Fact Check
छावा चित्रपटावर बंदीची मागणी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले? येथे जाणून घ्या सत्य
Claim
छावा चित्रपटावर बंदीची मागणी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले.
Fact
हा दावा खोटा आहे. ११ वर्षांपूर्वी औरंगजेब चित्रपटाच्या नावावरून झालेल्या आंदोलनाचा हा फोटो आहे.
छावा चित्रपटावर बंदीची मागणी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले, असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. आमच्या तपासात आढळले की व्हायरल फोटो ११ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाचा आहे.




“छावा चित्रपट बंदी घाला आणि औरंगजेब संत होता असे सांगत उपोषण करणाऱ्या एनसीपी चा निषेध” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check/Verification
व्हायरल दाव्यात म्हटल्याप्रमाणे आम्ही छावा चित्रपटावर बंदी घालण्यासाठी कोठे आंदोलन झाले आहे का? हे पाहण्यासाठी Google वर शोधले. मात्र आम्हाला अशी माहिती देणारी पोस्ट मिळाली नाही. अशाप्रकारचे आंदोलन झाले असते तर नक्कीच त्याबद्दल बातमी झाली असती.

दरम्यान आम्ही व्हायरल दाव्यातील फोटो काळजीपूर्वक पाहिला. त्यावर आम्हाला आंदोलकांच्या मागे लावलेल्या फलकामध्ये सदर आंदोलन ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग शहर जिल्हा औरंगाबाद’ यांच्यातर्फे हे आंदोलन झाल्याचे लिहिलेले आहे. आंदोलनाचा विषयही फलकावर लिहिलेला आहे. “औरंगजेब नावाचे चित्रपटाचे नावात बदल करावे, वादग्रस्त वाक्य काढून टाकावे” असा या आंदोलनाचा विषय असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान अधिक तपास करण्यासाठी आम्ही संबंधित व्हायरल चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला @RMantri या व्हेरिफाइड X युजरने ८ मे २०१३ रोजी केलेली एक पोस्ट आढळली. पोस्टमध्ये व्हायरल फोटो सारखाच फोटो असून पोस्टच्या कॅप्शनमध्ये “हे एक नवीन आहे – राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा औरंगजेब चित्रपटाविरुद्ध निषेध, तो एक सुफी संत होता असे म्हणतात.” असे लिहिले आहे. यावरून आंदोलनाच्या उद्देशाबद्दल आणि ते झालेल्या काळाबद्दल आम्हाला खात्री झाली.

तसेच आम्हाला bharatuntoldstory या वेबसाईटने प्रसिद्ध केलेले २४ जुलै २०१३ चे सदर फोटो आणि त्याबद्दलची माहिती देणारे आर्टिकल मिळाले.

महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे काहींनी बॉलिवूडचा चित्रपट औरंगजेबच्या शीर्षकावरून आंदोलन केल्याचे संबंधित आर्टिकलने म्हटले आहे. यावरून व्हायरल फोटो सध्याचा नसून २०१३ मधील असल्याचे स्पष्ट होते.
Conclusion
यावरून छावा चित्रपटावर बंदी घाला अशी मागणी करीत आंदोलन झाल्याचे सांगत २०१३ मध्ये झालेल्या औरंगजेब चित्रपटाच्या शीर्षकाविरोधात झालेल्या आंदोलनाचा फोटो शेयर केला जात असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
Our Sources
Google Search
Self Analysis
X post by user Rajeev Mantri on May 8, 2013
News Article published by bharatuntoldstory on July 24, 2013