Fact Check
ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानात आनंदोत्सव असे सांगणाऱ्या साम टीव्ही व झी २४ तासच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या
Claim
ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानात आनंदोत्सव.
Fact
हा दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडीओ २०२४ पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
ऑपेरेशन सिंदूर च्या पाकिस्तानवरील कारवाईनंतर इंटरनेटवर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सामान्य युजर्सबरोबर बातम्या देणारी माध्यमेही अनेक दावे करण्यात आघाडीवर आहेत. दरम्यान साम टीव्ही व झी २४ तास या महाराष्ट्रातील आघाडीच्या माध्यमांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. याद्वारे ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानात आनंदोत्सव असा दावा करण्यात आला आहे.


दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
झी २४ तासने “ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानमध्ये आनंद” आणि साम टीव्हीने “भारताचं पाकिस्तानात Operation Sindoor; बलुचिस्तानमध्ये आनंद साजरा” अशापद्धतीने कॅप्शन दिल्या आहेत. दोन्ही माध्यमांनी वापरलेला व्हिडीओ समान आहे.
Fact Check/Verification
व्हायरल दाव्याच्या तपासासाठी आम्ही संबंधित किवर्डसच्या माध्यमातून Google वर शोध घेतला. मात्र संबंधित माध्यमांनी दिलेल्या बातम्यांपलीकडे आम्हाला इतर कोणत्याही माध्यमाने यासंदर्भात बातमी दिली असल्याचे दिसून आले नाही. आम्ही हिंदी आणि इंग्रजी कीवर्डसच्या माध्यमातून याबद्दल कोणत्या हिंदी किंवा इंग्रजी माध्यमाने अशा बातम्या दिल्या आहेत का? हे शोधले. मात्र आम्हाला तसे परिणाम मिळाले नाहीत.

यामुळे आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला संबंधित व्हिडीओ A K Studio नामक फेसबुक खात्याने १५ एप्रिल २०२४ रोजी पोस्ट केला असल्याचे आणि सदर नृत्य हे ‘Balochi lewa balochi dance’ म्हणजेच बलुचिस्तान येथील नागरिकांचा लेवा हा पारंपारिक नृत्यप्रकार असल्याचे लिहिलेले असल्याचे आढळले.

A K Studio हे फेसबुक पेज सांस्कृतिक संदर्भाच्या पोस्ट प्रसारित करण्याचे काम करीत असल्याचे आम्हाला बायो मध्ये वाचायला मिळाले.
व्हायरल दाव्यामध्ये याच व्हिडिओचा भाग वापरून ऑपरेशन सिंदूर नंतर अशाप्रकारे आनंदोत्सव साजरा करण्यात आला असा दावा करण्यात आल्याचे आम्हाला दिसून आले.
विशेषतः व्हिडिओचा मूळ स्रोत एक वर्षे जुना असल्याने हे नृत्य सध्या नव्हे तर किमान एक वर्षांपूर्वी झालेले असल्याचे यावरून स्पष्ट होते. तसेच सध्या बलुचिस्तानात ऑपेरेशन सिंदूर बद्दल आनंद व्यक्त करणारे व्हिडीओ उपलब्ध झाले नाहीत.
आम्ही बलुचिस्तान येथील नागरिकांचा लेवा हा पारंपारिक नृत्यप्रकार समजावून घेण्यासाठी शोध घेतला असता अशा नृत्याचे असंख्य व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध असल्याचे आम्हाला आढळले असून ते येथे पाहता येतील.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात साम टीव्ही आणि झी २४ तास या माध्यमांनी ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानात आनंदोत्सव हा केलेला दावा खोटा आणि एक वर्ष जुन्या व्हिडिओंवर आधारलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google Search
Facebook post by A K Studio on April 15, 2024