सोशल मीडियावर एका काफिल्याला उडवल्याचा व्हिडिओ शेअर केला जात आहे आणि तो बलुच लिबरेशन आर्मी (BLA) बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या हल्ल्याचे दृश्य असल्याचा दावा केला जात आहे.
तथापि, आमच्या तपासात आम्हाला आढळले की हा व्हिडिओ मार्च २०२४ मध्ये येमेनच्या हुथी बंडखोरांनी केलेल्या लष्करी प्रात्यक्षिकाचा आहे, ज्यामध्ये त्यांनी इस्रायल, ब्रिटन आणि अमेरिकेवर हल्ला करण्याचा सराव केला होता.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात, गेल्या काही वर्षांपासून बलुच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्यावर हल्ले तीव्र केले आहेत. या बंडखोरांमध्ये एक प्रमुख नाव म्हणजे बलुच लिबरेशन आर्मी (BLA). मार्चमध्ये, या गटाने क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनलाही ओलीस ठेवले होते. हा गट बलुचिस्तानला परकीय प्रभावापासून, विशेषतः चीन आणि पाकिस्तानपासून वाचवू इच्छितो.
व्हायरल व्हिडिओ २८ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये एका काफिल्यावर हल्ला होताना दिसत आहे. या दरम्यान, स्फोटामुळे काफिल्यातील वाहनांचे तुकडे झाले आहेत. व्हिडिओमध्ये संपूर्ण हल्ला वेगवेगळ्या अँगलमधून दाखवण्यात आला आहे.
हा व्हिडिओ X वर व्हायरल दाव्यासह शेअर करण्यात आला आहे की, “बलूच लिबरेशन आर्मी आपली लढाई खंबीरपणे लढत आहे. पाकिस्तानी सैन्याला दररोज सँडविच बनवत आहे”.

याशिवाय, हा व्हिडिओ फेसबुकवरही अशाच कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे.

Fact Check/Verification
बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स वापरून रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, आम्हाला हा व्हिडिओ १६ मार्च २०२४ रोजी एका एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. तथापि, व्हिडिओमध्ये Al Araby Television Network Limited या टीव्ही चॅनेलचा लोगो आणि त्यावर १० मार्च २०२४ ही तारीख लिहिलेली होती.

वर दिलेल्या माहितीच्या आधारे, आम्ही Al Araby Television Network Limited च्या यूट्यूब चॅनेलवर शोध घेतला आणि आम्हाला १० मार्च २०२४ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला. हा व्हायरल व्हिडिओचा मोठा व्हर्जन होता. सुमारे ४ मिनिटे २३ सेकंद लांबीच्या या व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओमधील दृश्ये ३ मिनिटांनंतर पाहता येतात.

व्हिडिओचे कॅप्शन अरबी भाषेत लिहिले होते, ज्याचे मराठी भाषांतर असे होते “पहा: हुथी गटाने इस्रायली स्थळांवर हल्ला करण्यासाठी आणि अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याला लक्ष्य करण्यासाठी लष्करी सराव केले”.
शोध घेतल्यावर, आम्हाला १० मार्च २०२४ रोजी येमेनच्या हुथी बंडखोरांशी संबंधित वेबसाइटवर अपलोड केलेला एक व्हिडिओ देखील सापडला, जो सुमारे ४२ मिनिटांचा होता. या ४२ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, व्हायरल व्हिडिओमधील सर्व दृश्ये ३२ मिनिटांपासून उपस्थित होती.

या व्हिडिओसोबतच्या वर्णनात असेही म्हटले आहे की हुथी बंडखोरांचे वेगवेगळे गट इस्रायली स्थळांवर हल्ला करण्याचा सराव करत होते तसेच इस्रायलला मदत करणाऱ्या अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्यांना लक्ष्य करत होते. यामध्ये हुथी बंडखोरांचे अनेक वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.

याशिवाय, आम्हाला १० मार्च २०२४ रोजी हुथी बंडखोरांशी जोडलेल्या एका प्रमुख टेलिग्राम अकाउंटवरून अपलोड केलेला एक व्हिडिओ आढळला, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमधील सर्व दृश्ये होती. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देखील वर नमूद केल्याप्रमाणे माहिती होती.

Conclusion
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की बीएलए पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करत असल्याचा दावा करणारा व्हायरल झालेला व्हिडिओ प्रत्यक्षात येमेनच्या हुथी बंडखोरांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने केलेला लष्करी सराव आहे.
Our Sources
Video posted by an X account on 16th March 2024
Video Posted by Al Araby Television Network Limited YT account on 10th March 2024
Video Posted by MMY.YE on 10th March 2024
Video Posted by MMY Telegram account on 10th March 2024
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून येथे वाचता येईल.)