Authors
Claim
मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Fact
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा चुकीचा संदर्भ लावून हा दिशाभूल करणारा दावा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता चांगलाच रंग चढत आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या दाव्यांमधून राजकीय प्रतिमा मलीन करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा असाच दावा करण्यात आला आहे. मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे हा दावा सांगतो.
आम्हाला हा दावा X वर सापडला.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
फेसबुकवरही युजर्सनी समान दावे केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
“हिंदू मतदारांनो मी गोमांस खातो, बीफ खातो ….काय माझं वाकडं करायचं ते करा” असे उद्धव ठाकरे व्हायरल दाव्यातील व्हिडिओमध्ये बोलताना आढळतात. दरम्यान “पहा हिंदूनो तुमची काय किंमत आहे ह्यांच्या लेखी, ह्यांना कायमचं घरी बसवा.” किंवा “मुस्लिम मतांसाठी आणखी काय काय बोलणार” अशा कॅप्शनखाली हे दावे शेयर केले जात आहेत.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्याच्या तपासासाठी आम्ही सर्वप्रथम Google वर संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे विधान केले आहे का? आणि यासंदर्भात कुठे बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का? याची माहिती आम्ही शोधली. मात्र संबंधित दाव्यांव्यतिरिक्त आम्हाला कोणतीच माहिती मिळाली नाही. इतके मोठ्ठे विधान केले असते तर त्याची नक्कीच बातमी झाली असती.
पुढील तपासासाठी आम्ही व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. सदर व्हिडीओ एकाद्या टीव्ही चॅनेलवरील उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील कापलेला भाग असल्याचे आमच्या निदर्शनास आले. कारण भाषण सुरु असताना खाली हिंदीमध्ये ‘दशहरा रैली LIVE’ असे लिहिलेले आढळले. यावरून सुगावा घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे फुटेज उपलब्ध आहे का? याबद्दल शोध घेतला.
आम्हाला ‘लोकसत्ता’ ने १२ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे LIVE प्रक्षेपण आपल्या युट्युब चॅनेलवरून केले असल्याचे निदर्शनास आले. व्हायरल व्हिडीओ आणि संबंधित प्रक्षेपण यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या अंगावरील पेहराव समान असल्याचे आढळल्यामुळे आम्ही त्यामधील उद्धव ठाकरे यांचे भाषण पूर्ण ऐकले.
दसरा मेळाव्याचे LIVE प्रक्षेपण पाहिल्यानंतर आम्हाला उद्धव ठाकरेंनी १ तास १५ मिनिटे ३५ सेकंदानंतर गाईला राजमाता मानण्याच्या निर्णयाबद्दल टीका करतात. १ तास १५ मिनिटे ५५ सेकंदानंतर अचानक उपटणाऱ्या गोरक्षकांचा ते समाचार घेतात. गोमांस तस्करीच्या संशयावरून २२-२३ वर्षांच्या कोवळ्या मुलाचा पाठलाग करून खून करण्यात आला आणि पुढे तो हिंदू निघाला. तोच जर मुस्लिम असता तर आगडोंब उसळला असता असे ते म्हणतात. त्यानंतर १ तास १७ मिनिटे ०७ सेकंदांवर ते म्हणतात की, “जर गोमांसाची तस्करी केली म्हणून तुम्ही आर्यन मिश्राला मारला असाल, तर मग किरण रिजिजू जे बोलले स्वतः की मी गोमांस खातो, बीफ खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा. काय केलं? त्यांना काय तुम्ही करत नाही? गोळ्या घाला असं माझं म्हणणं नाही.” हे स्पष्टपणे ऐकू येते.
यावरून उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील “तर मग किरण रिजिजू जे बोलले” आणि “काय केलं? त्यांना काय तुम्ही करत नाही? गोळ्या घाला असं माझं म्हणणं नाही.” ही विधाने कापून “मी गोमांस खातो, बीफ खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा.” इतकाच भाग जाणीवपूर्वक शेयर करण्यात आला असल्याचे स्पष्ट होते.
Live Hindustan च्या युट्युब चॅनेलवर १ तास ५६ मिनिटे ५३ सेकंदांवर, Money Control च्या युट्युब चॅनेलवर १ तास २६ मिनिटे १५ सेकंदांवर आणि Zee २४ तास च्या युट्युब चॅनेलवर २ तास २६ मिनिटे ५५ मिनिटांवर उद्धव ठाकरेंच्या भाषणातील किरण रिजिजू यांच्या नावाचा उल्लेख करून बोललेला भाग आपल्याला पाहता येईल.
Conclusion
मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले, असे सांगणारा दावा दिशाभूल करणारा आहे. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा चुकीचा संदर्भ लावून हा दिशाभूल करणारा दावा करण्यात येत आहे.
Result: Missing Context
Our Sources
Google Search
Video published by Loksatta on October 12, 2024
Video published by Live Hindustan on October 12, 2024
Video published by Zee 24 Taas on October 12, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा