पत्रकारांनी पेट्रोलदरवाढीसंदर्भात प्रश्न विचारताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढता पाय घेतला.
सोशल मीडियामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. फडणवीस सोलापुरात कोरोना संदर्भात पत्रकार परिषदेतून बाहेर निघताना पत्रकार त्यांना पेट्रोल दरवाढी संदर्भात बोलण्यास सांगत असताना ते यावर काही न बोलता पुढे निघून जात असल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की पेट्रोल दरवाढीसंदर्भात फडणवीस यांनी उत्तर न दिले नाही व त्यांनी या प्रश्नावर काढता पाय घेतला.

पडताळणी
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरू केली. देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल दरवाढीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले का नाही याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला असता फेसबुकवर हा व्हायरल क्लिप याच दाव्याने मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले.


याशिवाय ट्विटवरवर देखील ही व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आली आहे.


आम्ही या संदर्भात अधिक शोध घेतला असता देंवेंद्र फडणवीस यांच्या यूट्यूब चॅनलवर सोलापुरात 24 जून रोजी राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आढळून आला. यात त्यांनी राज्यातील कोरोना सद्दस्थितीबद्दल व सरकारला काही उपाययोजना सुचविलेल्य्या दिसते.मात्र व्हिडिओच्या शेवटी पत्रकार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्यासोबत प्रश्न विचारत असताना फडणवीस आपल्या खुर्चीवरुन उठत मी त्याआधी यावर बोललो आहे असे सांगताना दिसत आहेत.
स्थानिक बातम्यांचे चॅनल येस मराठीच्या यूट्यूब चॅनलवर देखील देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आढळून आला. यात देखील ते आपल्या जागेवरुन उठत असताना पत्रकार त्यांना राष्ट्रवादी संदर्भात प्रश्न विचारत आहेत व ते याच्यावर बोललो आहे असे उत्तर देत असल्याचे दिसते.
व्हायरल व्हिडिओत पत्रकार फडणवीस मंचावरुन पुढे जात असताना त्यांना पेट्रोल दरवाढी संदर्भात प्रश्न विचारत असताना ते यावर काही न बोलता पुढे जात असल्याचे दिसत आहे. व्हायरल क्लिप संदर्भात आम्ही एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधला असता त्याने आम्हाला सांगितले की देवेंद्र फडणवीस मंचावरुन निघण्याच्या तयारीत असताना पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या संदर्भात आणि पेट्रोल दरवाढी संदर्भात प्रश्न विचारले. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या संदर्भात उत्तर दिले नाही मात्र पेट्रोलदरवाढी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. याची व्हिडिओ क्लिप देखील स्थानिक पत्रकाराने आम्हाला उपलब्ध करुन दिली.
39 सेंकदांच्या या क्लिपमध्ये पत्रकारांनी राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी संदर्भात प्रश्न विचारताच फडणवीस उठताना दिसत आहेत. यानंतर त्यांना शरद पवार हे पुरोगामी आहेत की प्रतिगामी आहेत असा प्रश्न विचारण्यात येतो त्यावेळी ते मी बोललोय याच्यावर असे उत्तर देतात. यानंतर ते थोडे पुढे जात असताना पेट्रोल दरवाढीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहेत. फडणवीस दरवाढीसंदर्भात म्हणतात की, “पेट्रोल दरवाढीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की ते पास आॅन असतं, कंपन्यांना ते अधिकार आहेत. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढते तेव्हा ती वाढते जेव्हा कमी होते तेव्हा ती कमी होते. बाकी कमी ही झाली आणि ती वाढलीही, त्याच्यात सरकार डायरेक्ट काही करत नाही.”
यावरुन हेच स्पष्ट होते की,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात पत्रकारांनी पेट्रोल दरवाढीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. सोशल मीडियामध्ये अर्धवट क्लिप शेअर करुन भ्रामक माहिती पसरवली जात आहे.
Source
Facebook, Twitter, Direct contact,
Result- False