Message

“पावसाळ्यात साप बाहेर येतात ते त्यांच्या बिळात पाणी भरल्याने. साप चावल्यावरचा रामबाण उपाय, तुम्हाला माहिती असेल की साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विष मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विष रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विष आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं. हे विष पूर्ण शरिरात पोहचण्या साठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते. म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगां मध्ये विष पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो. त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्या साठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे. तुम्ही काय करू शकता ? एक (मेडिसीन) औषध तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता. हे औषध होमिओपॅथी असून स्वस्त आहे, त्याचं नाव आहे NAJA २०० हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे. NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विष आहे. त्या सापाचं नाव आहे क्रॅक. या सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष उतरवण्या साठी कामात येतं. या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे. बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. मित्रांनो आपल्या गावाकडील मंडळींना नक्की शेअर करा. डॉ .शामराव केळसकर (Acupressure तज्ञ) कोल्हापूर/सरवडे ९१५८७४९४९४, ७४४७३०२२८४” असे हा दावा सांगतो.

पावसाळा सुरु झाला. शेताची कामेही सुरु झाली आहेत. अनेकदा शेतात काम करीत असताना शेतकरीही वर्गाला सर्पदंशाचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. अशावेळी प्रसारित होत असलेला हा मेसेज अनेकजण पुढे पाठवीत आहेत. दरम्यान सर्पदंश झाल्यास इस्पितळात जाऊन उपचार घेणे आवश्यक असताना केवळ औषधाचे तीन थेंब प्राशन केल्यास रुग्णाचा जीव वाचविता येतो. असे सांगणारा हा मेसेज कितपत खरा आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) हा दावा प्राप्त झाला असून तथ्य तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

सर्पदंश ही मानवी जीवनातील भीतीदायक आणि तितकीच जीवघेणी घटना आहे. अशा प्रसंगात योग्य उपचार मिळाले तर जीव वाचतो, अन्यथा अनेकदा जीव गमावला जाण्याचे प्रसंगही घडलेले आहेत. दरम्यान ठराविक औषध मदतीचे ठरत असेल तर चांगलेच आहे, मात्र त्यातून जीव धोक्यात येत असल्यास चुकीचे ठरू शकते. या औषधाबद्दल शंका निर्माण झाल्याने आम्ही या दाव्याची तथ्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्यातील मजकूर आम्ही काळजीपूर्वक वाचला. दरम्यान याबद्दल इंटरनेटवर कोणती माहिती उपलब्ध आहे का? हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला या रामबाण औषधाबद्दल अधिकृत माध्यमात किंवा शोध प्रबंधात कोणताच लेख प्रसिद्ध झालेला नसल्याचे आढळले.

यामुळे X वर आणि Facebook वर अशाप्रकारे दावा करण्यात आला आहे का? याचा शोध घेतला. आम्हाला X वर अनेक युजर्सनी २०१६ ते २०१८ याकाळात हा दावा केला असल्याचे पाहावयास मिळाले. तर फेसबुकवरही मिळालेल्या ८ ऑगस्ट २०१६ मधील एका पोस्टमध्ये हा दावा करण्यात आला असल्याचे पाहावयास मिळाले. यावरून हा दावा मागील आठ वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असून अलीकडे करण्यात आलेला नवा दावा नसल्याची माहिती मिळाली.

Courtesy: Facebook/Mahesh Joshi

व्हायरल दाव्यामध्ये नाजा २०० या होमिओपथिक औषधाचा उल्लेख केला आहे. हा दावा करणाऱ्या व्यक्तीचे नाव दाव्याच्या शेवटी लिहिण्यात आले असल्याचे आणि संबंधित व्यक्तीचे संपर्क क्रमांकही देण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीचे नाव डॉ .शामराव केळसकर असल्याचे आणि त्या नावासमोर ते सरवडे, कोल्हापूर येथील Acupressure तज्ञ असल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही संबंधित क्रमांकांवरून त्यांच्याशी संपर्क साधला.

दरम्यान आम्हाला डॉ .शामराव केळसकर यांनी, “आपण स्वतः १२ वर्षांपूर्वी हा संदेश तयार केला होता आणि व्हाट्सअपवरून फॉरवर्ड केला होता.” अशी माहिती दिली. “आपण Acupressure तज्ञ आहे. आपल्याला नाजा २०० या औषधाबद्दल माहिती आहे. यामुळे आपण हा मेसेज तयार केला होता. एकाद्या व्यक्तीस सर्पदंश झाला तर त्याच्या रक्ताभिसरणावर आणि रक्तदाबावर विपरीत परिणाम होतात. दरम्यान त्यातून समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून हे औषध वापरल्यास रुग्णाला मदत होऊ शकते. असे मला यातून सांगायचे होते. मात्र हा नेमका उल्लेख मेसेजमध्ये आपण न केल्याने अनेकांचा चुकीचा समज होऊ लागला. म्हणून आपण आणखी एक मेसेज तयार करून तो फॉरवर्ड केला होता आणि संबंधित औषधाने सर्पदंश झालेल्या रुग्णाला कशी मदत होते हे सांगितले होते, मात्र पहिला मेसेज अजून व्हायरल होत आहे.” असे त्यांनी सांगितले.

“नाजा २०० हे औषध सर्पदंशावरील रामबाण उपाय असून तीन तासात रुग्णाचा जीव वाचविता येतो. हा दावा चुकीचा असून त्यामुळे निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. न्यूजचेकरच्या माध्यमातूनही आपल्याला हेच नागरिकांना सांगायचे आहे.” असे त्यांनी आम्हाला सांगतले.

होमिओपॅथिक तज्ञ डॉ. सोनाली सरनोबत यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता, “नाजा २०० हे औषध आहे. आणि सर्पदंशावरील प्राथमिक उपचारात त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.” अशी माहिती दिली.

आणखी एक होमिओपॅथिक तज्ञ डॉ. आदिती अनिल पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला. ” संबंधित औषधाने सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव वाचविता येतो, हा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात हे औषध हृदय आणि रक्तदाबाच्या विकारावर वापरले जाते.” अशी माहिती त्यांनी दिली.

आम्ही नाजा २०० या औषधाचा नेमका उपयोग काय? हे शोधण्याचा प्रयत्न केला. My Upchar या औषधासंबंधी वेबसाईटवर हे औषध कोणत्या आजारांसाठी वापरले जाते याची माहिती मिळाली.

Screengrab of myupchar.com

सुज, डोकेदुखी, उलटी, अस्थमा, कोरडा खोकला, कानाची दुखणी, अस्थमा आणि हृदयरोगावर हे औषध वापरले जाते. अशी माहिती आम्हाला यातून मिळाली.

यावरून संबंधित औषध हे सर्पदंशावरील रामबाण उपचार असल्याचे सांगणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात, नाजा २०० हे औषध सर्पदंशावरील रामबाण उपाय असून तीन तासात रुग्णाचा जीव वाचविता येतो हा दावा खोटा आहे. या औषधाचा प्राथमिक औषध म्हणून वापर केला जाऊ शकतो. मात्र सर्पदंश झाल्यास संबंधित रुग्णास योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या इस्पितळात दाखल करून त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

Result: False

Our Sources
Facebook post by user on August 8, 2016
Conversation with Dr. Shamrao Kelaskar
Conversation with Dr. Sonali Sarnobat
Conversation with Dr. Aditi Anil Patil
Information published by My upchar Website


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular